Friday 24 December 2021

"सकलेश्वर मंदिर" अंबेजोगाई.




"सकलेश्वर मंदिर" हे अंबेजोगाई शहरापासून साडेतीन किलोमीटर अंतरावर असून एका टेकडीवजा जागेवर स्थित आहे. हे मंदिर बऱ्याच अंशी भग्न झालेले असले, तरी तत्कालीन शिल्पवैभव आजही ठळक रित्या जाणवते, ते तेथील विखुरलेल्या कित्तेक मूर्तिशिल्पांमुळे.... त्यावर जमलेली धूलिकण या अश्या आपल्या सजगतेवर नेहमीच प्रश्न करत असावीत असे वाटते. 


  हे मंदिर बारा खांबी मंदिर म्हणून सुद्धा ओळखले जाते. सद्य काळात मूळ वास्तूपैकी गर्भगृह ,अंतराळ आणि मंडपाचा भाग शिल्लक आहे. तर अधिष्ठानाचा भाग हा अजूनही जमिनी मध्ये च दबलेला आहे, त्यामुळे पिठाचा केवळ थोडासा भाग नजरेस पडतो. येथील मुखमंडप पूर्णपणे भग्नावस्थेत आहे,पैकी दोनच स्तंभ शिल्लक आहेत. या मंदिरास तीन प्रवेशद्वारे आहेत म्हणजेच येथील सभामंडप हा खुल्या प्रकारचा आहे. 


मंडपाच्या मध्यभागी 13 फूट ×13 फूट अशा मापाचे चौरस पीठ असून त्यावरील रंग शिळेवर आठ स्तंभ आहेत आणि त्याच्या मध्यावर सुंदर वर्तुळाकार कोरीव काम केलेले आहे. मंडपा च्या वितानाचा भाग पूर्णपणे पडलेला आहे. मंडपामध्ये असलेल्या स्तंभांवर सुंदर कोरीव काम असून त्या ठिकाणी देवकोष्टके नाहीत. अंतराळाचा भाग हा लहान आहे.



 विशेषत: येथील गर्भगृह हे जमिनीच्या खाली दहा फूट असून, चौरसाकृती आहे. 9 फूट × 9 फूट अशा मापा चे गर्भगृह असुन त्यात प्रवेश करण्यासाठी पायऱ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस कीर्तिमुखे कोरलेली आहेत. गर्भगृहामध्ये शिवलिंग आहे जे फार वर्षांपूर्वी चे जुने आणि जागृत आहे असे तेथील स्थानिक लोकांचे मत आहे.


अंतराळात प्रवेश करण्याआधी जी दोन स्तंभ दिसतात त्याचे निरीक्षण केले असता असे लक्षात आले की येथील शिल्पावशेषांच्या साह्याने या मंदिराची काहीअंशी पुनर्बांधणी केली आहे, कारण येथे जवळ जवळ असलेल्या दोन स्तंभामध्ये सुद्धा साधर्म्य दिसून येत नाही, तर कोरीव कामाची काही पाषाण चुकीच्या जागी बसवल्याची सुद्धा दिसतात.


य मंदिरात एकूण बत्तीस स्तंभ आहेत पैकी सहा स्तंभांवर कोरीवकाम खूप आहे तर काही स्तंभांवर पुत्तलिका सुद्धा कोरलेल्या आहेत. प्रस्तुत मंदिर हे शेतामध्ये खोदकाम करत असताना सापडले आहे असे म्हणतात. या मंदिराच्या अवतीभवती सर्वत्र मूर्तिशिल्प, मंदिराचे अवशेष मोठ्या प्रमाणात विखुरलेले दिसतात, जे नक्कीच एका अभ्यासकाला त्या निर्जन स्थळापर्यंत खेचून आणतात...

स्थपती

 स्थपती व्यंकटेश्वरा अप्पा..  " कर्तृत्व नेहमीच शब्दांपेक्षा चेहरा अधिक सांगते "..  याची जाणीव होणारे काही क्षण... मी वाचलेलं होत,...