Showing posts with label मुर्तीशास्त्र. Show all posts
Showing posts with label मुर्तीशास्त्र. Show all posts

Tuesday, 24 January 2023

Memories of Beluru..

धावणाऱ्या आयुष्यात कुठेतरी थांबावस वाटतं ते या ठिकाणी...

     मंदिरातील अध्यात्मिक वातावरण, जाणीवा, संवेदना,कला,इतिहास,परमेश्वराच अस्तित्व,या सर्व गोष्टी सभामंडपातील एका कोपऱ्यात बसून तासंतास अनुभवायला आवडतं,,या धावणाऱ्या आयुष्याला खर्या अर्थाने ब्रेक द्यावा वाटतो, थांबावस वाटत ते फक्त याच ठिकाणी... 




     सकाळी सकाळी धुक्यात न्हाहुन निघालेल्या वातावरणात, मंदिराच्या सुशोभीकरणासाठी कार्यरत असलेल्या स्त्रियांसोबत राहुन प्रांगणात पाणी शिंपण, रांगोळी काढणं,उत्सवाच्या दिवशी तोरण बांधणं, ध्यान मंत्रोच्चार करण यात जे सुख होतं ते शब्दात केव्हाच मांडता येणार नाही. खूप शिकवले या जागेने, पुन्हा एकदा नव्या उमेदीने आयुष्याच वाळवंट तुडवण्यासाठी खंबीर बनवलं.. खरोखरच विधात्याच्या दारी आलो की सारं कसं sorted होऊन जातं आयुष्य.. तो हवाच पाठीशी, सोबत आणि पुढे ही मार्ग दाखवण्यासाठी..



       पूर्ण चार दिवस या मंदिराच्या सहवासात राहण्याचं सुख काही औरच... खुप सुंदर आठवणी आणि क्षण..जग जेव्हा साखर झोपेत असतं अगदी त्या वेळी पहाटे मंदिरासमोरील एका लहानशा टपरीवरील आजीच्या हातचा कडक चहा...पक्षांचा किलबिलाट.. कानावर पडणारे व्यंकटेश्वरा सुप्रभातम स्त्रोत... डोळ्यासमोर दिसणारे गोपूरम.. त्या भोवती पारव्यांच्या ठराविक तीन प्रदक्षिणा... त्यापुढे दिसणारा पाषाणांचा जिवंत देखावा..एवढी रम्य सकाळ आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो.... त्यानंतरचा पूर्ण दिवस ही मंदिरामध्ये, मंदिर परिसरामध्ये च व्यतीत करणं. . संध्याकाळी सूर्यास्त आणि संध्या आरतीसाठी हजर असणं.. त्यानंतर चालणारी रात्रीची भजन ऐकण आणि रात्री दहा वाजेपर्यंत, मंदिर बंद होईपर्यंत तिथेच घुटमळत राहणं...मंदिर बंद झाल्यावर नंतर च रिसॉर्टकडे कडे परतणं...असा ठरलेला नित्यक्रम..



.प्रवास माणसाला जुन्या चा नवा बनवतो ते खरच आहे.. या जागेने खुप गोष्टी शिकवल्या काही समजावून सांगितल्या, अन् काही नकळतपणे अंगिकारले गेल्या.. आयुष्याच वाळवंट तुडवण्यासाठी मनात मृगजळ निर्माण केला तो याच जागेने... आणि म्हणून च काही जागा फक्त खास असतात... त्याबद्दल असलेल्या भावनांना कागदावर उतरवणं तस कठीणच, पण तरी हा लहानसा प्रयत्न..कारण मला थांबायला आवडत..खास,आवडत्या गोष्टींविषयी, व्यक्तींविषयी आणि जागे विषयी नेहमीच लिहायला आवडत.. . आणि खरोखर च मनातुन धावणाऱ्या या आयुष्यात या ठिकाणी थांबायला आवडत..... 



Shrimala K. G. 


Sunday, 20 November 2022

तडकल्लु ग्राम..

 तडकल्लु ग्राम.. 


*चालुक्याचा सरसेनापती व आधारस्तंभ असलेल्या नागवर्मा याचे हे गाव.. 

*तड हे 'तडाग' या शब्दाचे तद्भव असून कल्लू म्हणजे 'खडक' होय.



 या ठिकाणी कल्याणी चालुक्य काळातील दोन शिलालेख आहेत. नागवर्मा हा येथील रहिवाशी होता, त्याने या ठिकाणी भैरव, नागेश्वर, मल्लिकार्जुन, आदित्य ,नारायण अशा इत्यादी मंदिरांची उभारणी केली, सद्यकाळात मंदिराचे केवळ पुरातत्वीय अवशेष पाहायला मिळतात, त्यामध्ये स्तंभ, मंदिराचे जोते, मूर्ती शिल्प इत्यादी इतरत्र विखुरलेले दिसतात.

 "सरसेनापती महाप्रचंड दंडनायक वीर पुरुष नागवर्मा" हा पहिला चालुक्य सम्राट आणि दुसरा सोमेश्वर याचा उजवा हात होता. राजा सोमेश्वराने आपल्या राज्यारोहण प्रसंगी जी षोडशदाने दिली ,त्यामध्ये तडकल्लू हे गाव नागवर्मा यास त्याच्या विवाहप्रसंगी दिले होते. 





 मलाय्या मंदिर ( मल्लिकार्जुन मंदिर) 

सध्या काळात प्रस्तुत मलाय्या मंदिराचा केवळ अंतराळाचा भाग आणि गर्भगृह पहावयास मिळते ,मंदिराचे अवशेष इतरत्र विखुरलेले दिसतात. स्थानिक लोकांनी अंतराळात नंदीची स्थापना केलेली आहे. गर्भगृहास सुप्रभा द्वारशाखा असून, ललाट बिंबावर गणेश तर उत्तरांगावर असलेल्या लहानशा देवकोष्टकात लक्ष्मी असावी. अंतराळात प्रवेशताना दोन्ही बाजूस असलेल्या स्तंभाच्या मध्यभागी घटपल्लव आणि भौमितिक नक्षी कोरलेल्या आहेत. गर्भगृहात असलेले मूळ शिवलिंग नवीन पिठावर ठेवलेले असून, या ठिकाणी प्रतिदिन तीन वेळा पूजाअर्चा केली जाते. गर्भगृहाच्या उजव्या बाजूस भव्य शिलालेख असून, आजही त्यावरील अक्षरे अगदी सुस्थितीत आणि स्पष्ट आहेत.मंदिराच्या बाहेर सुद्धा एक शिलालेख आहे, हा शिलालेख म्हणजे राजा सोमेश्वराने जिनालयासाठी केलेल्या दानाचा उल्लेख करणारा आहे. 

मंदिराच्या बाहेरील भागात इतरत्र बरेच मूर्ती शिल्प विखुरलेले दिसतात, तर गर्भगृहाच्या डाव्या बाजूस एक लहानशी खोली आहे ,ज्यामध्ये आज पूजा साहित्य ठेवले जाते. या मंदिरात स्थानिक लोक विवाह सोहळ्याचे आयोजन सुद्धा करतात, सभा मंडपातच एका कोपऱ्यात लहानशी चूल सुद्धा महाप्रसादाकरिता बनवलेली आहे. स्थानिक लोक शिलालेखाची पूजा करताना दिसतात, त्यामागे त्यांची श्रद्धा असावी पण त्या श्रद्धेपोटी का होईना आज तो शिलालेख अगदी सुरक्षित सुस्थितीत टिकुन आहे. आज या गावास तळखेड या नावाने ओळखले जाते. 




Friday, 10 June 2022

गुप्तेश्वर मंदिर, धारासुर

               गोदावरी नदीच्या तीरावर असलेले प्रस्तुत "गुप्तेश्वर मंदिर" 'पूर्वाभिमुख' आहे. 



          दहा फूट उंचीच्या अधिष्ठानावर मंदिर उभारले असून, सद्या अधिष्ठानावर केवळ गजथर दिसतो. मंदिरास तीन प्रवेशद्वार आणि एक गर्भग्रह असल्याने खुले सभामंडप या ठिकाणी दिसून येते. मुख्य प्रवेशद्वारासमोर अधिष्ठानावर वृंदावन आहे जे नंतरच्या काळात मंदिराच्या डागडुजी वेळी बांधण्यात आले आहे. तीनही प्रवेशद्वारावर नंदिनी द्वार शाखा असून केवळ दोन बाजूस मुखमंडप ,कक्षासने दिसून येतात. सभामंडपात आधुनिक फरशा बसवलेल्या आहेत. सभामंडपात एकूण चार देवकोष्टक असून सध्या ते रिक्त आहेत. सभामंडपातील रंगशिळा 12 फूट × 12 फूट असून त्याभोवती चार मुख्य स्तंभ आहेत तर एकूण 18 स्तंभांनी सभामंडपाचे वितान तोलले आहे, पैकी मध्यभागी असलेले वितान अधिक अलंकृत केल्याचे दिसते, त्यामध्ये कमलपुष्पा सहित चारही बाजूस किर्तीमुखाचे अंकदिसतेे ,व इतर सर्व वितानावर केवळ कमलपुष्प कोरण्यात आली आहेत. रंगशिळेभोवती असलेले चार स्तंभ अधिक अलंकृत आहेत. चौकोनी तळ खडा असलेल्या या स्तंभांवर सुंदर लोझेन्स, अॅरोबॅक्स ची नक्षी आहे. सभामंडपामध्ये डाव्या बाजूस प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला सुंदर जालवातायनाचे अंकन केले आहे.



 सभामंडपातून अंतराळात प्रवेश करताना अंतराळाचे अलंकृत प्रवेशद्वार नजरेत भरते.प्रवेशद्वारावरील उत्तरांग आणि वितान यांना पुन्हा जोडण्याकरिता स्थानिक लोकांनी दोन लंबवर्तुळाकार पाषाण उभ्या स्थितीत बसवलेले आहेत, जेणेकरून ढासळत्या भागास आधार मिळेल. अंतराळाच्या प्रवेशद्वारास दोन अलंकृत स्तंभ व त्या बाजूस सुंदर जालवातायन, द्वाराच्या खालील बाजूस किर्तीमुखा चे अंकन, तर ललाटलिंबावर गणेशाचे अंकन दिसते, उत्तरांगावर मकर तोरणा मध्ये मध्यभागी गणपती, त्या अलीकडे डाव्या बाजूस मारुती, तर उजव्या बाजूस शिवलिंगाची आराधना करणारी स्त्री उत्किर्णीत करण्यात आली आहे. 




या ठिकाणी अंतराळात नंदी ची स्थापना केली आहे सहाजिकच हे स्थानिक लोकांनी केले असावे. नंदिनी द्वार शाखा असलेले अलंकृत प्रवेशद्वार रत्न, नर, स्तंभ, व्याल, लता अशा शाखांनी युक्त आहे. खालील दोन्ही बाजूस अनुक्रमे निधी, चामरधारिणी, वैष्णव द्वारपाल,चामरधारिणी, आणि जया, तर खालील बाजूस अनुक्रमे गज, कीर्तिमुख लोझेन्स नक्षी, पुन: कीर्तिमुख गज यांचे अंकन केलेले आहे, त्यासमोर सुंदर चंद्रशिला, तर ललाटबिंबावर गणेशाचे अंकन दिसते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास काळ्या रंगाचा लेप लावलेला आहे.




 गर्भगृहात एका मध्यम आकाराच्या चौरसाकृती ओट्यावर शिवलिंग, त्या बाजूस त्रिशूळ, डमरू पहावयास मिळतो. हे मंदिर मूळत: विष्णूचे आहे, येथील विष्णूची मूर्ती तस्करी प्रकरणामुळे गावातील दुसऱ्या मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात आली होती, असे स्थानिक सांगतात. मंदिराचा बाह्यभाग पाहता, मंदिराची रचना सर्वसाधारणपणे अधिष्ठान, वेदीबंद, जंघाभाग, कपोत आणि शिखर अशी आहे.



 मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस असलेल्या कक्षासनाबाहेरील लघु शिल्पांत कित्येक कामशिल्पे, प्रसूती शिल्प, स्त्री शिल्प, पाहायला मिळतात. तसेच डाव्या प्रवेशद्वाराबाहेरील लघु शिल्पांत ही काम शिल्प प्रामुख्यानं पाहायला मिळतात. मात्र उजव्या प्रवेशद्वारासमोर ढासळलेल्या कित्येक स्तंभांचा ढिगारा पाहायला मिळतो. या लघु शिल्पांच्या खालील बाजूस गजथर दिसतो, या थरातील गज हे युद्धातील असावेत, ज्यांनी त्यांच्या सोंडेने शत्रूस मारले आहे, तर काही ठिकाणी शस्त्रास्त्रासहित वीर गजारूढ झालेला आहे, तर काही ठिकाणी गज व इतर प्राण्यांची लढाई सुद्धा दाखविण्यात आली आहे. 



येथे वेदीबंदावर कसलीही नक्षी नसून ,जंघाभाग बराच उंच आहे, त्यामुळे अभ्यासकाला शिल्पांची अनुभूती पूर्ण मान वर केल्याशिवाय घेता येणार नाही. बाह्य भागावर प्रमुख तीन देवकोष्टके आहेत त्यामध्ये श्रीधर ,ऋषिकेश यांच्या प्रतिमा पाहायला मिळतात. प्रदक्षिणा क्रमानुसार मंडोवरावर अनुक्रमे पत्रलेखा, पुत्र वल्लभा, शत्रू मर्दिनी, विष्णू , नाग आणि विंचू धारिणी, नृत्य गणेश, चामरा, मृदला, शत्रु मर्दिनी, आलसा,विंचू धारिणी, डालमालिका, विषकन्या ,पद्मगंधा, मोहिनी, दर्पणा, डालमालिका, मदन, वीणावादिनी, मर्कटवस्त्रहरणा, शुभगामिनी, विषकन्या, चामुंडा, डालमालिका, बासरीवादक, विष्णू, पुत्रवल्लभा, छत्र धारण केलेली स्त्री आणि कर्पुरमंजिरी यांचे अंकन दिसते. 



शिखराचा भाग विटांनी बनलेला आहे, तर आतील पोकळ भागात लाकडाचे अवशेष दिसतात, यावरून आतून आधारा करिता लाकडाचा सुद्धा वापर केल्याचे लक्षात येते. सद्य काळात दुर्दैवाने शिखरास मधोमध भलेमोठे भगदाड पडले आहे ,ज्यामुळे आतील पोकळ जागा, विटांची बांधणी, लाकडाचे अवशेष सहजगत्या दिसून येतात. 



पंच भूमीचे, लता युक्त शिखर म्हणजे खरोखरच स्थापत्यशास्त्राचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

           "संत जनाबाई" यांची जन्मभूमी असलेल्या 'गंगाखेड' शहरापासून केवळ 19 किलोमीटर अंतरावर असलेल्या 'धारासुर' या लहानशा गावात प्रस्तुत "गुप्तेश्वर मंदिर" आहे. सद्यकाळात हे मंदिर अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत आहे. कित्येक पाषाण कोसळून मंदिराच्या पायथ्याशीच त्यांचा ढिगारा झाला आहे. प्रदक्षिणा पथाचा मागील भाग पूर्णत: ढासळलेला असल्याने, एक पूर्ण प्रदक्षिणा सुद्धा घेता येणार नाही. अंतराळाच्या प्रवेशद्वारावरील पाषाण कोसळला आहे, अंतराळात प्रवेश केल्यानंतर ही चढ-उतार पणा, भेगा जाणवतात ,त्यामुळे केवळ पूजाविधी करिता गर्भगृह अंतराळ खुले केले जाते, या खेरीज तेथे जाण्यास मनाई केली आहे. त्यासाठी अंतराळाच्या द्वारास आधुनिक लोखंडी द्वार बसवून कायम ते कुलूप बंद ठेवतात.



 दरडी कोसळल्या सारखे येथील पाषाण केव्हाही कोसळू शकतात, त्यामुळे येथे स्वतःच्या जबाबदारीने प्रवेश करावा, आपात्कालीन घटना घडल्यास मंदिर कमिटी, गावकरी जबाबदार राहणार नाहीत, असा फलक सभामंडपात लावलेला आहे. यावरूनच मंदिराच्या सद्य स्थितीचे गांभीर्य लक्षात येते. 



एक-दोन वर्षापूर्वी येथील गावकऱ्यांनी या मंदिराच्या संवर्धनासाठी उपोषण सुद्धा केले होते, मात्र अद्याप कोणतेही संवर्धन या ठिकाणी झालेले नाही. केवळ थोडीशी डागडुजी गावकऱ्यांना मार्फत केलेली आहे.

 मंदिराचे वय वाढवण्यासाठी आज संवर्धन केले नाही तर, उद्या हाती केवळ ढासळलेले दगडी चिरे लागतील. एवढे प्रचंड सौंदर्य , उत्कृष्ट स्थापत्य दुर्लक्षित आहे ही निव्वळ खेदाची बाब असून , जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचावे, ढासळत्या पाषाणाचे गांभीर्य लक्षात यावे , याकरिता हा एवढा लिखाणाचा प्रपंच... ✍️


Shrimala K. G. 

Monday, 7 March 2022

कंदुकधारिणी किंवा कंदुकावती

 


Revanasiddeshwar temple  kalgi, kalburgi district, Karnataka.


          मंदीराच्या बाह्यांगावर आढळणाऱ्या स्त्रीशिल्पांना सुरसुंदरी, देवांगना किंवा अप्सरा  असे म्हणतात. क्षिरार्णवात 32,शिल्पप्रकाशात 16 तर काही शिल्पशास्त्रीय ग्रंथात 24 देवांगणाचे प्रकार आढळतात. मात्र या व्यतिरिक्त ही अन्य सुरसुंदरी दिसून येतात, त्यापैकीच एक म्हणजे हातात कंदुक(चेंडू) घेऊन खेळत नृत्य करणारी स्त्री म्हणजेच "कंदुकधारिणी  किंवा कंदुकावती"

कंदुक हा मूळात संस्कृत शब्द असून,त्याचा अर्थ चेंडू असा आहे, ज्यास हिंदीमध्ये गेंद किंवा गेंदू म्हणतात. बोलीभाषेमूळे कंदूचा गेंदू, चेंडू असा अपभ्रंश झाला असावा.

प्राचीन काळातील अनेक उत्सवांपैकीच एक कंदुकोत्सव. कंदुक खेळण्याचे साधन तर होतेच, शिवाय ते नृत्य करताना ही वापरले जात, तत्संबंधी चे नियम तंत्र, गतीचे नियमन, चूणीक्रिया, क्षयपद, चंक्रमण,मध्यम गती इ. बाबत वर्णन दंडीने केले आहे. प्रत्येक महिन्याच्या कृतिका नक्षत्रात विंध्यवासिनी देवीच्या पूजनार्थ राजकुमारी कंदुकावती कंदुकनृत्य करत असल्याची माहिती दंडीने दिली आहे. तसेच हरिवंशात श्रीकृष्णाच्या कंदुकक्रिडेचे संदर्भ आहेत.



काही ठिकाणी कंदुकधारिणीच्या पायाशी सेविका असून ती चेंडू पुरवत आहे. याशिवाय खजुराहो येथील जावरी मंदिर, लक्ष्मण मंदिर, कंदारिया मंदिर येथे ही कंदुकधारिणी शिल्प आढळते. येथील एका स्त्रीच्या हातात फळीसदृश्य वस्तू असून त्यावर तिने कंदुक तोलला आहे. मात्र हे शिल्प भग्न असून तिच्या चेहर्याचा पाषाण फुटलेला आहे. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील अंभई येथील वडेश्वर मंदिरावर दोन कंदुकधारिणी असून मार्कंडी, नागदा इ. ठिकाणी ही कंदुकधारिणी आढळतात.

मंदिर हे जरी अध्यात्माचे प्रतिक असले तरी, मंदिरावरील प्रत्येक शिल्पाचा अर्थ अध्यात्माशीच संबंधित नसतो. त्यापैकी अनेक शिल्पे सामाजिक, सांस्कृतिक परंपरेची साक्ष देत असतात.

✍️


Wednesday, 12 January 2022

धनुष्यबाण..

"धनुष्यबाण" हे एक महत्त्वपूर्ण आयुध आहे ,जे पुर्वी शिकारीसाठी तसेच युद्धात किंवा स्पर्धेत संधान साधावयास वापरले जायचे.   धनुष्य हे वेदकालीन आर्यांचे मुख्य शस्त्र होते.पित्याचे धनुष्यबाण हे वारसाहक्काने  पुत्राकडे येत असतं. ऋग्वेदातील धनुष्य लाकडाचे असून त्याची दोरी स्नायूची होती,तर महाभारतात "कार्मुक" या लाकडाचे धनुष्य बनवीत असतं. महाभारतातील धनुष्य रंगवलेली असुन त्यावर सुवर्णा कृती पुष्पे, व रत्ने जडवलेली असत. धनुष्य ही वापरणाऱ्यांच्या उंचीच्या व शक्तीच्या मानाने लहान मोठी असतात सामान्य: त्याची लांबी तालमात्र असावी असे महाभारतात सांगितले आहे, याहून मोठी धनुष्य शक्तीच्या किंवा निशाणा च्या स्पर्धेसाठी वापरण्यात येत असतं.


कौटिल्याने धनुष्याचे कोदण्ड, द्रुण,धनु व कार्मुक हे प्रकार दिलेले असून ते अनुक्रमे ताल, बांबू, दारू व शृंग यांपासून बनविलेले असतात असे नमूद केलेले आहे.  

धनुष्यासाठी 'शिंग व लोखंड' यांचा संयुक्त उपयोग करावा असे अग्नीपुराणात सांगितलेले आहे, तरी हिरोडोटस च्या काळापर्यंत मुख्यता बांबूची धनुष्य वापरात होती.कालांतराने धातूंची निर्मिती वाढली व त्याचा उपयोग अस्त्रांसाठी होऊ लागला.

"शिज्जिनी" म्हणजे धनुष्याची दोरी. वेदकाळामध्ये ही दोरी बैलाची कातडे किंवा स्नायू यांच्यापासुन बनवली जात असे. मूर्व, तृण, शण, बांबू ची साल व स्नायू यांपासून धनुष्याची शिज्जिनी करावी असे कौटिल्याने सांगितले आहे.

शिज्जिनी च्या प्रत्येक टोकाला फांस असे, त्यापैकी एक फांस धनुष्याच्या वरच्या टोकाशी असलेल्या खाचेत नेहमी गुंतवलेला असे. धनुष्य वापरण्याच्या वेळीच दूसरा फांस खालच्या खांचेत बसविण्यात येत असे नाही तर धनुष्याच्या कमानीची शक्ती नष्ट होत असते.

धनुष्य वापरण्याच्या वेगवेगळ्या संज्ञा असतात,त्यापैकी काही पुढीलप्रमाणे:-
आतन्= धनुष्यावर दोरी चढविणे
प्रतिज्ञा= बाण लावणे
आयम्= धनुष्य वाकवणे
अस्= बाण सोडणे.



बाण जोडून शिज्जिनी ताणून नेम धरण्याला "संधान" असे म्हणतात. धनुष्याचा मध्यभाग व बाणाचे अग्र आणि लक्ष्य ही उघड्या डोळ्यांच्या पातळीत येतील एवढेच धनुष्य उचलून संधान साधावयाचे असते.


ऋग्वेदात व अथर्ववेदांत "आलाक्ता" व "दिग्ध" या विषारी बाणांचा उल्लेख आलेला आहे अशा विषारी बाणांचा वापर धर्मयुद्धा मध्ये करायचा नाही असा एक सक्त नियम होता.

महाभारतातले योद्धे हे धनुष्य उभे धरतात,आणि धनुष्याची दोरी ही कानापर्यंत  ओढतात.
गुडघ्यावर बसून किंवा अंतराळातील संधान साधावयाचे असेल तेव्हा धनुष्य हे आडवे च धरावे लागते.

Tuesday, 30 November 2021

कल्याण-सुंदर शिव पार्वती विवाह एक संपन्न कलाकृती

 

जेव्हा मानवी भावभावनांची निर्झरा पाषाणातून उस्फूर्तपणे खळाळते, तेव्हा पूर्णार्थाने शिल्पाकृती श्वास घेऊ लागते.

 ज्यांच्या श्रम, कौशल्य अन् कल्पनाविष्काराने पाषाणास वाचा फुटली अन् नवनवीन कलाकृतींचा जन्म झाला, अशा कलाकारांचे कसब खरोखरच उल्लेखनीय आहे.


  वेरूळ मधील लेणी क्रमांक 16 अर्थात कैलास लेणे, येथे बाहेरील स्तंभ मालिकेच्या ओवरीत असलेल्या शिल्पपटात एक शिल्पपट 'शिवपार्वती विवाह सोहळ्याचा' आहे, यात शिव-पार्वती एकमेकां समक्ष उभे असून शिव चतुर्भुज आहे, त्याचा समोरील उजवा हात पार्वतीच्या हाती असून मागील उजव्या हातात काही तरी वस्तू आहे, शिवाचा पुढील डावा हात पार्वतीच्या स्कंधावर असून, मागील डाव्या हातात कमलपुष्प आहे.काही ठिकाणी पाणिग्रहण समयी, अलिंगन वा हनुस्पर्श केल्याचे ही दाखवले आहे. विवाह प्रसंग असल्याने सहाजिकच शिव अलंकारांनी अलंकृत झालेला दिसतो. मस्तकावर किरीट मुकुट, कानात कुंडले, गळ्यात ग्रीवा, दंडात केयूर ,पायाच्या दोन्ही अंगठ्यात अंगुलियक परिधान केलेले आहेत, शिवाय उत्तरीय व मेखला सुद्धा या ठिकाणी दिसून येतो. तर पार्वती ही शिवाच्या डाव्या बाजूस किंचित मान झुकवून उभी आहे.

        पाषाणात दडलेली सलज्ज ,सालंकृत, सौंदर्य शील नववधू दर्शवण्यास कलाकाराला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले आहे. पार्वतीने घातलेला केसांचा अंबाडा मानेवर रुळतो आहे. तर पार्वतीने गळ्यात ग्रीवा,हार सूत्र, कानी कुंडले, दंडात वलयांकित केयूर, हाती कंकण, कमरेस मेखला,पायी पैंजण ,अंगठ्यात अंगुलियक,इ.अलंकार परिधान केले आहेत. तर खालील बाजूस ब्रम्हदेव प्रस्तुत विवाहाचे पौरोहित्य करताना दिसतात. काही वेळा यझातील अग्नी मनुष्य रुपात सुद्धा दाखवला जातो. 



विशेष बाब अशी की येथील शिल्पपटात पार्वतीने केवळ एकाच पायात पैंजण परिधान केल्याचे अंकित केले आहे.अर्थातच विवाह या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि महत्त्वाच्या क्षणी सहाजिकच सामान्य माणसाची ही धांदल उडते, तो एक खूप महत्त्वाचा बदल असतो.हर्ष, भय, लज्जा अशा कित्येक भावनांचं ते एकत्रीकरण असतं. मनाच्या अशा संमिश्र अवस्थेत गोंधळ उडणे सहाजिक आहे..देवदेवतांना मुर्तरूप देणे म्हणजे केवळ मूर्ती घडवणे एवढेच नव्हे, तर त्या मूर्तीवर मानवी भावभावनांचा शिडकावा करणेही तेवढेच आवश्यक होय, हे येथे या शिल्पकाराने उत्तम रित्या दाखवून दिले आहे.विवाह घटिका समीप आल्याने बावरून गेलेली पार्वती एका पायात पैंजण घालण्याचे विसरलेली आहे हे दाखवून कलाकाराने कलेचे अत्युच्च शिखरच गाठले आहे. खरोखरच कलाकाराच्या कल्पनाविलासाला शतशः नमन..!

✍Shrimala K.G.

स्थपती

 स्थपती व्यंकटेश्वरा अप्पा..  " कर्तृत्व नेहमीच शब्दांपेक्षा चेहरा अधिक सांगते "..  याची जाणीव होणारे काही क्षण... मी वाचलेलं होत,...