Sunday 20 November 2022

तडकल्लु ग्राम..

 तडकल्लु ग्राम.. 


*चालुक्याचा सरसेनापती व आधारस्तंभ असलेल्या नागवर्मा याचे हे गाव.. 

*तड हे 'तडाग' या शब्दाचे तद्भव असून कल्लू म्हणजे 'खडक' होय.



 या ठिकाणी कल्याणी चालुक्य काळातील दोन शिलालेख आहेत. नागवर्मा हा येथील रहिवाशी होता, त्याने या ठिकाणी भैरव, नागेश्वर, मल्लिकार्जुन, आदित्य ,नारायण अशा इत्यादी मंदिरांची उभारणी केली, सद्यकाळात मंदिराचे केवळ पुरातत्वीय अवशेष पाहायला मिळतात, त्यामध्ये स्तंभ, मंदिराचे जोते, मूर्ती शिल्प इत्यादी इतरत्र विखुरलेले दिसतात.

 "सरसेनापती महाप्रचंड दंडनायक वीर पुरुष नागवर्मा" हा पहिला चालुक्य सम्राट आणि दुसरा सोमेश्वर याचा उजवा हात होता. राजा सोमेश्वराने आपल्या राज्यारोहण प्रसंगी जी षोडशदाने दिली ,त्यामध्ये तडकल्लू हे गाव नागवर्मा यास त्याच्या विवाहप्रसंगी दिले होते. 





 मलाय्या मंदिर ( मल्लिकार्जुन मंदिर) 

सध्या काळात प्रस्तुत मलाय्या मंदिराचा केवळ अंतराळाचा भाग आणि गर्भगृह पहावयास मिळते ,मंदिराचे अवशेष इतरत्र विखुरलेले दिसतात. स्थानिक लोकांनी अंतराळात नंदीची स्थापना केलेली आहे. गर्भगृहास सुप्रभा द्वारशाखा असून, ललाट बिंबावर गणेश तर उत्तरांगावर असलेल्या लहानशा देवकोष्टकात लक्ष्मी असावी. अंतराळात प्रवेशताना दोन्ही बाजूस असलेल्या स्तंभाच्या मध्यभागी घटपल्लव आणि भौमितिक नक्षी कोरलेल्या आहेत. गर्भगृहात असलेले मूळ शिवलिंग नवीन पिठावर ठेवलेले असून, या ठिकाणी प्रतिदिन तीन वेळा पूजाअर्चा केली जाते. गर्भगृहाच्या उजव्या बाजूस भव्य शिलालेख असून, आजही त्यावरील अक्षरे अगदी सुस्थितीत आणि स्पष्ट आहेत.मंदिराच्या बाहेर सुद्धा एक शिलालेख आहे, हा शिलालेख म्हणजे राजा सोमेश्वराने जिनालयासाठी केलेल्या दानाचा उल्लेख करणारा आहे. 

मंदिराच्या बाहेरील भागात इतरत्र बरेच मूर्ती शिल्प विखुरलेले दिसतात, तर गर्भगृहाच्या डाव्या बाजूस एक लहानशी खोली आहे ,ज्यामध्ये आज पूजा साहित्य ठेवले जाते. या मंदिरात स्थानिक लोक विवाह सोहळ्याचे आयोजन सुद्धा करतात, सभा मंडपातच एका कोपऱ्यात लहानशी चूल सुद्धा महाप्रसादाकरिता बनवलेली आहे. स्थानिक लोक शिलालेखाची पूजा करताना दिसतात, त्यामागे त्यांची श्रद्धा असावी पण त्या श्रद्धेपोटी का होईना आज तो शिलालेख अगदी सुरक्षित सुस्थितीत टिकुन आहे. आज या गावास तळखेड या नावाने ओळखले जाते. 




No comments:

Post a Comment

स्थपती

 स्थपती व्यंकटेश्वरा अप्पा..  " कर्तृत्व नेहमीच शब्दांपेक्षा चेहरा अधिक सांगते "..  याची जाणीव होणारे काही क्षण... मी वाचलेलं होत,...