Thursday 31 March 2022

एक खास नातं

            एक खास नात असावं, की ज्यात सारच सामावलं जावं अशी आपली बालिश अपेक्षा आयुष्याकडुन असते.

     गरजेचं नव्हे की साऱ्या अगदी साऱ्या च जाणिवांसाठी, भावनांसाठी, आवडींसाठी एकच परफेक्ट नात असाव.. वेगवेगळ्या जाणिवांसाठी वेगवेगळी नाती असु शकतात, असायलाच हवी.. एखाद्या सोबत बौद्धिक नात, केवळ पुस्तकी गप्पा मारण्यापुरत.. एखाद्या सोबत निव्वळ टिंगल टवाळक्या करण्यापुरत नातं.. एखाद्या सोबत चहा ☕काॅफी मधून उफाळून येणाऱ्या वाफे इतकेच औपचारिक संवाद करण्यापुरत नातं. 



अन् या सगळ्या पलीकडे एक रोमॅण्टिक नातं.. पण आपण या नात्यावर इतर सर्व नात्यांच, अपेक्षांच, जाणिवांच ओझं टाकतो... "सर्व अपेक्षांची पुर्तता एकाच नात्याकडून व्हावी, असा अट्टाहास करण म्हणजे लपलेलं अज्ञानीपण स्वत:हून दाखवणं"..अशी अपेक्षा करणं म्हणजे त्या रोमॅण्टिक नात्यावर एकप्रकारे अन्याय केल्यसारखे च आहे. जोडीदार निवडताना ही सर्व भावनांसाठी एकच व्यक्ती हवी असा अनेकांचा अट्टाहास असतो, मग पुढे चालून अपेक्षा पुर्ती होत नसेल तर वादावादी, हेवेदावे, त्यातून होणारी मानसिक हेळसांड या सर्व बाबींना कंटाळून विवाह नंतर बाह्य नाती शोधली जातात, ज्याला लोक आपापल्या बुद्धीमत्तेनुसार मैत्री, प्रेम, लफडं, अनैतिक अशी कितीतरी नाव देतात.. शारीरिक, मानसिक, बौद्धिक अशा कितीतरी गरजा असतात, त्या सर्व च गरजा, अपेक्षा एका व्यक्तीकडून पुर्ण होउ शकतात का? किंबहुना आपण तरी कोणाच्या सर्व अपेक्षा पूर्ण करु शकतो का❓ नक्कीच नाही.. 

आपल्या वेगवेगळ्या भावना, वेगवेगळ्या आवडींसाठी वेगवेगळी विशेष नाती असु शकतात, आणि त्या वेगवेगळ्या नात्यांना अर्थ ही असतात, ते मनापासून जपायचे असतात, जगायचे असतात... 


✍️shrimala k. G


Friday 25 March 2022

सुर्यनारायण मंदिर, कालगी

              

         स्थापत्य शिल्पवैभवाने समृद्ध असलेले कालगी गाव रौद्रावती नदीच्या खळखळाटाने अधिक च शोभिवंत वाटते. येथील शिलालेखानुसार या एका गावात त्या काळी तब्बल तीस मंदिरे होती. या गावास एक समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या ठिकाणी सर्वत्रच मुर्ती शिल्प, मंदिर, बारवं, पुष्करणी,पाहायला मिळतात. संपुर्ण गावात तसेच गावानजिक च्या परिसरात मुर्ती शिल्प इतरत्र विखुरलेले दिसतात. विशेष बाब अशी की या गावास तटबंदी आहे. समृद्धता काय असते, हे येथे आल्यावर समजते, एवढे प्रचंड वैभव या गावास लाभले आहे. कर्नाटकात अशी कित्येक लहान सहान गाव आहेत,जी स्थापत्य शिल्प वैभवाने समृद्ध असून ही ती जगाच्या दृष्टीआड अजूनही आहेत, ती प्रकाशझोतात यायलाच हवी.




प्रस्तुत सूर्यनारायण मंदिर हे कर्नाटकातील कलबुर्गी (गुलबर्गा) जिल्ह्यातील कालगी या ठिकाणी आहे. रौद्रावती नदी तीरावरील प्रस्तुत मंदिर कल्याणी चालुक्य काळातील असून पुर्वाभिमुख ,त्रिदल रचनेचे आहे. म्हणजे च तीन गर्भगृह, आणि एक सभामंडप, पैकी दोन गर्भगृहात शिवलिंग आहे तर तिसरे गर्भगृह रिक्त असुन,.त्यामध्ये वितानाचे भग्नावशेष पडलेले दिसतात.

            स्थापत्य शास्त्राच्या नियमानुसार विचार केला तर सद्य काळात दिसणारे शिवलिंग हे या मंदिरातील मुख्य देवता नसावी,हे मंदिर भगवान विष्णू चे असावे.या तिनही गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील ललाटबिंबावर अनुक्रमे गणेश, गजलक्ष्मी आणि लक्ष्मी.चे अंकन आहे. सभामंडपाचे वितान ढासळलेले असल्याने सध्या ते खुले आहे, म्हणजे च केवळ गर्भगृह आणि अंतराळाचेच वितान सद्यस्थितीत आहे.नंतरच्या काळात स्थानिक लोकांनी सभामंडपामध्ये नंदी ची स्थापना केलेली आहे.




    येथे असणाऱ्या द्वारशाखा म्हणजे कलेचे साधनेचे अत्युच्च द्योतक आहे,येथे हस्तिणी द्वारशाखा असुन खालील बाजूस द्वारपाल, चामरधारिणी,निधी त्याखालील बाजुस चंद्रशिळा यांचे अत्यंत सुबक अंकन केले आहे.या ठिकाणी वितानावर सुंदर कमल पुष्प, व त्याबाजुस किर्तीमुखाचे अंकन दिसते,एवढेच नव्हे तर गर्भगृहातील विताने ही अलंकृत दिसतात. येथील वितान होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिराच्या वितानाशी साधर्म्य दर्शवितात. डाव्या बाजूस असलेल्या गर्भगृहात प्रवेश करताना बाजूस एका स्तंभावर शिलालेख कोरलेला दिसतो.



    मंदिराचा जंघाभाग काही अंशी ढासळला असला तरी तो अत्यंत अलंकृत आहे. वेदीबंदाच्या प्रत्येक भागावर सुंदर बारीक नक्षीकाम केलेले आहे तसेच त्यावर लघु देवकोष्टके ही आहेत. बारकाईने पाहिल्यास प्रत्येक लघु देवकोष्टकात विविधता दिसून येते.काही लघु देवकोष्टकात विष्णू तर काही स्त्रिशिल्पे कोरल्याची दिसतात.या लघु देवकोष्टकांचे तोरण अत्यंत वैशिष्ट्यपुर्ण आणि वैविध्यपूर्ण आहेत.अधिष्ठानावर कोरीव लोझेन्स चा थर आहे. अधिष्ठानाचा बराचसा भाग आजही जमिनीखाली आहे, त्यानंतर वेदीबंद, जंघा आणि कपोत अशी सर्वसाधारण रचना आहे. मंदिराच्या जंघाभागावर कर्पूरमंजरी, विषकन्या, शत्रूमर्दिनी, पद्मगंधा,आलसा,स्थानक उमा माहेश्वर,रती-मदन,भैरव इ. तसेच काही पुरुष प्रतिमांचे सुद्धा शिल्पांकन केलेले आहे.त्यासहीतच बाहेरील उजव्या बाजूस गजथर, बकथर दिसून येतात. दुर्दैवाने या भव्य मंदिराचा काही भाग ढासळलेला असल्याने, मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भग्नावशेष विखुरलेली दिसतात. 



✍️shrimala K. G . 

     

Thursday 17 March 2022

फग्गुच्छण:फाल्गुनोत्सव: होलिकोत्सव...

       छण,खण आणि क्षण याचा अपभ्रंश म्हणजे आजचा हा सण.

                   मनुष्य हा उत्सवप्रिय आहे. काही सणांचे महत्त्व हे सांस्कृतिक असते तर काही ऐतिहासिक असते, तसेच काही सण नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असतात,अर्थातच सुर्याची स्थिती,कृषी संपत्ती, समृद्धी इत्यादी गोष्टींवर अवलंबून असतात. मकर, मेष, कर्क,तुळ या राशीमध्ये जेव्हा सूर्य प्रवेश करतो, तेव्हा मकरसंक्रांती सारखे महत्त्वाचे सण साजरे करतात. मेष संक्रांतीच्या सुमारास रब्बी तर तुळ संक्रांतीच्या सुमारास खरीप पिके हाती आल्याने कृषी वर्ग आनंदी असतो, म्हणून याच सुमारास होळी व दिवाळी यांसारखे सण साजरे केले जातात. 

       फाल्गुनोत्सव म्हणजे होळीचा सण. फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी होते. वद्य प्रतिपदेला धुळवड आणि वद्य पंचमीला रंगोत्सव साजरा होऊन शिमग्याचा सण संपतो



           धुळवडीच्या दिवशी अंतज्याला स्पर्श करून स्नान करावे असे सांगितलेले आहे. कामसूत्रामध्ये सुद्धा वात्स्यायनाने होलिकोत्सवाचा उल्लेख केलेला आहे. तसेच कामसूत्रावरील टीकेत यशोधर सांगतो की पिचकारीत पळसाच्या फुलांच्या रंगाचे पाणी भरून ते आणि बुक्का एकमेकांच्या अंगावर फेकणें ही क्रिडा फाल्गुणी पौर्णिमेला करायला हवी. आता ही क्रिडा वद्य पंचमीला करतात. 

         होळी बद्दल अनेक दंतकथा प्रचलित आहेत. होलिका नावाची एक राक्षसी होती, तिला लहान मुले खाण्याची सवय होती. गावात सतत घडणाऱ्या अशा हिंस्र प्रकारामुळे गावकर्यांनी तिला वेढले, मारले आणि त्या पश्चात तिला जाळले,याचे होळी हे प्रतिक.तिच्या प्रती द्वेष ,तिरस्कार प्रकट करण्यासाठी गावकरी बिभत्स अपशब्दांच्या घोषणा त्या दिवशी करतात. तिच्या निर्भत्सनासाठी उलट्या हाताने बोंबा मारणे, शिवीगाळ करणे, अपशब्द वापरणे हे लहानापासून मोठ्या वयोवृद्धापर्यंत सर्व च करतात, जे आजही सामान्यतः पाहायला मिळते. 




होलिका ही हिरण्यकश्यपू ची कन्या, तर काही ठिकाणी ती हिरण्यकश्यपू ची बहीण होती असे ही उल्लेख म्हणतात. कपटाने जाळावे अशी तिच्या पित्याची आज्ञा असल्याने तिने प्रल्हादास मांडीवर घेतले. मात्र भगवान विष्णू ने आपल्या भक्ताचे रक्षण केले आणि तिलाच भस्म केले. 


तर होलिका ही संवताची बहिण, फाल्गुनी पौर्णिमेला संवताचा अंत होतो व त्याच्या च चितेवर ती स्वत:ला जाळून घेते.अशा अनेक लौकिक कथा प्रचलित आहेत. तसेच फाल्गुन पौर्णिमेला मदनाचे भस्म झाले असे ही उल्लेख आढळतात, आणि त्यामुळे याच काळात मदनोत्सव सुद्धा साजरा केला जात होता. 


उत्सवार्थ अग्नी प्रज्वलित करण्याची परंपरा संस्कृतीपुर्वकालीन आहे. या प्रथेंचेही प्रत्यंतर या उत्सवांत येते. 

Monday 7 March 2022

कंदुकधारिणी किंवा कंदुकावती

 


Revanasiddeshwar temple  kalgi, kalburgi district, Karnataka.


          मंदीराच्या बाह्यांगावर आढळणाऱ्या स्त्रीशिल्पांना सुरसुंदरी, देवांगना किंवा अप्सरा  असे म्हणतात. क्षिरार्णवात 32,शिल्पप्रकाशात 16 तर काही शिल्पशास्त्रीय ग्रंथात 24 देवांगणाचे प्रकार आढळतात. मात्र या व्यतिरिक्त ही अन्य सुरसुंदरी दिसून येतात, त्यापैकीच एक म्हणजे हातात कंदुक(चेंडू) घेऊन खेळत नृत्य करणारी स्त्री म्हणजेच "कंदुकधारिणी  किंवा कंदुकावती"

कंदुक हा मूळात संस्कृत शब्द असून,त्याचा अर्थ चेंडू असा आहे, ज्यास हिंदीमध्ये गेंद किंवा गेंदू म्हणतात. बोलीभाषेमूळे कंदूचा गेंदू, चेंडू असा अपभ्रंश झाला असावा.

प्राचीन काळातील अनेक उत्सवांपैकीच एक कंदुकोत्सव. कंदुक खेळण्याचे साधन तर होतेच, शिवाय ते नृत्य करताना ही वापरले जात, तत्संबंधी चे नियम तंत्र, गतीचे नियमन, चूणीक्रिया, क्षयपद, चंक्रमण,मध्यम गती इ. बाबत वर्णन दंडीने केले आहे. प्रत्येक महिन्याच्या कृतिका नक्षत्रात विंध्यवासिनी देवीच्या पूजनार्थ राजकुमारी कंदुकावती कंदुकनृत्य करत असल्याची माहिती दंडीने दिली आहे. तसेच हरिवंशात श्रीकृष्णाच्या कंदुकक्रिडेचे संदर्भ आहेत.



काही ठिकाणी कंदुकधारिणीच्या पायाशी सेविका असून ती चेंडू पुरवत आहे. याशिवाय खजुराहो येथील जावरी मंदिर, लक्ष्मण मंदिर, कंदारिया मंदिर येथे ही कंदुकधारिणी शिल्प आढळते. येथील एका स्त्रीच्या हातात फळीसदृश्य वस्तू असून त्यावर तिने कंदुक तोलला आहे. मात्र हे शिल्प भग्न असून तिच्या चेहर्याचा पाषाण फुटलेला आहे. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील अंभई येथील वडेश्वर मंदिरावर दोन कंदुकधारिणी असून मार्कंडी, नागदा इ. ठिकाणी ही कंदुकधारिणी आढळतात.

मंदिर हे जरी अध्यात्माचे प्रतिक असले तरी, मंदिरावरील प्रत्येक शिल्पाचा अर्थ अध्यात्माशीच संबंधित नसतो. त्यापैकी अनेक शिल्पे सामाजिक, सांस्कृतिक परंपरेची साक्ष देत असतात.

✍️


स्थपती

 स्थपती व्यंकटेश्वरा अप्पा..  " कर्तृत्व नेहमीच शब्दांपेक्षा चेहरा अधिक सांगते "..  याची जाणीव होणारे काही क्षण... मी वाचलेलं होत,...