छण,खण आणि क्षण याचा अपभ्रंश म्हणजे आजचा हा सण.
मनुष्य हा उत्सवप्रिय आहे. काही सणांचे महत्त्व हे सांस्कृतिक असते तर काही ऐतिहासिक असते, तसेच काही सण नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असतात,अर्थातच सुर्याची स्थिती,कृषी संपत्ती, समृद्धी इत्यादी गोष्टींवर अवलंबून असतात. मकर, मेष, कर्क,तुळ या राशीमध्ये जेव्हा सूर्य प्रवेश करतो, तेव्हा मकरसंक्रांती सारखे महत्त्वाचे सण साजरे करतात. मेष संक्रांतीच्या सुमारास रब्बी तर तुळ संक्रांतीच्या सुमारास खरीप पिके हाती आल्याने कृषी वर्ग आनंदी असतो, म्हणून याच सुमारास होळी व दिवाळी यांसारखे सण साजरे केले जातात.
फाल्गुनोत्सव म्हणजे होळीचा सण. फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी होते. वद्य प्रतिपदेला धुळवड आणि वद्य पंचमीला रंगोत्सव साजरा होऊन शिमग्याचा सण संपतो.
धुळवडीच्या दिवशी अंतज्याला स्पर्श करून स्नान करावे असे सांगितलेले आहे. कामसूत्रामध्ये सुद्धा वात्स्यायनाने होलिकोत्सवाचा उल्लेख केलेला आहे. तसेच कामसूत्रावरील टीकेत यशोधर सांगतो की पिचकारीत पळसाच्या फुलांच्या रंगाचे पाणी भरून ते आणि बुक्का एकमेकांच्या अंगावर फेकणें ही क्रिडा फाल्गुणी पौर्णिमेला करायला हवी. आता ही क्रिडा वद्य पंचमीला करतात.
होळी बद्दल अनेक दंतकथा प्रचलित आहेत. होलिका नावाची एक राक्षसी होती, तिला लहान मुले खाण्याची सवय होती. गावात सतत घडणाऱ्या अशा हिंस्र प्रकारामुळे गावकर्यांनी तिला वेढले, मारले आणि त्या पश्चात तिला जाळले,याचे होळी हे प्रतिक.तिच्या प्रती द्वेष ,तिरस्कार प्रकट करण्यासाठी गावकरी बिभत्स अपशब्दांच्या घोषणा त्या दिवशी करतात. तिच्या निर्भत्सनासाठी उलट्या हाताने बोंबा मारणे, शिवीगाळ करणे, अपशब्द वापरणे हे लहानापासून मोठ्या वयोवृद्धापर्यंत सर्व च करतात, जे आजही सामान्यतः पाहायला मिळते.
होलिका ही हिरण्यकश्यपू ची कन्या, तर काही ठिकाणी ती हिरण्यकश्यपू ची बहीण होती असे ही उल्लेख म्हणतात. कपटाने जाळावे अशी तिच्या पित्याची आज्ञा असल्याने तिने प्रल्हादास मांडीवर घेतले. मात्र भगवान विष्णू ने आपल्या भक्ताचे रक्षण केले आणि तिलाच भस्म केले.
तर होलिका ही संवताची बहिण, फाल्गुनी पौर्णिमेला संवताचा अंत होतो व त्याच्या च चितेवर ती स्वत:ला जाळून घेते.अशा अनेक लौकिक कथा प्रचलित आहेत. तसेच फाल्गुन पौर्णिमेला मदनाचे भस्म झाले असे ही उल्लेख आढळतात, आणि त्यामुळे याच काळात मदनोत्सव सुद्धा साजरा केला जात होता.
उत्सवार्थ अग्नी प्रज्वलित करण्याची परंपरा संस्कृतीपुर्वकालीन आहे. या प्रथेंचेही प्रत्यंतर या उत्सवांत येते.
No comments:
Post a Comment