Tuesday 24 January 2023

Memories of Beluru..

धावणाऱ्या आयुष्यात कुठेतरी थांबावस वाटतं ते या ठिकाणी...

     मंदिरातील अध्यात्मिक वातावरण, जाणीवा, संवेदना,कला,इतिहास,परमेश्वराच अस्तित्व,या सर्व गोष्टी सभामंडपातील एका कोपऱ्यात बसून तासंतास अनुभवायला आवडतं,,या धावणाऱ्या आयुष्याला खर्या अर्थाने ब्रेक द्यावा वाटतो, थांबावस वाटत ते फक्त याच ठिकाणी... 




     सकाळी सकाळी धुक्यात न्हाहुन निघालेल्या वातावरणात, मंदिराच्या सुशोभीकरणासाठी कार्यरत असलेल्या स्त्रियांसोबत राहुन प्रांगणात पाणी शिंपण, रांगोळी काढणं,उत्सवाच्या दिवशी तोरण बांधणं, ध्यान मंत्रोच्चार करण यात जे सुख होतं ते शब्दात केव्हाच मांडता येणार नाही. खूप शिकवले या जागेने, पुन्हा एकदा नव्या उमेदीने आयुष्याच वाळवंट तुडवण्यासाठी खंबीर बनवलं.. खरोखरच विधात्याच्या दारी आलो की सारं कसं sorted होऊन जातं आयुष्य.. तो हवाच पाठीशी, सोबत आणि पुढे ही मार्ग दाखवण्यासाठी..



       पूर्ण चार दिवस या मंदिराच्या सहवासात राहण्याचं सुख काही औरच... खुप सुंदर आठवणी आणि क्षण..जग जेव्हा साखर झोपेत असतं अगदी त्या वेळी पहाटे मंदिरासमोरील एका लहानशा टपरीवरील आजीच्या हातचा कडक चहा...पक्षांचा किलबिलाट.. कानावर पडणारे व्यंकटेश्वरा सुप्रभातम स्त्रोत... डोळ्यासमोर दिसणारे गोपूरम.. त्या भोवती पारव्यांच्या ठराविक तीन प्रदक्षिणा... त्यापुढे दिसणारा पाषाणांचा जिवंत देखावा..एवढी रम्य सकाळ आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो.... त्यानंतरचा पूर्ण दिवस ही मंदिरामध्ये, मंदिर परिसरामध्ये च व्यतीत करणं. . संध्याकाळी सूर्यास्त आणि संध्या आरतीसाठी हजर असणं.. त्यानंतर चालणारी रात्रीची भजन ऐकण आणि रात्री दहा वाजेपर्यंत, मंदिर बंद होईपर्यंत तिथेच घुटमळत राहणं...मंदिर बंद झाल्यावर नंतर च रिसॉर्टकडे कडे परतणं...असा ठरलेला नित्यक्रम..



.प्रवास माणसाला जुन्या चा नवा बनवतो ते खरच आहे.. या जागेने खुप गोष्टी शिकवल्या काही समजावून सांगितल्या, अन् काही नकळतपणे अंगिकारले गेल्या.. आयुष्याच वाळवंट तुडवण्यासाठी मनात मृगजळ निर्माण केला तो याच जागेने... आणि म्हणून च काही जागा फक्त खास असतात... त्याबद्दल असलेल्या भावनांना कागदावर उतरवणं तस कठीणच, पण तरी हा लहानसा प्रयत्न..कारण मला थांबायला आवडत..खास,आवडत्या गोष्टींविषयी, व्यक्तींविषयी आणि जागे विषयी नेहमीच लिहायला आवडत.. . आणि खरोखर च मनातुन धावणाऱ्या या आयुष्यात या ठिकाणी थांबायला आवडत..... 



Shrimala K. G. 


Wednesday 4 January 2023

भासकृत चारुदत्त

 "भासकृत चारुदत्त" नाट्यकृतीतील समाज हा संपन्न होता, त्यात व्यापाऱ्यांचा वर्ग मोठा होता, व्यापारी लोक जलमार्गाने गावोगावी फिरत, अशा व्यापाऱ्यांना "सार्थवाह" म्हणत असत. आणि प्रस्तुत नाट्यकृतीचा नायक "चारुदत्त" हा "सार्थवाहपुत्र" होता. 

       'चारुदत्त' एक अभिजात रसिक, कलेचा पुरस्कर्ता, संगीताचा जाणकार असलेला, उज्जैयिनीतील एक श्रेष्ठी जो त्याच्या स्वभावामुळे ,औदार्यामुळे संपत्ती ऐश्वर्या पासून दुरावला आणि दारिद्र्यात जीवन कंठू लागला, अशा ग्रीष्मासम आयुष्यात वसंत फुलवला तो 'वसंतसेनेने'.....




            'वसंतसेना' उज्जैयिनीतील प्रसिद्ध नामांकित गणिका. चित्रकला, नृत्य - संगीतामध्ये निपुण, संपत्ती वैभवात अखंड वावरणारी वारांगना, जेव्हा संपत्ती सोडून कलेकडे केवळ एका रसिक माणसाकडे ,त्याच्या गुणसंपत्तीकडे आकर्षित होते त्या नात्याला प्रेमाची पालवी फुटते आणि हळूहळू ते बहरू लागते मात्र ते बहरत असताना कित्येक अडचणींना सामोरे जावे लागते अर्थातच प्रवाहाच्या विरोधात वाहण कठीण असतं त्याच समर्पक वर्णन भासाने त्याच्या चारुदत्त या चार अंकी नाट्यकृतीमध्ये केले आहे. 

भासाने केवळ प्रेम कथा, शृंगार यांचे दर्शन न घडवता, तत्कालीन सामाजिक स्थिती चेही अचूक दर्शन घडविले आहे. वाचताना प्रेमकथेचे रहस्यकथेमध्ये कसे रूपांतर होते हे भासाच्या नाटकाचे एक वैशिष्ट्य वाचकाला हळूहळू उलगडत जाते. चारुदत्त-वसंतसेना यांच्या नात्याची वीण, बहरणारे प्रेम, मिलन , मनोवस्था या प्रेमसंबंधातील प्रकट शृंगारापेक्षा प्रेम भावना मुग्ध ठेवण्यातच अधिक सौंदर्य आहे, या सौंदर्याबाबत रसिक मनात काहीशी अस्वस्थता, जिज्ञासा व कुतूहल यांचा मिलाफ राखून ठेवण्यातच कदाचित भासाने आपल्या नाट्यकृतीचे साफल्य मानले असावे. 

तत्कालीन समाज संपन्न होता. व्यापारी वर्ग समृद्ध होता. अर्थातच जेव्हा आर्थिक परिस्थिती अगदी सुस्थितीत सुरळीत असते तेव्हा आपोआप मनुष्य प्रवृत्ती विलास प्रिय बनते, विलासाकडे वळते. आणि त्यातूनच गणिकांचा व्यवसाय भरभराटीस आला. समाज मान्य झाला. 

समाजात स्वैराचाराची स्वतंत्र मुभा तर होतीच शिवाय शास्त्र-वेद पठणालाही अतिशय महत्त्व होते. 'गणिका या रस्त्याच्या बाजूला बहरलेल्या वेलीसारख्या असतात, त्यांना कोणीही येऊन खुडावे असं त्यांचं जीवन असत'. मात्र तरीही गणिकेच्या वाड्यात नित्यनेमाने दररोज शास्त्र चर्चा, वेद-पठण, पूजापाठ, दानधर्म पाकसिद्धी, गायन वादन चालत असे. व्यवसाय देहविक्रीचा असला तरी शिलाने त्या कायम श्रेष्ठ राहत. अश्या सुसंस्कृत आणि अभिरुची संपन्न असणाऱ्या गणिकांचे भाव विभोर चित्रण भासाने प्रस्तुत नाट्यकृतीत केले आहे. 

चारुदत्ताच्या पत्नी व मुलांसमवेत असलेले वसंतसेनेचे सौख्याचे नाते ,यावरून त्या काळात प्रेम आणि शृंगारस कुठल्याच बंधनात बांधलेले नव्हते हे लक्षात येते. शिवाय त्याकाळी बौद्ध धर्माचा ही प्रसार होत असल्याचे भासाने दिलेल्या बौद्ध भिक्खूंच्या दाखल्यावरून लक्षात येते. 




भासाने मनोदशा ,प्रेम भावना ,शृंगार, प्रेम रस यांपेक्षा घटनांना अधिक प्राधान्य दिलेले आहे. अर्थातच शृंगार प्रेमभावना यांमुळे प्रेमाची रूप, त्याची नानाविध रंग, छटा प्रकट होतील मात्र घटनांच्या मालिकेने समस्त सामाजिक प्रवृत्ती प्रकट होते. मनुष्य प्रवृत्ती ,वर्णव्यवस्था, धार्मिक,सामाजिक मूल्ये, इत्यादी बाबींचे दर्शन घडते.

* 'प्रत्येक प्रेमकथा जशी दोन मनांशी जोडलेली असते त्याप्रमाणे ती समाजाशी सुद्धा संलग्न असते', अश्या भासाच्या नाट्य विश्वात प्रत्येक रसिक मनाने फेरफटका मारायला च हवा, भासकृत चारुदत्त नाट्यकृती वाचायला हवी.. 


Shrimala K. G. 


स्थपती

 स्थपती व्यंकटेश्वरा अप्पा..  " कर्तृत्व नेहमीच शब्दांपेक्षा चेहरा अधिक सांगते "..  याची जाणीव होणारे काही क्षण... मी वाचलेलं होत,...