Thursday 29 December 2022

Vitthal Rukmini temple, Pangaon, Latur

 

प्रस्तुत "विठ्ठल-रुक्मिणी" मंदिर लातूर जिल्ह्यातील पानगाव या गावामध्ये स्थित आहे. मध्यवर्ती भागात असलेल्या या मंदिरास तीन प्रवेशद्वार व एक गर्भगृह असून, मुख्य प्रवेशद्वारास नंदिनी द्वार शाखा आहे,तर ललाटबिंबावर गणेशाचे अंकन आहे. खालील बाजूस वैष्णव द्वारपाल, निधी, चामरा ,जलदेवता यांचे अंकन दिसते. त्याबाजूस सुंदर जालवातायनाची नक्षी, समोरील कर्णिकेवर देवांगना, तर कक्षासनाच्या बाहेरील बाजूस कित्येक लघुशिल्प कोरलेले आहेत, लघुशिल्पांमध्ये प्रामुख्याने मिथुन शिल्प व सुरसुंदरींचे अंकन केलेले आहे.



 सभामंडपात रंगशिळेभोवती चौकोनी तळखडा असलेले चार पूर्ण स्तंभ आहेत,तर एकूण सोळा स्तंभ आहेत. रंगशिळेभोवती असलेल्या स्तंभाच्या मध्यभागी एरोबॅक्स नक्षीवर स्थानिक लोकांनी सोन्याचा पत्रा बसवून, त्यावर चांदीचा गरुड लावलेला आहे. तर स्तंभाच्या वरील बाजूस लाकडी नक्षी, खुले छत लाकडी आधार दिलेले असून वरील मजला जाळीदार लाकडी बांधकामाचा दिसून येतो, त्याच ठिकाणी मंदिरावर बांधलेल्या आधुनिक शिखराकडे जाण्याचा रस्ता आहे. सभामंडपात प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस नवीन आधुनिक बांधणीचे देवकोष्टक आहे, ज्यामध्ये देवपूजेची साम्रगी ठेवली जाते. अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस लोकमान्यतेनुसार सत्यभामा आहे,तर तिच्या बाजूला विष्णू मूर्ती दिसते .अंतराळाच्या डाव्या बाजूस असलेल्या देवकोष्टकात आधुनिक गणेश मूर्ती आणि त्या बाहेर भिंतीमध्ये बसवण्यात आलेली जुनी विष्णू मूर्ती दिसते. अंतराळाचे प्रवेशद्वार स्तंभ, जालवातायनांनी युक्त असून, खालील बाजूस कीर्तीमुख व लोझेन्स कोरलेले आहेत. ललाटबिंबावर गजलक्ष्मीचे अंकन तर उत्तरांगावर मकर तोरणामध्ये मध्यभागी वामन असावा.




अंतराळात प्रवेश केल्यानंतर गर्भगृहाचे प्रवेशद्वार नजरेस पडते, यास काळा तैलरंग लावलेला आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास नंदिनी द्वारशाखा आहे, त्यामध्ये रत्नशाखा, व्यालशाखा, स्तंभ-शाखा, नरशाखा आणि लता शाखा आहेत. या शाखेच्या खालील बाजूस निधी, वैष्णव द्वारपाल, जलदेवता, यांचे अंकन आहे, त्या खालील बाजूस कोरीव चंद्रशिळा असून ललाटबिंबावर गणेशाचे अंकण आहे.सद्यकाळात गर्भगृहामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, मात्र वास्तवत: हे मंदिर भगवान विष्णूचे असावे.

मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस पालखी सोहळ्यातील रथ ठेवलेला दिसतो, येथील कर्णिकेवरील देवांगना आणि त्याखालील भारवाहक हे विशेष आकर्षक आहेत. कर्णिकेवरील  देवांगनांमध्ये - दर्पणा,अभिसारिका, आलसा ,नृत्यांगना विषकन्या ,कर्पूरमंजिरी ,इत्यादी आहेत.मंदिराच्या बाह्य भागाची रचना स्तंभासमान असून मंडोवरावर शुकसारिका, अभिसारिका, विषकन्या ,कर्पूरमंजिरी ,दर्पणा, पुत्रवल्लभा, चामरा, आलसा, रती ,मदन, कंदुकावती, इत्यादी सूरसुंदरीचे अंकन केलेले आहे.



या मंदिराच्या मंडोवरावरील देवांगना व कर्णिकेवरील देवांगना यांमध्ये खूप अंतर आहे. कदाचित ते वेगवेगळ्या कलाकाराने कोरलेले असावे, कर्णिकेवरील देवांगना या मंडोवरावरील देवांगनापेक्षा अत्यंत सुबक ,सुंदर व आकर्षक आहेत, चेहऱ्यावरील भाव, हालचाल, वेशभूषा,हवेत हेलकावणारे उत्तरीय,सर्वच बारकावे अगदी कोरीव, उत्कृष्ट आहेत, मात्र मंडोवरावरील देवांगना त्या मानाने काहीशा सामान्य दाखवल्या आहेत, कमी उंचीच्या ,गोलाकार चर्येच्या, कोरलेल्या आहेत.



मंडोवरावरील मुख्य तीन देवकोष्टकामध्ये अनुक्रमे विष्णूचा वराह अवतार ,योग विष्णू असून तिसऱ्या देवकोष्टकात असलेली देवता दुर्दैवाने सद्य स्थितीत ओळखता येऊ शकत नाही ,कारण त्यातील मूर्तीवर खूप जास्त प्रमाणात शेंदुराचा लेप लावण्यात येतो, त्या मूर्तीस "सटवाई" नामाभिधान देऊन, आजही या ठिकाणी लहान मुलांचे केस कापण्याचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. केवळ त्या देवकोष्टकातील मूर्तीच नव्हे तर त्याखालील बराचसा भाग पूर्णतः शेंदुराने लेपलेला आहे .लहान मुलांचे केस त्याच ठिकाणी कुंभ कर्ण यादरम्यान खोचून ठेवल्याचे दिसतात. लोकांची श्रद्धा कमी पडली कि ती आपोआप अंधश्रद्धेकडे वळतात पण त्यामध्ये कितीतरी मूर्ती शिल्प उध्वस्त होत असतात, त्यातलंच हे एक पानगाव चे उदाहरण..


प्रस्तुत मंदिर परिसरात ही मोठ्या प्रमाणात मंदिराचे विखुरलेले अवशेष पाहायला मिळतात. असा समृद्ध वारसा सध्या केवळ भेट देण्यापुरताच मर्यादित नसून तो जपण्याकरिता सुद्धा आहे, हे प्रत्येकाने जाणावे.

Shrimala K. G.

स्थपती

 स्थपती व्यंकटेश्वरा अप्पा..  " कर्तृत्व नेहमीच शब्दांपेक्षा चेहरा अधिक सांगते "..  याची जाणीव होणारे काही क्षण... मी वाचलेलं होत,...