Friday 25 March 2022

सुर्यनारायण मंदिर, कालगी

              

         स्थापत्य शिल्पवैभवाने समृद्ध असलेले कालगी गाव रौद्रावती नदीच्या खळखळाटाने अधिक च शोभिवंत वाटते. येथील शिलालेखानुसार या एका गावात त्या काळी तब्बल तीस मंदिरे होती. या गावास एक समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या ठिकाणी सर्वत्रच मुर्ती शिल्प, मंदिर, बारवं, पुष्करणी,पाहायला मिळतात. संपुर्ण गावात तसेच गावानजिक च्या परिसरात मुर्ती शिल्प इतरत्र विखुरलेले दिसतात. विशेष बाब अशी की या गावास तटबंदी आहे. समृद्धता काय असते, हे येथे आल्यावर समजते, एवढे प्रचंड वैभव या गावास लाभले आहे. कर्नाटकात अशी कित्येक लहान सहान गाव आहेत,जी स्थापत्य शिल्प वैभवाने समृद्ध असून ही ती जगाच्या दृष्टीआड अजूनही आहेत, ती प्रकाशझोतात यायलाच हवी.




प्रस्तुत सूर्यनारायण मंदिर हे कर्नाटकातील कलबुर्गी (गुलबर्गा) जिल्ह्यातील कालगी या ठिकाणी आहे. रौद्रावती नदी तीरावरील प्रस्तुत मंदिर कल्याणी चालुक्य काळातील असून पुर्वाभिमुख ,त्रिदल रचनेचे आहे. म्हणजे च तीन गर्भगृह, आणि एक सभामंडप, पैकी दोन गर्भगृहात शिवलिंग आहे तर तिसरे गर्भगृह रिक्त असुन,.त्यामध्ये वितानाचे भग्नावशेष पडलेले दिसतात.

            स्थापत्य शास्त्राच्या नियमानुसार विचार केला तर सद्य काळात दिसणारे शिवलिंग हे या मंदिरातील मुख्य देवता नसावी,हे मंदिर भगवान विष्णू चे असावे.या तिनही गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील ललाटबिंबावर अनुक्रमे गणेश, गजलक्ष्मी आणि लक्ष्मी.चे अंकन आहे. सभामंडपाचे वितान ढासळलेले असल्याने सध्या ते खुले आहे, म्हणजे च केवळ गर्भगृह आणि अंतराळाचेच वितान सद्यस्थितीत आहे.नंतरच्या काळात स्थानिक लोकांनी सभामंडपामध्ये नंदी ची स्थापना केलेली आहे.




    येथे असणाऱ्या द्वारशाखा म्हणजे कलेचे साधनेचे अत्युच्च द्योतक आहे,येथे हस्तिणी द्वारशाखा असुन खालील बाजूस द्वारपाल, चामरधारिणी,निधी त्याखालील बाजुस चंद्रशिळा यांचे अत्यंत सुबक अंकन केले आहे.या ठिकाणी वितानावर सुंदर कमल पुष्प, व त्याबाजुस किर्तीमुखाचे अंकन दिसते,एवढेच नव्हे तर गर्भगृहातील विताने ही अलंकृत दिसतात. येथील वितान होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिराच्या वितानाशी साधर्म्य दर्शवितात. डाव्या बाजूस असलेल्या गर्भगृहात प्रवेश करताना बाजूस एका स्तंभावर शिलालेख कोरलेला दिसतो.



    मंदिराचा जंघाभाग काही अंशी ढासळला असला तरी तो अत्यंत अलंकृत आहे. वेदीबंदाच्या प्रत्येक भागावर सुंदर बारीक नक्षीकाम केलेले आहे तसेच त्यावर लघु देवकोष्टके ही आहेत. बारकाईने पाहिल्यास प्रत्येक लघु देवकोष्टकात विविधता दिसून येते.काही लघु देवकोष्टकात विष्णू तर काही स्त्रिशिल्पे कोरल्याची दिसतात.या लघु देवकोष्टकांचे तोरण अत्यंत वैशिष्ट्यपुर्ण आणि वैविध्यपूर्ण आहेत.अधिष्ठानावर कोरीव लोझेन्स चा थर आहे. अधिष्ठानाचा बराचसा भाग आजही जमिनीखाली आहे, त्यानंतर वेदीबंद, जंघा आणि कपोत अशी सर्वसाधारण रचना आहे. मंदिराच्या जंघाभागावर कर्पूरमंजरी, विषकन्या, शत्रूमर्दिनी, पद्मगंधा,आलसा,स्थानक उमा माहेश्वर,रती-मदन,भैरव इ. तसेच काही पुरुष प्रतिमांचे सुद्धा शिल्पांकन केलेले आहे.त्यासहीतच बाहेरील उजव्या बाजूस गजथर, बकथर दिसून येतात. दुर्दैवाने या भव्य मंदिराचा काही भाग ढासळलेला असल्याने, मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भग्नावशेष विखुरलेली दिसतात. 



✍️shrimala K. G . 

     

No comments:

Post a Comment

स्थपती

 स्थपती व्यंकटेश्वरा अप्पा..  " कर्तृत्व नेहमीच शब्दांपेक्षा चेहरा अधिक सांगते "..  याची जाणीव होणारे काही क्षण... मी वाचलेलं होत,...