Saturday, 27 August 2022

कदम्ब पुष्प

       कद्दम, कलंव, कलंब अशी बरीच नाव असणारी कदम्बाची गोंडस फुल हिंदुस्थानात सर्वत्रच आढळतात. मेघाची पहिली गर्जना ऐकली की कदम्बांना कळ्या येतात आणि पावसाची पहिली सर पडताच ते फुलु लागतात, असे महाकवी कालिदासाच्या मेघदूतात म्हटले आहे, तसेच विक्रमोर्वशीय मध्ये सुद्धा उल्लेख आहेत. पुर्वी या कदम्बांच्या फुलांपासून मद्यार्क काढले जात. कदम्बांचा श्रीकृष्ण लीलांशी निकट संबंध आहे शिवाय मेरु पर्वतावरील चार मुख्य छायावृक्षामध्ये कदम्बाला स्थान आहे.असे म्हणतात की, कदम्बाची फुले कामीजणांना उत्तेजित करतात, कदम्बाला हलिप्रिय असे नाव मिळाले आहे,कारण हल हे बलरामाचे अस्त्र, आणि तो विख्यात मद्यपी हलधर. 

         कदंब घराण्याचा या कदम्ब वृक्षाशी असणाऱ्या संबंधांच्या दंतकथा सांगितल्या जातात, शिवाय महत्त्वाचे म्हणजे हाल सातवाहनाच्या गाथासप्तशती मध्ये कदम्ब फुलांचे कितीतरी उल्लेख आहेत. गाथेतील कित्येक नायिका अभिसरणासाठी कदम्बाचे च संकेतस्थान नियोजित करताना दिसतात. तसेच शृंगारा साठी कदम्बाची फुले वापरत असताना दिसतात. 



**गाथासप्तशतीतील कदम्बाचे काही निवडक उल्लेख:-


गाथा क्र 37 - डोंगरातील नदीच्या पुरात वाहत असलेली कदम्बाची फांदी भोवर्यात सापडल्याने तिच्यावरील फुलांचे पराग तुटून गेले आहेत, त्या फुलांना बिलगलेला भ्रमर जरा बुडतो, जरा वर येतो, पुन्हा बुडतो, तरी तो त्यावरील आपले स्नेह सोडीत नाही. 


गाथा क्र 177 - सखी, दुसरी कोणतीही फुल मला व्यथित करत नाहीत, कदम्बाची फुले मात्र मला या दिवसांत व्याकुळ करतात, ती कामदेवाच्या गलोलांतील गोंड्यासारखी दिसतात.





गाथा क्र 314 - प्रियकर दृष्टी पडताच मी दोन्ही हातांनी डोळे झाकून घेतले, पण कदम्बाच्या अंगप्रत्यंगावर फुले डंवरतात, त्याप्रमाणे माझ्या सर्वांगावर रोमांच फुलले, ते कसे झाकू? 


असे आणखी बरेच कदम्ब पुष्पाचे उल्लेख गाथासप्तशती मध्ये आढळतात,तसेच मेघदूत, विक्रमोर्वशीय मध्ये ही कदम्बाचे जागोजागी उल्लेख आहेत. यावरून च या गोंडस फुलाचे प्राचीनत्व, महत्त्व लक्षात येते. 

No comments:

Post a Comment

स्थपती

 स्थपती व्यंकटेश्वरा अप्पा..  " कर्तृत्व नेहमीच शब्दांपेक्षा चेहरा अधिक सांगते "..  याची जाणीव होणारे काही क्षण... मी वाचलेलं होत,...