Tuesday 30 November 2021

कल्याण-सुंदर शिव पार्वती विवाह एक संपन्न कलाकृती

 

जेव्हा मानवी भावभावनांची निर्झरा पाषाणातून उस्फूर्तपणे खळाळते, तेव्हा पूर्णार्थाने शिल्पाकृती श्वास घेऊ लागते.

 ज्यांच्या श्रम, कौशल्य अन् कल्पनाविष्काराने पाषाणास वाचा फुटली अन् नवनवीन कलाकृतींचा जन्म झाला, अशा कलाकारांचे कसब खरोखरच उल्लेखनीय आहे.


  वेरूळ मधील लेणी क्रमांक 16 अर्थात कैलास लेणे, येथे बाहेरील स्तंभ मालिकेच्या ओवरीत असलेल्या शिल्पपटात एक शिल्पपट 'शिवपार्वती विवाह सोहळ्याचा' आहे, यात शिव-पार्वती एकमेकां समक्ष उभे असून शिव चतुर्भुज आहे, त्याचा समोरील उजवा हात पार्वतीच्या हाती असून मागील उजव्या हातात काही तरी वस्तू आहे, शिवाचा पुढील डावा हात पार्वतीच्या स्कंधावर असून, मागील डाव्या हातात कमलपुष्प आहे.काही ठिकाणी पाणिग्रहण समयी, अलिंगन वा हनुस्पर्श केल्याचे ही दाखवले आहे. विवाह प्रसंग असल्याने सहाजिकच शिव अलंकारांनी अलंकृत झालेला दिसतो. मस्तकावर किरीट मुकुट, कानात कुंडले, गळ्यात ग्रीवा, दंडात केयूर ,पायाच्या दोन्ही अंगठ्यात अंगुलियक परिधान केलेले आहेत, शिवाय उत्तरीय व मेखला सुद्धा या ठिकाणी दिसून येतो. तर पार्वती ही शिवाच्या डाव्या बाजूस किंचित मान झुकवून उभी आहे.

        पाषाणात दडलेली सलज्ज ,सालंकृत, सौंदर्य शील नववधू दर्शवण्यास कलाकाराला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले आहे. पार्वतीने घातलेला केसांचा अंबाडा मानेवर रुळतो आहे. तर पार्वतीने गळ्यात ग्रीवा,हार सूत्र, कानी कुंडले, दंडात वलयांकित केयूर, हाती कंकण, कमरेस मेखला,पायी पैंजण ,अंगठ्यात अंगुलियक,इ.अलंकार परिधान केले आहेत. तर खालील बाजूस ब्रम्हदेव प्रस्तुत विवाहाचे पौरोहित्य करताना दिसतात. काही वेळा यझातील अग्नी मनुष्य रुपात सुद्धा दाखवला जातो. 



विशेष बाब अशी की येथील शिल्पपटात पार्वतीने केवळ एकाच पायात पैंजण परिधान केल्याचे अंकित केले आहे.अर्थातच विवाह या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि महत्त्वाच्या क्षणी सहाजिकच सामान्य माणसाची ही धांदल उडते, तो एक खूप महत्त्वाचा बदल असतो.हर्ष, भय, लज्जा अशा कित्येक भावनांचं ते एकत्रीकरण असतं. मनाच्या अशा संमिश्र अवस्थेत गोंधळ उडणे सहाजिक आहे..देवदेवतांना मुर्तरूप देणे म्हणजे केवळ मूर्ती घडवणे एवढेच नव्हे, तर त्या मूर्तीवर मानवी भावभावनांचा शिडकावा करणेही तेवढेच आवश्यक होय, हे येथे या शिल्पकाराने उत्तम रित्या दाखवून दिले आहे.विवाह घटिका समीप आल्याने बावरून गेलेली पार्वती एका पायात पैंजण घालण्याचे विसरलेली आहे हे दाखवून कलाकाराने कलेचे अत्युच्च शिखरच गाठले आहे. खरोखरच कलाकाराच्या कल्पनाविलासाला शतशः नमन..!

✍Shrimala K.G.

No comments:

Post a Comment

स्थपती

 स्थपती व्यंकटेश्वरा अप्पा..  " कर्तृत्व नेहमीच शब्दांपेक्षा चेहरा अधिक सांगते "..  याची जाणीव होणारे काही क्षण... मी वाचलेलं होत,...