गोदावरी नदीच्या तीरावर असलेले प्रस्तुत "गुप्तेश्वर मंदिर" 'पूर्वाभिमुख' आहे.
दहा फूट उंचीच्या अधिष्ठानावर मंदिर उभारले असून, सद्या अधिष्ठानावर केवळ गजथर दिसतो. मंदिरास तीन प्रवेशद्वार आणि एक गर्भग्रह असल्याने खुले सभामंडप या ठिकाणी दिसून येते. मुख्य प्रवेशद्वारासमोर अधिष्ठानावर वृंदावन आहे जे नंतरच्या काळात मंदिराच्या डागडुजी वेळी बांधण्यात आले आहे. तीनही प्रवेशद्वारावर नंदिनी द्वार शाखा असून केवळ दोन बाजूस मुखमंडप ,कक्षासने दिसून येतात. सभामंडपात आधुनिक फरशा बसवलेल्या आहेत. सभामंडपात एकूण चार देवकोष्टक असून सध्या ते रिक्त आहेत. सभामंडपातील रंगशिळा 12 फूट × 12 फूट असून त्याभोवती चार मुख्य स्तंभ आहेत तर एकूण 18 स्तंभांनी सभामंडपाचे वितान तोलले आहे, पैकी मध्यभागी असलेले वितान अधिक अलंकृत केल्याचे दिसते, त्यामध्ये कमलपुष्पा सहित चारही बाजूस किर्तीमुखाचे अंकदिसतेे ,व इतर सर्व वितानावर केवळ कमलपुष्प कोरण्यात आली आहेत. रंगशिळेभोवती असलेले चार स्तंभ अधिक अलंकृत आहेत. चौकोनी तळ खडा असलेल्या या स्तंभांवर सुंदर लोझेन्स, अॅरोबॅक्स ची नक्षी आहे. सभामंडपामध्ये डाव्या बाजूस प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला सुंदर जालवातायनाचे अंकन केले आहे.
सभामंडपातून अंतराळात प्रवेश करताना अंतराळाचे अलंकृत प्रवेशद्वार नजरेत भरते.प्रवेशद्वारावरील उत्तरांग आणि वितान यांना पुन्हा जोडण्याकरिता स्थानिक लोकांनी दोन लंबवर्तुळाकार पाषाण उभ्या स्थितीत बसवलेले आहेत, जेणेकरून ढासळत्या भागास आधार मिळेल. अंतराळाच्या प्रवेशद्वारास दोन अलंकृत स्तंभ व त्या बाजूस सुंदर जालवातायन, द्वाराच्या खालील बाजूस किर्तीमुखा चे अंकन, तर ललाटलिंबावर गणेशाचे अंकन दिसते, उत्तरांगावर मकर तोरणा मध्ये मध्यभागी गणपती, त्या अलीकडे डाव्या बाजूस मारुती, तर उजव्या बाजूस शिवलिंगाची आराधना करणारी स्त्री उत्किर्णीत करण्यात आली आहे.
या ठिकाणी अंतराळात नंदी ची स्थापना केली आहे सहाजिकच हे स्थानिक लोकांनी केले असावे. नंदिनी द्वार शाखा असलेले अलंकृत प्रवेशद्वार रत्न, नर, स्तंभ, व्याल, लता अशा शाखांनी युक्त आहे. खालील दोन्ही बाजूस अनुक्रमे निधी, चामरधारिणी, वैष्णव द्वारपाल,चामरधारिणी, आणि जया, तर खालील बाजूस अनुक्रमे गज, कीर्तिमुख लोझेन्स नक्षी, पुन: कीर्तिमुख गज यांचे अंकन केलेले आहे, त्यासमोर सुंदर चंद्रशिला, तर ललाटबिंबावर गणेशाचे अंकन दिसते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास काळ्या रंगाचा लेप लावलेला आहे.
गर्भगृहात एका मध्यम आकाराच्या चौरसाकृती ओट्यावर शिवलिंग, त्या बाजूस त्रिशूळ, डमरू पहावयास मिळतो. हे मंदिर मूळत: विष्णूचे आहे, येथील विष्णूची मूर्ती तस्करी प्रकरणामुळे गावातील दुसऱ्या मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात आली होती, असे स्थानिक सांगतात. मंदिराचा बाह्यभाग पाहता, मंदिराची रचना सर्वसाधारणपणे अधिष्ठान, वेदीबंद, जंघाभाग, कपोत आणि शिखर अशी आहे.
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस असलेल्या कक्षासनाबाहेरील लघु शिल्पांत कित्येक कामशिल्पे, प्रसूती शिल्प, स्त्री शिल्प, पाहायला मिळतात. तसेच डाव्या प्रवेशद्वाराबाहेरील लघु शिल्पांत ही काम शिल्प प्रामुख्यानं पाहायला मिळतात. मात्र उजव्या प्रवेशद्वारासमोर ढासळलेल्या कित्येक स्तंभांचा ढिगारा पाहायला मिळतो. या लघु शिल्पांच्या खालील बाजूस गजथर दिसतो, या थरातील गज हे युद्धातील असावेत, ज्यांनी त्यांच्या सोंडेने शत्रूस मारले आहे, तर काही ठिकाणी शस्त्रास्त्रासहित वीर गजारूढ झालेला आहे, तर काही ठिकाणी गज व इतर प्राण्यांची लढाई सुद्धा दाखविण्यात आली आहे.
येथे वेदीबंदावर कसलीही नक्षी नसून ,जंघाभाग बराच उंच आहे, त्यामुळे अभ्यासकाला शिल्पांची अनुभूती पूर्ण मान वर केल्याशिवाय घेता येणार नाही. बाह्य भागावर प्रमुख तीन देवकोष्टके आहेत त्यामध्ये श्रीधर ,ऋषिकेश यांच्या प्रतिमा पाहायला मिळतात. प्रदक्षिणा क्रमानुसार मंडोवरावर अनुक्रमे पत्रलेखा, पुत्र वल्लभा, शत्रू मर्दिनी, विष्णू , नाग आणि विंचू धारिणी, नृत्य गणेश, चामरा, मृदला, शत्रु मर्दिनी, आलसा,विंचू धारिणी, डालमालिका, विषकन्या ,पद्मगंधा, मोहिनी, दर्पणा, डालमालिका, मदन, वीणावादिनी, मर्कटवस्त्रहरणा, शुभगामिनी, विषकन्या, चामुंडा, डालमालिका, बासरीवादक, विष्णू, पुत्रवल्लभा, छत्र धारण केलेली स्त्री आणि कर्पुरमंजिरी यांचे अंकन दिसते.
शिखराचा भाग विटांनी बनलेला आहे, तर आतील पोकळ भागात लाकडाचे अवशेष दिसतात, यावरून आतून आधारा करिता लाकडाचा सुद्धा वापर केल्याचे लक्षात येते. सद्य काळात दुर्दैवाने शिखरास मधोमध भलेमोठे भगदाड पडले आहे ,ज्यामुळे आतील पोकळ जागा, विटांची बांधणी, लाकडाचे अवशेष सहजगत्या दिसून येतात.
पंच भूमीचे, लता युक्त शिखर म्हणजे खरोखरच स्थापत्यशास्त्राचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
"संत जनाबाई" यांची जन्मभूमी असलेल्या 'गंगाखेड' शहरापासून केवळ 19 किलोमीटर अंतरावर असलेल्या 'धारासुर' या लहानशा गावात प्रस्तुत "गुप्तेश्वर मंदिर" आहे. सद्यकाळात हे मंदिर अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत आहे. कित्येक पाषाण कोसळून मंदिराच्या पायथ्याशीच त्यांचा ढिगारा झाला आहे. प्रदक्षिणा पथाचा मागील भाग पूर्णत: ढासळलेला असल्याने, एक पूर्ण प्रदक्षिणा सुद्धा घेता येणार नाही. अंतराळाच्या प्रवेशद्वारावरील पाषाण कोसळला आहे, अंतराळात प्रवेश केल्यानंतर ही चढ-उतार पणा, भेगा जाणवतात ,त्यामुळे केवळ पूजाविधी करिता गर्भगृह अंतराळ खुले केले जाते, या खेरीज तेथे जाण्यास मनाई केली आहे. त्यासाठी अंतराळाच्या द्वारास आधुनिक लोखंडी द्वार बसवून कायम ते कुलूप बंद ठेवतात.
दरडी कोसळल्या सारखे येथील पाषाण केव्हाही कोसळू शकतात, त्यामुळे येथे स्वतःच्या जबाबदारीने प्रवेश करावा, आपात्कालीन घटना घडल्यास मंदिर कमिटी, गावकरी जबाबदार राहणार नाहीत, असा फलक सभामंडपात लावलेला आहे. यावरूनच मंदिराच्या सद्य स्थितीचे गांभीर्य लक्षात येते.
एक-दोन वर्षापूर्वी येथील गावकऱ्यांनी या मंदिराच्या संवर्धनासाठी उपोषण सुद्धा केले होते, मात्र अद्याप कोणतेही संवर्धन या ठिकाणी झालेले नाही. केवळ थोडीशी डागडुजी गावकऱ्यांना मार्फत केलेली आहे.
मंदिराचे वय वाढवण्यासाठी आज संवर्धन केले नाही तर, उद्या हाती केवळ ढासळलेले दगडी चिरे लागतील. एवढे प्रचंड सौंदर्य , उत्कृष्ट स्थापत्य दुर्लक्षित आहे ही निव्वळ खेदाची बाब असून , जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचावे, ढासळत्या पाषाणाचे गांभीर्य लक्षात यावे , याकरिता हा एवढा लिखाणाचा प्रपंच... ✍️
Shrimala K. G.