Friday, 24 March 2023

Warangal..

 "वारंगल"

माझ्या आवडत्या शहरांपैकीच एक शहर... .या शहरासाठी मनाचा एक कोपरा राखून ठेवला आहे, आठवणींनी आणि जाणिवांनी भरून ठेवला आहे. त्या कोपऱ्यात बसून मला पुन्हा पुन्हा माझ्या आवडता शहरात हरवायला, विसरायला, आणि विहारायला आवडतं..अशी आपली शहराशी असलेली नाती हळूहळू इतकी घट्ट आणि खास होऊ लागतात की एका स्पेसिफिक पाँइंट नंतर ती सुद्धा एखाद्या व्यक्तीसारखी वाटायला लागतात. या जाणिवा खूप सुंदर असतात आणि असाव्या अशा जाणिवा आपल्या ठेवणी मध्ये...शेवटी जाणिवा,आठवणी आणि क्षणांशिवाय उरणारच काय आहे आयुष्यभराच्या आपल्या ठेवणीमध्ये.. 



    हे शहर मी खूप जगले आहे,अगदी मनापासून मनापर्यंत...कधी डोळे मिटून बंद पापण्या आड तर कधी उंच डोंगरावर बसून सताड उघडा डोळ्यांनी हे शहर अनुभवलं आहे.... जगलं आहे...काकतीयांच्या राजधानीचे हे शहर.. आणि या शहरात मला हवे तसे भटकायला मिळते यापेक्षा सुंदर गोष्ट ती काय असणार....माझ्या साठी कर्नाटक, तेलंगणा म्हणजे खुप जिव्हाळ्याचे विषय...वारंगल तेलंगणा मध्ये.. खुप साधी सरळ आणि सहज लोक ज्यांना काकतीयांचा सार्थ अभिमान वाटतो. इतिहासाबद्दल, विधात्याबद्दल आणि संस्कृती बद्दल अपार प्रेम आहे. एकंदरीत, सहजता जगण्यात टिकवून ठेवणार्या माणसांबद्दल मला विशेष आदर वाटतो.अश्या लोकांच्या शहरामध्ये,मला पंधरा वीस दिवस मनसोक्त राहायला जगायला मिळाले, काकतीयांच्या राजधानीमध्ये, वैभवामध्ये मन भरून वावरता आले, आयुष्याचे कितीतरी रंग अनुभवता आले...स्वत:सोबत फिरायला मिळाले .सुख म्हणजे यापेक्षा काही वेगळ नसतं... 



   मी नेहमीच प्रत्येक शहराकडे भूतकाळाच्या दृष्टिकोनातून पाहते आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने ते शहर मला भावते. एकविसाव्या शतकातील जवळपास सगळीकडे westernization झालेल्या शहरांकडे, वर्तमानाच्या नजरेने मी कधीच पाहू शकले नाही वा मला तसे कधी जमले ही नाही ,कारण कुठेतरी ते पटायचे नाही मनाला आणि डोळ्याला ही.. झाडांनी बहरावं, फुलावं, व्यापावं अवघं आकाश ही..पण मातीत रुतलेल्या त्या मुळांचं भान ठेवून.. त्याचं मोल उमजून, त्यांना विसरून नव्हे....मुळांना विसरून बहरायचं असेल तर मला बहरायचं ही नाही अशा माझ्या वैचारिकतेला वर्तमानाच्या नजरेने शहर पाहता तर येईल पण कधीच डोळ्यातून मनात उतरवता येणार नाही.. त्यामुळे मला तरी शहरांना इतिहासाच्या दृष्टीकोनातून पाहायला आवडत, आणि आवडत्या प्रत्येक गोष्टींविषयी लिहायला ही आवडत..त्यामुळे हा उपद्व्याप. 

✍️Shrimala K.G. 



   

स्थपती

 स्थपती व्यंकटेश्वरा अप्पा..  " कर्तृत्व नेहमीच शब्दांपेक्षा चेहरा अधिक सांगते "..  याची जाणीव होणारे काही क्षण... मी वाचलेलं होत,...