पुस्तकाच्या पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत येण्याचा प्रवास प्रत्येक वाचकाचा वेगवेगळा असतो, प्रत्येक वाचक आपापल्या दृष्टिकोनातून वाचतो आणि वैचारिकतेनुसार ते आत्मसात करत असतो, त्यावरच खऱ्या अर्थाने अवलंबून असतं ते वाचकाच वाचणं आणि जगणं...
माझ्या बाबतीत तशी मी पुस्तक कमीच वाचली पण जेवढी वाचली आहेत त्यापेक्षा जास्त ती जगली आहेत, त्यामुळे प्रत्येकच पुस्तक, कादंबरी ,कवितासंग्रह त्या त्या दृष्टीने माझ्यासाठी खासच आहेत. त्यापैकीच एक म्हणजे काजल ओझा वैद्य द्वारा लिखित "कृष्णायन" ( अनुवाद- डॉ. अंजना संधीर).
कृष्ण हा अवलिया समजण्यासाठी आयुष्य खर्ची करावं लागतं, तेव्हा कुठे एखादा अंश उमजतो. परमात्मा श्रीकृष्ण ईश्वर असूनही मर्त्यलोकांत त्याने मानवासारखेच जीवन जगले, सामान्य माणसांप्रमाणेच तो भावनांत बंधनात अडकला, नात्यांत गुरफटला, अगदी शेवटच्या क्षणी आयुष्याचा सूर्यास्त होत असतो त्या क्षणी हा कृष्ण रुपी अथांग सागर कितीतरी भावनांची सोनेरी किरणे पिऊन घेत होता... तरी त्याची तहान शमावणारी नव्हती, त्याला समाधान नव्हते, आनंद नव्हता, मुक्त होण्याच्या क्षणी सारी बंधने आठवून विव्हळणारा श्रीकृष्ण जगायचा असेल तर कृष्णायन नक्कीच वाचावं.. मैत्री, प्रेम, जबाबदाऱ्या सारं काही करून सुद्धा शेवटी ओंजळ फक्त आठवणींनी आणि आठवणींमुळे होणाऱ्या वेदनेनेच भरत असते...एवढंस कोड कितीतरी प्रश्न उत्तरांच्या शृंखलेत सोडवताना श्रीकृष्ण येथे दिसतो.
वेदनेच्या विळख्यात तळमळणारा श्रीकृष्णाचा मानवी देह मुक्त होण्यासाठी झुंजत असतो..मुक्त होण्याच्या क्षणी जर काही बांधून ठेवत असतं तर ती म्हणजे बंधने...भावनांची...नात्यांची..आणि त्यातल्या प्रेमाची...
आयुष्यात बंधन ही फक्त बांधूनच ठेवू शकतात...मनुष्याला आणि मनुष्य रूपातील देवाला ही.... खुद्द परमात्मा सुद्धा सुटू शकला नाही या बंधनातून तिथे आपल्यासारख्या सामान्यांचे काय ठाव लागणार....!
जो परमात्मा आपली दुःख जाणतो त्याची दुःख आपणही केव्हा तरी जाणावी आणि त्यासाठी हे पुस्तक आणि अशी कितीतरी पुस्तक आवर्जून वाचावी....!
Shrimala K.G.