Sunday, 10 September 2023

स्थपती

 स्थपती व्यंकटेश्वरा अप्पा.. 


"कर्तृत्व नेहमीच शब्दांपेक्षा चेहरा अधिक सांगते".. 

याची जाणीव होणारे काही क्षण...




मी वाचलेलं होत, sthapati should be well- versed in all shastras. He should know the knowledge of rhythm (chandas), puranas, mathematics and astrology. 

He should be joyous, truth speaking, polite with senses under control. Balanced himself in body and mind. 

And yes, it is absolutely correct.


वास्तविक स्थपती ला भेटल्यानंतर च, वरील वाक्यातील तथ्यता जाणवते. स्थपती व्यंकटेश्वरा अप्पा, ज्यांनी 

 Warangal मधील thousand pillar temple चे restoration केले आहे.

Just look at him...एका मोठ्या कार्यक्रमात बोलवले असताना ही, तेच साधे राहणीमान,इस्त्री न केलेले कपडे,गळ्यात पंचा, आपल्या च तंद्रीत मग्न राहून फक्त निरीक्षण करत राहण, अशा लोकांबद्दल मला अमाप आदर वाटतो...


खरोखरच, कर्तृत्व नेहमी शब्दांपेक्षा चेहरा च अधिक सांगत.. चेहर्यावर असीम शांती, संयम जी कधीही पुढे पुढे करणारी नाही, ना कोणाशी स्पर्धा करणारी नाही, अहंकार, तिरस्कार असे कुठलेच भाव नाहीत.. अशा सागराच्या गर्तेत फक्त डुंबायच असतं, मनसोक्तपणे....

त्यांच्या ज्ञानाचा, कलेचा भरभरून आनंद लुटायचा असतो... 


*आयुष्यातला माणुस याहून वेगळा नसतो... 





Monday, 4 September 2023

आम्ही दोघी..

 प्रवास सुखद तेव्हा होतो ,जेव्हा जागा सुंदर असतात आणि जागा सुंदर तेव्हाच वाटतात, जेव्हा तिथली माणसं आपलीशी वाटतात.खरोखरच जागा या माणसांमुळे खास बनतात आणि प्रवास हा एका योग्य सोबती मुळे... कारण 'सोबत' खरोखर च मॅटर करते आयुष्यात'... 

केवळ दोन ठिकाणांमधला प्रवासच नव्हे तर "मैत्रीचा, प्रेमाचा, नात्यांचा प्रवास देखील तेव्हाच अर्थपूर्ण आणि सुंदर वाटायला लागतो, जेव्हा सोबतीला आपल्यासारखाच बेभान होणारा सहप्रवासी लाभतो".





"प्रवासातला सर्वात मोठा आनंद म्हणजे आपल्यासारखाच बेभान होणारा सहप्रवासी भेटणं".. हे वपुंच वाक्य काही वर्षांपूर्वी पुस्तकामध्ये वाचलेलं, त्याची अनुभुती मात्र खर्या अर्थाने फिल्ड विझीट वेळी जाणवते.. 

 आम्ही दोघी..

आठ दिवसाच्या फिल्डवर्क साठी एक महिना भटकलो, मिळेल तशी स्थानिक वाहनं, जेमतेम खाणं, तात्पुरती झोप, उन्हाळा, मोठ्या दोन बॅग्ज, ग्रामीण भाग आणि कितीतरी साईट्स.. प्रत्येक गोष्टी ची गैरसोय असुन ही फिरणं थांबल नाही, आपण थांबवल नाही, actually गैरसोय झाल्याशिवाय फिरणं काय असतं कळत ही नसत..उन्हाळ्यात भर दुपारी मेन हायवे वरुन, तर कधी खेड्यांच्या पायवाटेने, कधी गावातील लहान रस्त्यांवरुन मोठ्या बॅग्ज घेऊन चालत राहण आपल्या साठी कधी च hectic नव्हत, त्या ही परिस्थितीत  तो क्षण आपण बिनधास्त जगला, कितीतरी चर्चा करत ते क्षण आयुष्याभरासाठी मैत्रीच्या कुपीत बंद केले.. कधी प्रगल्भ व्यक्ती सारख्या चर्चा, तर कधी लहान मुलांसारख्या टिंगलटवाळक्या.. परिस्थिती कशीही असो, आपण हसणं आणि फिरणं कधीही थांबवल नाही, मुळात त्या थांबवण्यासारख्या गोष्टी च नाहीएत अस मला वाटत.. कितीतरी अडचणी आल्या पण आपण त्यावर ही खदखदुन हसायचो, उगाच किरकिर आणि नशिबाला दोष देत बसणारे आपण  नव्हतो आणि कदाचित त्यामुळे च आपला प्रवास अर्थपुर्ण झाला. मैत्री ची कितीतरी रंग सोबत अनुभवली, मनापासून जगली..



 अजिंठ्याच्या लेण्यांपासुन ते अन्वा मंदिरापर्यंत कितीतरी चर्चा रंगत असतं, आणि येथे च खऱ्या अर्थाने एकमेकांची प्रगल्भता, वैचारिक पातळी, विचारांची खोली जाणवू लागते आणि प्रवास अर्थपुर्ण होऊ लागतो.. ह्या सगळ्यांत एक गोष्ट अशी घडली की आपलं नातं प्रगल्भ झालं. मैत्रीच्या परिसीमा गाठल्या त्या ह्याच field visit मध्ये. दोघींचे plus minus points कळले..असं म्हणतात ना की खरी मैत्री तीच जी माणसाला त्याच्या गुण दोषांसकट स्वीकारते, आणि ह्या प्रवासात हे खूप जवळून अनुभवता आलं आणि नातं बहरू लागलं.... कायम हा प्रवास लक्षात राहील आणि असे अनेक प्रवास घडो एकमेकींच्या साथीने...


Written by आम्ही दोघी ❤

Friday, 28 April 2023

कृष्णायन।।

 पुस्तकाच्या पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत येण्याचा प्रवास प्रत्येक वाचकाचा वेगवेगळा असतो, प्रत्येक वाचक आपापल्या दृष्टिकोनातून वाचतो आणि वैचारिकतेनुसार ते आत्मसात करत असतो, त्यावरच खऱ्या अर्थाने अवलंबून असतं ते वाचकाच वाचणं आणि जगणं... 

माझ्या बाबतीत तशी मी पुस्तक कमीच वाचली पण जेवढी वाचली आहेत त्यापेक्षा जास्त ती जगली आहेत, त्यामुळे प्रत्येकच पुस्तक, कादंबरी ,कवितासंग्रह त्या त्या दृष्टीने माझ्यासाठी खासच आहेत. त्यापैकीच एक म्हणजे काजल ओझा वैद्य द्वारा लिखित "कृष्णायन" ( अनुवाद- डॉ. अंजना संधीर). 



कृष्ण हा अवलिया समजण्यासाठी आयुष्य खर्ची करावं लागतं, तेव्हा कुठे एखादा अंश उमजतो. परमात्मा श्रीकृष्ण ईश्वर असूनही मर्त्यलोकांत त्याने मानवासारखेच जीवन जगले, सामान्य माणसांप्रमाणेच तो भावनांत बंधनात अडकला, नात्यांत गुरफटला, अगदी शेवटच्या क्षणी आयुष्याचा सूर्यास्त होत असतो त्या क्षणी हा कृष्ण रुपी अथांग सागर कितीतरी भावनांची सोनेरी किरणे पिऊन घेत होता... तरी त्याची तहान शमावणारी नव्हती, त्याला समाधान नव्हते, आनंद नव्हता, मुक्त होण्याच्या क्षणी सारी बंधने आठवून विव्हळणारा श्रीकृष्ण जगायचा असेल तर कृष्णायन नक्कीच वाचावं.. मैत्री, प्रेम, जबाबदाऱ्या सारं काही करून सुद्धा शेवटी ओंजळ फक्त आठवणींनी आणि आठवणींमुळे होणाऱ्या वेदनेनेच भरत असते...एवढंस कोड कितीतरी प्रश्न उत्तरांच्या शृंखलेत सोडवताना श्रीकृष्ण येथे दिसतो. 



वेदनेच्या विळख्यात तळमळणारा श्रीकृष्णाचा मानवी देह मुक्त होण्यासाठी झुंजत असतो..मुक्त होण्याच्या क्षणी जर काही बांधून ठेवत असतं तर ती म्हणजे बंधने...भावनांची...नात्यांची..आणि त्यातल्या प्रेमाची... 

आयुष्यात बंधन ही फक्त बांधूनच ठेवू शकतात...मनुष्याला आणि मनुष्य रूपातील देवाला ही.... खुद्द परमात्मा सुद्धा सुटू शकला नाही या बंधनातून तिथे आपल्यासारख्या सामान्यांचे काय ठाव लागणार....! 

जो परमात्मा आपली दुःख जाणतो त्याची दुःख आपणही केव्हा तरी जाणावी आणि त्यासाठी हे पुस्तक आणि अशी कितीतरी पुस्तक आवर्जून वाचावी....! 

Shrimala K.G.







Friday, 24 March 2023

Warangal..

 "वारंगल"

माझ्या आवडत्या शहरांपैकीच एक शहर... .या शहरासाठी मनाचा एक कोपरा राखून ठेवला आहे, आठवणींनी आणि जाणिवांनी भरून ठेवला आहे. त्या कोपऱ्यात बसून मला पुन्हा पुन्हा माझ्या आवडता शहरात हरवायला, विसरायला, आणि विहारायला आवडतं..अशी आपली शहराशी असलेली नाती हळूहळू इतकी घट्ट आणि खास होऊ लागतात की एका स्पेसिफिक पाँइंट नंतर ती सुद्धा एखाद्या व्यक्तीसारखी वाटायला लागतात. या जाणिवा खूप सुंदर असतात आणि असाव्या अशा जाणिवा आपल्या ठेवणी मध्ये...शेवटी जाणिवा,आठवणी आणि क्षणांशिवाय उरणारच काय आहे आयुष्यभराच्या आपल्या ठेवणीमध्ये.. 



    हे शहर मी खूप जगले आहे,अगदी मनापासून मनापर्यंत...कधी डोळे मिटून बंद पापण्या आड तर कधी उंच डोंगरावर बसून सताड उघडा डोळ्यांनी हे शहर अनुभवलं आहे.... जगलं आहे...काकतीयांच्या राजधानीचे हे शहर.. आणि या शहरात मला हवे तसे भटकायला मिळते यापेक्षा सुंदर गोष्ट ती काय असणार....माझ्या साठी कर्नाटक, तेलंगणा म्हणजे खुप जिव्हाळ्याचे विषय...वारंगल तेलंगणा मध्ये.. खुप साधी सरळ आणि सहज लोक ज्यांना काकतीयांचा सार्थ अभिमान वाटतो. इतिहासाबद्दल, विधात्याबद्दल आणि संस्कृती बद्दल अपार प्रेम आहे. एकंदरीत, सहजता जगण्यात टिकवून ठेवणार्या माणसांबद्दल मला विशेष आदर वाटतो.अश्या लोकांच्या शहरामध्ये,मला पंधरा वीस दिवस मनसोक्त राहायला जगायला मिळाले, काकतीयांच्या राजधानीमध्ये, वैभवामध्ये मन भरून वावरता आले, आयुष्याचे कितीतरी रंग अनुभवता आले...स्वत:सोबत फिरायला मिळाले .सुख म्हणजे यापेक्षा काही वेगळ नसतं... 



   मी नेहमीच प्रत्येक शहराकडे भूतकाळाच्या दृष्टिकोनातून पाहते आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने ते शहर मला भावते. एकविसाव्या शतकातील जवळपास सगळीकडे westernization झालेल्या शहरांकडे, वर्तमानाच्या नजरेने मी कधीच पाहू शकले नाही वा मला तसे कधी जमले ही नाही ,कारण कुठेतरी ते पटायचे नाही मनाला आणि डोळ्याला ही.. झाडांनी बहरावं, फुलावं, व्यापावं अवघं आकाश ही..पण मातीत रुतलेल्या त्या मुळांचं भान ठेवून.. त्याचं मोल उमजून, त्यांना विसरून नव्हे....मुळांना विसरून बहरायचं असेल तर मला बहरायचं ही नाही अशा माझ्या वैचारिकतेला वर्तमानाच्या नजरेने शहर पाहता तर येईल पण कधीच डोळ्यातून मनात उतरवता येणार नाही.. त्यामुळे मला तरी शहरांना इतिहासाच्या दृष्टीकोनातून पाहायला आवडत, आणि आवडत्या प्रत्येक गोष्टींविषयी लिहायला ही आवडत..त्यामुळे हा उपद्व्याप. 

✍️Shrimala K.G. 



   

Tuesday, 24 January 2023

Memories of Beluru..

धावणाऱ्या आयुष्यात कुठेतरी थांबावस वाटतं ते या ठिकाणी...

     मंदिरातील अध्यात्मिक वातावरण, जाणीवा, संवेदना,कला,इतिहास,परमेश्वराच अस्तित्व,या सर्व गोष्टी सभामंडपातील एका कोपऱ्यात बसून तासंतास अनुभवायला आवडतं,,या धावणाऱ्या आयुष्याला खर्या अर्थाने ब्रेक द्यावा वाटतो, थांबावस वाटत ते फक्त याच ठिकाणी... 




     सकाळी सकाळी धुक्यात न्हाहुन निघालेल्या वातावरणात, मंदिराच्या सुशोभीकरणासाठी कार्यरत असलेल्या स्त्रियांसोबत राहुन प्रांगणात पाणी शिंपण, रांगोळी काढणं,उत्सवाच्या दिवशी तोरण बांधणं, ध्यान मंत्रोच्चार करण यात जे सुख होतं ते शब्दात केव्हाच मांडता येणार नाही. खूप शिकवले या जागेने, पुन्हा एकदा नव्या उमेदीने आयुष्याच वाळवंट तुडवण्यासाठी खंबीर बनवलं.. खरोखरच विधात्याच्या दारी आलो की सारं कसं sorted होऊन जातं आयुष्य.. तो हवाच पाठीशी, सोबत आणि पुढे ही मार्ग दाखवण्यासाठी..



       पूर्ण चार दिवस या मंदिराच्या सहवासात राहण्याचं सुख काही औरच... खुप सुंदर आठवणी आणि क्षण..जग जेव्हा साखर झोपेत असतं अगदी त्या वेळी पहाटे मंदिरासमोरील एका लहानशा टपरीवरील आजीच्या हातचा कडक चहा...पक्षांचा किलबिलाट.. कानावर पडणारे व्यंकटेश्वरा सुप्रभातम स्त्रोत... डोळ्यासमोर दिसणारे गोपूरम.. त्या भोवती पारव्यांच्या ठराविक तीन प्रदक्षिणा... त्यापुढे दिसणारा पाषाणांचा जिवंत देखावा..एवढी रम्य सकाळ आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो.... त्यानंतरचा पूर्ण दिवस ही मंदिरामध्ये, मंदिर परिसरामध्ये च व्यतीत करणं. . संध्याकाळी सूर्यास्त आणि संध्या आरतीसाठी हजर असणं.. त्यानंतर चालणारी रात्रीची भजन ऐकण आणि रात्री दहा वाजेपर्यंत, मंदिर बंद होईपर्यंत तिथेच घुटमळत राहणं...मंदिर बंद झाल्यावर नंतर च रिसॉर्टकडे कडे परतणं...असा ठरलेला नित्यक्रम..



.प्रवास माणसाला जुन्या चा नवा बनवतो ते खरच आहे.. या जागेने खुप गोष्टी शिकवल्या काही समजावून सांगितल्या, अन् काही नकळतपणे अंगिकारले गेल्या.. आयुष्याच वाळवंट तुडवण्यासाठी मनात मृगजळ निर्माण केला तो याच जागेने... आणि म्हणून च काही जागा फक्त खास असतात... त्याबद्दल असलेल्या भावनांना कागदावर उतरवणं तस कठीणच, पण तरी हा लहानसा प्रयत्न..कारण मला थांबायला आवडत..खास,आवडत्या गोष्टींविषयी, व्यक्तींविषयी आणि जागे विषयी नेहमीच लिहायला आवडत.. . आणि खरोखर च मनातुन धावणाऱ्या या आयुष्यात या ठिकाणी थांबायला आवडत..... 



Shrimala K. G. 


Wednesday, 4 January 2023

भासकृत चारुदत्त

 "भासकृत चारुदत्त" नाट्यकृतीतील समाज हा संपन्न होता, त्यात व्यापाऱ्यांचा वर्ग मोठा होता, व्यापारी लोक जलमार्गाने गावोगावी फिरत, अशा व्यापाऱ्यांना "सार्थवाह" म्हणत असत. आणि प्रस्तुत नाट्यकृतीचा नायक "चारुदत्त" हा "सार्थवाहपुत्र" होता. 

       'चारुदत्त' एक अभिजात रसिक, कलेचा पुरस्कर्ता, संगीताचा जाणकार असलेला, उज्जैयिनीतील एक श्रेष्ठी जो त्याच्या स्वभावामुळे ,औदार्यामुळे संपत्ती ऐश्वर्या पासून दुरावला आणि दारिद्र्यात जीवन कंठू लागला, अशा ग्रीष्मासम आयुष्यात वसंत फुलवला तो 'वसंतसेनेने'.....




            'वसंतसेना' उज्जैयिनीतील प्रसिद्ध नामांकित गणिका. चित्रकला, नृत्य - संगीतामध्ये निपुण, संपत्ती वैभवात अखंड वावरणारी वारांगना, जेव्हा संपत्ती सोडून कलेकडे केवळ एका रसिक माणसाकडे ,त्याच्या गुणसंपत्तीकडे आकर्षित होते त्या नात्याला प्रेमाची पालवी फुटते आणि हळूहळू ते बहरू लागते मात्र ते बहरत असताना कित्येक अडचणींना सामोरे जावे लागते अर्थातच प्रवाहाच्या विरोधात वाहण कठीण असतं त्याच समर्पक वर्णन भासाने त्याच्या चारुदत्त या चार अंकी नाट्यकृतीमध्ये केले आहे. 

भासाने केवळ प्रेम कथा, शृंगार यांचे दर्शन न घडवता, तत्कालीन सामाजिक स्थिती चेही अचूक दर्शन घडविले आहे. वाचताना प्रेमकथेचे रहस्यकथेमध्ये कसे रूपांतर होते हे भासाच्या नाटकाचे एक वैशिष्ट्य वाचकाला हळूहळू उलगडत जाते. चारुदत्त-वसंतसेना यांच्या नात्याची वीण, बहरणारे प्रेम, मिलन , मनोवस्था या प्रेमसंबंधातील प्रकट शृंगारापेक्षा प्रेम भावना मुग्ध ठेवण्यातच अधिक सौंदर्य आहे, या सौंदर्याबाबत रसिक मनात काहीशी अस्वस्थता, जिज्ञासा व कुतूहल यांचा मिलाफ राखून ठेवण्यातच कदाचित भासाने आपल्या नाट्यकृतीचे साफल्य मानले असावे. 

तत्कालीन समाज संपन्न होता. व्यापारी वर्ग समृद्ध होता. अर्थातच जेव्हा आर्थिक परिस्थिती अगदी सुस्थितीत सुरळीत असते तेव्हा आपोआप मनुष्य प्रवृत्ती विलास प्रिय बनते, विलासाकडे वळते. आणि त्यातूनच गणिकांचा व्यवसाय भरभराटीस आला. समाज मान्य झाला. 

समाजात स्वैराचाराची स्वतंत्र मुभा तर होतीच शिवाय शास्त्र-वेद पठणालाही अतिशय महत्त्व होते. 'गणिका या रस्त्याच्या बाजूला बहरलेल्या वेलीसारख्या असतात, त्यांना कोणीही येऊन खुडावे असं त्यांचं जीवन असत'. मात्र तरीही गणिकेच्या वाड्यात नित्यनेमाने दररोज शास्त्र चर्चा, वेद-पठण, पूजापाठ, दानधर्म पाकसिद्धी, गायन वादन चालत असे. व्यवसाय देहविक्रीचा असला तरी शिलाने त्या कायम श्रेष्ठ राहत. अश्या सुसंस्कृत आणि अभिरुची संपन्न असणाऱ्या गणिकांचे भाव विभोर चित्रण भासाने प्रस्तुत नाट्यकृतीत केले आहे. 

चारुदत्ताच्या पत्नी व मुलांसमवेत असलेले वसंतसेनेचे सौख्याचे नाते ,यावरून त्या काळात प्रेम आणि शृंगारस कुठल्याच बंधनात बांधलेले नव्हते हे लक्षात येते. शिवाय त्याकाळी बौद्ध धर्माचा ही प्रसार होत असल्याचे भासाने दिलेल्या बौद्ध भिक्खूंच्या दाखल्यावरून लक्षात येते. 




भासाने मनोदशा ,प्रेम भावना ,शृंगार, प्रेम रस यांपेक्षा घटनांना अधिक प्राधान्य दिलेले आहे. अर्थातच शृंगार प्रेमभावना यांमुळे प्रेमाची रूप, त्याची नानाविध रंग, छटा प्रकट होतील मात्र घटनांच्या मालिकेने समस्त सामाजिक प्रवृत्ती प्रकट होते. मनुष्य प्रवृत्ती ,वर्णव्यवस्था, धार्मिक,सामाजिक मूल्ये, इत्यादी बाबींचे दर्शन घडते.

* 'प्रत्येक प्रेमकथा जशी दोन मनांशी जोडलेली असते त्याप्रमाणे ती समाजाशी सुद्धा संलग्न असते', अश्या भासाच्या नाट्य विश्वात प्रत्येक रसिक मनाने फेरफटका मारायला च हवा, भासकृत चारुदत्त नाट्यकृती वाचायला हवी.. 


Shrimala K. G. 


Thursday, 29 December 2022

Vitthal Rukmini temple, Pangaon, Latur

 

प्रस्तुत "विठ्ठल-रुक्मिणी" मंदिर लातूर जिल्ह्यातील पानगाव या गावामध्ये स्थित आहे. मध्यवर्ती भागात असलेल्या या मंदिरास तीन प्रवेशद्वार व एक गर्भगृह असून, मुख्य प्रवेशद्वारास नंदिनी द्वार शाखा आहे,तर ललाटबिंबावर गणेशाचे अंकन आहे. खालील बाजूस वैष्णव द्वारपाल, निधी, चामरा ,जलदेवता यांचे अंकन दिसते. त्याबाजूस सुंदर जालवातायनाची नक्षी, समोरील कर्णिकेवर देवांगना, तर कक्षासनाच्या बाहेरील बाजूस कित्येक लघुशिल्प कोरलेले आहेत, लघुशिल्पांमध्ये प्रामुख्याने मिथुन शिल्प व सुरसुंदरींचे अंकन केलेले आहे.



 सभामंडपात रंगशिळेभोवती चौकोनी तळखडा असलेले चार पूर्ण स्तंभ आहेत,तर एकूण सोळा स्तंभ आहेत. रंगशिळेभोवती असलेल्या स्तंभाच्या मध्यभागी एरोबॅक्स नक्षीवर स्थानिक लोकांनी सोन्याचा पत्रा बसवून, त्यावर चांदीचा गरुड लावलेला आहे. तर स्तंभाच्या वरील बाजूस लाकडी नक्षी, खुले छत लाकडी आधार दिलेले असून वरील मजला जाळीदार लाकडी बांधकामाचा दिसून येतो, त्याच ठिकाणी मंदिरावर बांधलेल्या आधुनिक शिखराकडे जाण्याचा रस्ता आहे. सभामंडपात प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस नवीन आधुनिक बांधणीचे देवकोष्टक आहे, ज्यामध्ये देवपूजेची साम्रगी ठेवली जाते. अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस लोकमान्यतेनुसार सत्यभामा आहे,तर तिच्या बाजूला विष्णू मूर्ती दिसते .अंतराळाच्या डाव्या बाजूस असलेल्या देवकोष्टकात आधुनिक गणेश मूर्ती आणि त्या बाहेर भिंतीमध्ये बसवण्यात आलेली जुनी विष्णू मूर्ती दिसते. अंतराळाचे प्रवेशद्वार स्तंभ, जालवातायनांनी युक्त असून, खालील बाजूस कीर्तीमुख व लोझेन्स कोरलेले आहेत. ललाटबिंबावर गजलक्ष्मीचे अंकन तर उत्तरांगावर मकर तोरणामध्ये मध्यभागी वामन असावा.




अंतराळात प्रवेश केल्यानंतर गर्भगृहाचे प्रवेशद्वार नजरेस पडते, यास काळा तैलरंग लावलेला आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारास नंदिनी द्वारशाखा आहे, त्यामध्ये रत्नशाखा, व्यालशाखा, स्तंभ-शाखा, नरशाखा आणि लता शाखा आहेत. या शाखेच्या खालील बाजूस निधी, वैष्णव द्वारपाल, जलदेवता, यांचे अंकन आहे, त्या खालील बाजूस कोरीव चंद्रशिळा असून ललाटबिंबावर गणेशाचे अंकण आहे.सद्यकाळात गर्भगृहामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, मात्र वास्तवत: हे मंदिर भगवान विष्णूचे असावे.

मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस पालखी सोहळ्यातील रथ ठेवलेला दिसतो, येथील कर्णिकेवरील देवांगना आणि त्याखालील भारवाहक हे विशेष आकर्षक आहेत. कर्णिकेवरील  देवांगनांमध्ये - दर्पणा,अभिसारिका, आलसा ,नृत्यांगना विषकन्या ,कर्पूरमंजिरी ,इत्यादी आहेत.मंदिराच्या बाह्य भागाची रचना स्तंभासमान असून मंडोवरावर शुकसारिका, अभिसारिका, विषकन्या ,कर्पूरमंजिरी ,दर्पणा, पुत्रवल्लभा, चामरा, आलसा, रती ,मदन, कंदुकावती, इत्यादी सूरसुंदरीचे अंकन केलेले आहे.



या मंदिराच्या मंडोवरावरील देवांगना व कर्णिकेवरील देवांगना यांमध्ये खूप अंतर आहे. कदाचित ते वेगवेगळ्या कलाकाराने कोरलेले असावे, कर्णिकेवरील देवांगना या मंडोवरावरील देवांगनापेक्षा अत्यंत सुबक ,सुंदर व आकर्षक आहेत, चेहऱ्यावरील भाव, हालचाल, वेशभूषा,हवेत हेलकावणारे उत्तरीय,सर्वच बारकावे अगदी कोरीव, उत्कृष्ट आहेत, मात्र मंडोवरावरील देवांगना त्या मानाने काहीशा सामान्य दाखवल्या आहेत, कमी उंचीच्या ,गोलाकार चर्येच्या, कोरलेल्या आहेत.



मंडोवरावरील मुख्य तीन देवकोष्टकामध्ये अनुक्रमे विष्णूचा वराह अवतार ,योग विष्णू असून तिसऱ्या देवकोष्टकात असलेली देवता दुर्दैवाने सद्य स्थितीत ओळखता येऊ शकत नाही ,कारण त्यातील मूर्तीवर खूप जास्त प्रमाणात शेंदुराचा लेप लावण्यात येतो, त्या मूर्तीस "सटवाई" नामाभिधान देऊन, आजही या ठिकाणी लहान मुलांचे केस कापण्याचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. केवळ त्या देवकोष्टकातील मूर्तीच नव्हे तर त्याखालील बराचसा भाग पूर्णतः शेंदुराने लेपलेला आहे .लहान मुलांचे केस त्याच ठिकाणी कुंभ कर्ण यादरम्यान खोचून ठेवल्याचे दिसतात. लोकांची श्रद्धा कमी पडली कि ती आपोआप अंधश्रद्धेकडे वळतात पण त्यामध्ये कितीतरी मूर्ती शिल्प उध्वस्त होत असतात, त्यातलंच हे एक पानगाव चे उदाहरण..


प्रस्तुत मंदिर परिसरात ही मोठ्या प्रमाणात मंदिराचे विखुरलेले अवशेष पाहायला मिळतात. असा समृद्ध वारसा सध्या केवळ भेट देण्यापुरताच मर्यादित नसून तो जपण्याकरिता सुद्धा आहे, हे प्रत्येकाने जाणावे.

Shrimala K. G.

स्थपती

 स्थपती व्यंकटेश्वरा अप्पा..  " कर्तृत्व नेहमीच शब्दांपेक्षा चेहरा अधिक सांगते "..  याची जाणीव होणारे काही क्षण... मी वाचलेलं होत,...