माधवी...
भक्ती भावनेचा उत्कट संगम..! प्रितीची अबोल सरिता..!कैलासनाथाची एकनिष्ठ सेविका..! मृदंग वाद्यांच्या निनादात थिरकताना, डोळ्यांतील अचूक भाव उमजणाऱ्या त्या दोन डोळ्यांची ती परमसखी....!
कुसुम- कोमल देहात, केवढी ही कल्पकता..! पराकोटीच्या क्षणात ही केवढा हा विश्वास, भक्तीभाव....!
खरोखरच धन्य होती, ती माधवी.. ! अन् तिचा तो कलावंत.. !
पाषाणं साऱ्यांनाच दिसतात मात्र त्यात दडलेली भावगंगेची कल्पना केवळ माधवीला होते, त्या कल्पनेला प्रयत्नांची जोड लावून, वास्तविकता बनवलं ते वेड्या कलावंताने..वेड्या विश्वकर्मा ने.... !
होय, वेडाच तो.....! कारण सामान्यांसाठी कलावंताची तपस्या ही वेडीच असते. त्यांच वेगळेपण, कला, कल्पकता याला "निव्वळ वेडेपणा" ही एकच उपाधी जगाने दिली आहे. त्यामुळे साहजिकच कलावंत समजावा असा अट्टाहास करु च नये,कारण ती अशक्य कोटीतली गोष्ट आहे.
माधवीच्या कल्पनेतून, विश्वकर्मा ने साकारलेला कैलास..! दोघांच्या प्रितीचा अमर संगम म्हणजे कैलास.. ! पाषाणास जिवंतपण देत, मृत्यू लोकात उभारलेला कैलास आजही त्या माधवीस कृतज्ञता देत असल्यागत भासत..!
माधवी च्या कल्पनेची भरारी, विश्वकर्मा ची कला, सहस्र हातांचे साहाय्य त्या प्रत्येक पाषाणातून आजही डोकावू पाहत.. ! प्रत्येकच पाषाण बोलतात, हसतात, अगदी रडतात ही,किंतु ती केवळ अंतस्थचक्षू ने पहाणाऱ्यास दिसतात ..! सहस्र काळापूर्वी ची व्यथा मांडतात, किंतु ती ही ऐकणाऱ्या साठी च.. !
माधवी च्या कल्पनेतला कैलास साकारल्या नंतर, अल्पावधीतच वेडा बनलेला विश्वकर्मा, आयुष्याभर दगडांशी खेळत, डागडुजी करत, अखेरीस ही दगडी शिळेवरच आपटून, तो गेला.. ! देवलोकातील कैलास मृत्यूलोकात पाषाणाद्वारे आणणारा, स्वत:मात्र काळाच्या क्रुर जबड्यात अडकला..! एवढे अप्रतिम शिल्पवैभव आपण बनवलेले च नव्हे, अशा खुळ्या समजुतीत तो हरवला..! कायमचाच..! उरली होती फक्त माधवी.. !
कलावंताच्या मृत देहावर डोक आपटत, आक्रोश करणारी ती माधवी.. ! तळमळणारी, दु:खाने विव्हळणारी ती माधवी..! कलावंताला आसवांनी भिजवणारी ती माधवी..
होय, ती माधवी.. !आता एकटीच होती.. !
नित्यनेमाने नृत्य सेवे पश्चात कलावंताच्या स्मृती समाधीवर फुल वाहणारी माधवी आजही जणू प्रत्येक पाषाणात शोधतेय, तिच्या त्या वेड्या कलावंताला..! तिच्या परम सख्याला.. तिच्या विश्वकर्माला.... !!!
-- Shrimala K. G. 🙃
No comments:
Post a Comment