"दीपोत्सव" वसा आणि वारसा.. 🚩
दिवाळी म्हणजे, काळोखात तेवणार्या "पणत्या".....!
त्यातल्या शुभ्र वातीला मिटवणारी लुकलुकती "ज्योत",,,,!
अन आसमंत प्रकाशमान करण्याचा एक सुरेख "स्त्रोत"...!
दिवाळीत तशी सर्वच जण आपापली घरं व्यवस्थित, सुशोभित करत असतात ते काही वावगं नाही. आपापली घरे तर पशूही व्यवस्थित च ठेवतात मात्र ज्या विधात्याकडे आपले कायम मागणे असते ,अपेक्षा असतात, अशा विधात्याची निवास स्थान म्हणजेच मंदिरं व्यवस्थित, सुशोभित करणं आपल आद्यकर्तव्य ठरत.
मंदिर ही केवळ धार्मिक व अध्यात्मिक ज्ञान प्रदान करणारी केंद्रे नसून, कला,साधना,आचार-विचार ,परंपरा यांचे सूक्ष्म भावविभोर असं 'अव्यक्त' व्यासपीठ आहे जे 'व्यक्ततेत' आणण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच खरी रसिकता..!खरी कलासाधना..!
प्रचंड पाषाणातील कोरीव मंदिर ढासळलेली असली तरी बोलकीच असतात, फक्त आपल्याला बोलायला येत नाही.त्यांचे गतवैभव नष्ट झाले असले तरी त्यांच्या स्मृती कणांत ती कायम पुनरुज्जीवित होऊ पाहतात. मला वाटतं एवढी एकच गोष्ट आहे, ज्याला आपण पुनरुज्जीवित करू शकतो, पुन्हा एकदा ते सोनेरी क्षण, तो आसमंत, ती साधना,नक्कीच त्या पाषाणाच्या वाट्याला आपण देऊ शकतो ,आणि ते देण्यासाठीच ही दिवाळी, ही रोषणाई, जीर्ण मंदिरांमध्ये केली, जेणेकरून त्या दगडी चिर्यांना त्यांचे सोनेरी क्षण पुन्हा मिळतील आणि आपल्याला ही पून्हा गतवैभवाची अनुभूती मिळेल. शेवटी आपला वारसा आपणच जपायला हवा.. !
प्रकाशाची अधिक गरज ही अंधाराला असते, म्हणून पहिली पणती सोमेश्वर मंदिरात...! या मंदिराचा अधिष्ठानाचा संपूर्ण भाग आजही जमिनीखाली आहे तर दोन गर्भगृह स्थानिक लोकांच्या मनोरंजनाची, दारूची अड्डे बनलेली आहेत,पैकी मुख्य मंदिरात शिवलिंग आहे मात्र सहसा या मंदिराकडे कोणी फिरकत नाही.पावसाळ्याच्या दिवसांत पिकांच्या लागवडीमुळे तर या मंदिरापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. त्यामुळे प्रथम निवड ही सोमेश्वर मंदिराची च..!
येथील द्वारशाखेच्या प्रत्येक मूर्ती शिल्पांवर कोळ्याने जाळे विणलेले होते, सर्वत्र धूळ, माती ,कचरा लहान-सहान तृण,यांचच साम्राज्य होतं.घरातल्या प्रमाणे मंदिरातल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं, अंगणातल्या प्रमाणेच सभामंडपात पाणी शिंपणं, प्रवेशद्वारास तोरण बांधणं, रंगशिळेवर रांगोळी रेखणं,त्यात मनातल्या प्रत्येक भावनेची रंग भरणं,पणत्यांची आरास करणं, गर्भगृहातील मुख्य देवतेची पूजा अर्चा करून संध्यासमयीची आरती करणं,हे असं सुख आहे जे मांडण्यास माझ्या शब्दांत खचितच सामर्थ्य नाही. त्याची प्रचिती ही अनुभूतीतूनच होते. काही वेळापूर्वी धुळीने माखलेल मंदिर आपल्या थोड्याशा कष्टाने पुन्हा नव्याने् श्वास घेऊ लागतं, हे पाहून प्रचंड आनंद होतो.तो क्षण कायमचा आपला होऊन जातो,आयुष्यभरासाठी...या क्षणांच आणि आपलं एक घट्ट नातं जुळतं, जे मिटलेल्या पापण्यांत कायम विसावतं...सोमेश्वर मंदिरास आज खऱ्या अर्थाने गतकाळाचे ते सोनेरी क्षण दिले आणि मन कृतार्थ जाहले.
त्यानंतर सिद्दुकी याने बांधलेले सिद्धेश्वर आणि रिब्बेनायकाने बांधलेले रिब्बेश्वर मंदिर यांची अनुक्रमे सजावट केली. सभामंडपातील कीर्तन-भजन, हरिनाम,टाळ ,वीणा यांच्या मधुर निनादात माझ्या पणत्यांतील ज्योती ही हेलकावत होत्या. या मंदिरात स्थानिक लोकांचा वावर असतो, त्यामुळे सहाजिकच सर्वत्र स्वच्छता होती. त्यात रांगोळी, तोरणं, पणत्यांनी शोभा वाढविली.. त्या आसमंताची... त्या मंदिराची आणि त्या क्षणांची...
सकलेश्वराचं बारा खांबी मंदिर म्हणजे मंदिर स्थापत्याचा उत्तम दाखलाच...जिथे जाण्यासाठी स्मशानभूमी ओलांडून कच्च्या रस्त्याने जावे लागते त्यात अमावस्येची रात्र..!जेव्हा मनात लख्ख प्रकाश असतो ,तेव्हा आजूबाजूचा गर्द काळोख, स्मशानाची वाट, रातकिड्यांची किरकिर, दूरवरून येणाऱ्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज, या सर्व हॉरर माहोल चा काहीही परिणाम होत नसतो. काही वेळाच्या पायपिटीनंतर अन् थोड्याशा कष्टानंतर सकलेश्वर बारा खांबी मंदिर ही पणत्यांच्या सहवासात गतवैभव पुन्हा एकदा अनुभवू लागलं. प्रत्येक स्तंभाभोवती रांगोळी रेखत सौंदर्याची जणू आराधनाच केली गेली. या ठिकाणचे गर्भगृह अधिक खोल असून, येथील शिवलिंग सुद्धा खूप जुने आहे असे म्हणतात.
अखेरच मंदिर म्हणजे केदारेश्वराचे..! या मंदिराच्या समोरील भागाची पुनर्रचना केली आहे, एकंदरीत मंदिर सुस्थितीत आहे. मात्र दिवाळीच्या ऐन लक्ष्मीपूजन असलेल्या दिवशी गावापासून थोडे दूर अंतरावर असलेल्या या मंदिरात कोणीही फिरकणे शक्य नव्हते..मंदिर परिसर अगदी सुनसान होता,तर गर्भगृहातील शिवलिंगावर फक्त वाळलेल्या पांढऱ्या शेवंतीची काही फुलं होती, सारं काही उजाड वाटणारं दृश्य काही क्षणातच दिव्यांच्या सोनेरी लक्ख प्रकाशामध्ये न्हाऊन निघाल.. या मंदिराच्या बाह्यांगावरील पत्रलेखिका उल्लेखनीय आहे,आवर्जुन पहावी अशी...दुर्दैवाने ती खूप उंचावर आहे ,पण जुगाड नावाचा प्रकार आपल्याकडे आहे.
प्रत्येक मंदीराचा निरोप रात्री नऊच्या दरम्यान घेण्याचे निश्चित असतानाही मध्यरात्र उलटून जायची याचेही भान नसायचे एवढ ते प्रभावी सौंदर्य होत.. काळोखाला भेदणारा पणत्यांचा तो मंद प्रकाश , ती नीरव शांतता, हलकासा गारवा,निर्जन जागा अन् बोलके खांब यांच्या सहवासातील ही दिवाळी खरोखरच अविस्मरणीय होती.
✍️Shrimala K.G.