एलापुर चे कैलास.....!!
कैलास म्हणजे भारतीय कलावैभवाची अस्मिता..!
शिल्पसंहितेतील अक्षर, अनंत व अद्वितीय असा अंतिम हुंकार....!
मानवी कल्पनाशक्ती चा अनुपम अविष्कार..!
अहोरात्र राबणाऱ्या सहस्रावधी हातांचा आढावा..!
कल्पनाशक्तीचा मुर्तरुप प्रचंड देखावा..!
एक अद्भुत, अवर्णनीय ,पाषाणाला बोलके करणारी कला, म्हणजे च शिल्पकला..!
धन्य आहे तो कलाकार आणि त्याची कल्पनाशक्ती ज्याने दगडातून परमेश्वराला बाहेर काढले..मनुष्याप्रमाणे चालते बोलते केले शिवाय भावनेचा शृंगार ही केला,आणि वेदनेचा टिळा ही लाविला..
विधात्याचा हा कैलास अक्षरश: मर्त्यलोकांत, अगदी तुमच्या आमच्यांत ज्यांनी आणुन ठेविला,अशा कित्येक कलाकारांस शतशः नमन...
लेणी म्हणजे च लयनस्थापत्य. लेण म्हणजे दागिना, म्हणजे च निसर्गात कोरलेला अनमोल दागिना.
शिल्पवैभवाने समृद्ध असलेली वेरुळ लेणी ही सह्याद्री पर्वत रांगांच्या, सातमाळा रांगेमधील इंध्याद्री किंवा चरणाद्री टेकड्यांमधील पाषाणात कोरलेली आहे. अजिंठा लेणी प्रमाणे वेरुळ लेण्या कधीही स्मृती च्या पडद्याआड गेल्या नाहीत. या ठिकाणी हिंदू, बौद्ध व जैन अशा तिन्ही धर्मीय लेण्यांचा मिलाफ दिसुन येतो. त्यापैकी 16 क्रमांकाचे हिंदू लेणे म्हणजे च कैलास मंदिर, जे एकाच सलग प्रस्तरातुन साकारले अाहे, पर्वताच्या वरील बाजुने पाहीले असता, कैलास म्हणजे एका तबकात मध्यभागी रत्नजडित अलंकार ठेवल्या गत आहे, असे च वाटते. मुळ मंदिराचा प्रचंड कातळ हा डोंगराच्या चारही बाजूस काटकोनात वरपासून खालपर्यंत खोदून वेगळा केला आहे.
सपाट भिंतीचे गर्भगृह,अंतराळ, अलंकृत भव्य सभामंडप, प्रदक्षिणापथ, त्यावर पाच उप मंदिरे, समोर नंदिमंडप, त्यापुढे तीन प्रशस्त दालने,आणि प्रशस्त प्रांगण अशी एकुण एक रचना सांगता येईल.
मंदिराच्या प्रवेशद्वारावलगत असलेल्या बाह्य भिंतींवर नरसिंह,वराहअवतार, वरुण,कार्तिकेय, इत्यादी प्रतिमा पाहायला मिळतात. मंदिरात प्रवेश करताना प्रवेशद्वारावर द्रविड पद्धतीचे गोपुरम दिसते, त्यांत आठ दिशांचे स्वामी अष्टदिक्पाल आणि इतर वादकही कोरलेले आहेत. द्वाराच्या दोन्ही बाजूस दोन पुरुष प्रतिमा ,शंखनिधी व पद्मनिधी जे कुबेराचे प्रतिनिधित्व करतात. प्रवेशद्वारातून थोडे आत गेल्यानंतर उजव्या बाजूस महिषासूरमर्दिनी चा शिल्पपट आहे तर डाव्या बाजूस चतुर्भुज गणेश मूर्ती आहे, तर समोरचा प्रचंड देखावा म्हणजे गजलक्ष्मीचा शिल्प पट. त्या चारही बाजूस अर्ध स्तंभावर गदाधारी द्वारपालांचे अंकन केले आहे. तसेच डाव्या बाजूस गरुडारुढ विष्णू ,रती मदन, श्रीकृष्णाचे मूर्ती शिल्प आहेत. मुख्य मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूच्या कोपऱ्यात त्रिवेणी मंदिर आहे, गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम येथे मूर्त रुपात पाहायला मिळतो. उत्तर आणि दक्षिण बाजूला असणाऱ्या प्रांगणामध्ये पूर्णाकृती गज असून त्या बाजूस कैलास चे किर्तिस्तंभ किंवा ध्वजस्तंभ पहावयास मिळतात. तळा पासून ते स्तंभशीर्ष पर्यंत विविध कलाकुसर केलेली आहे. तर स्तंभाच्या मध्य भागावर मध्यम आकाराचे देवकोष्टक व त्याभोवती सुंदर कलाकुसर केलेली आहे. या ठिकाणी पट्टीकेवर यक्षांच्या लहान-लहान प्रतिमा आहेत. दक्षिण प्रांगणात असलेल्या कीर्ती स्तंभावर, असलेल्या देवकोष्टकामध्ये सूर्यदेवतेची समभंग, द्विभुज मूर्ती आहे. उत्तर बाजूस असलेल्या प्रांगणातील कीर्ती स्तंभावर सुद्धा यक्ष मूर्ती आहेत. त्यापैकी काही वादन करीत आहेत तर काही आनंदमग्न होऊन नृत्य करत आहेत. मुख्य मंदिराच्या बाहेरील स्तंभ मालिकेच्या ओवरीत अनेक शैव, वैष्णव मूर्ती शिल्प आहेत. त्यामध्ये रावण आपले दहावे शीर शिवलिंगावर अर्पण करीत असल्याचे शिल्प, शिवपार्वती चौसर खेळताना चे शिल्प, शिव पार्वती अलिंगण मूर्ती ,केवल शिव मुर्ती, मार्कंडेयानुग्रह, कल्याण सुंदर मूर्ती, अंधकासुर वध मूर्ती ,त्रिपुरांतक शिव मूर्ती , लिंगोद्भव मूर्ती, गंगावतरण ,नटराज, भिक्षाटन शिवमुर्ती, अर्धनारीश्वर इत्यादी मूर्ती शिल्पांचा समावेश होतो. यासह इतर हरिहर, नमस्कार मुद्रेतील विष्णू ,शेषशायी विष्णू, नरसिंह अवतार ,त्रिविक्रम अवतार ,गोवर्धन गिरीधारी श्रीकृष्ण ,कालिया मर्दन ,इत्यादी मूर्ती शिल्प सुद्धा दिसून येतात. मंदिराच्या बाह्य भागावर रावणानुग्रह शिल्पाचा प्रचंड देखावा पहावयास मिळतो. तसेच सीता हरणासमयी जटायू पक्षासोबत केलेल्या संघर्षाचे शिल्प सुद्धा येथे दिसून येते. सद्यस्थितीत बरीच मुर्ती शिल्प भग्नावस्थेत असली तरी त्यातल सौंदर्य नजरेआड करण्यासारखे नक्कीच नाही, प्रत्येक पाषाणाची आपली एक वेगळी कथा आहे. कलाकाराने त्यांवर शेवटचा निर्वाणीचा भावनांचा हात फिरवलेला असतो त्यामुळे च तर पाषाणातून उस्फुर्तपणे भावगंगा खळाळताना दिसते.
मुख्य मंदिराच्या दक्षिण बाजूस असलेल्या प्रांगणात एका उंच ठिकाणी प्रचंड प्रस्तरात यज्ञशाळा कोरलेली आहे, प्रवेशद्वारावर अतिशय प्रमाणबद्ध असे स्त्री शिल्प मन वेधून घेते. येथे वीरभद्र , गणेश आणि सप्तमातृकांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत त्यांच्या धडापासून वरील भाग भग्न असल्याने केवळ त्यांच्या वाहनांवरुनच मातृकांची ओळख पटते. या यज्ञ शाळेच्या खालील बाजूस एक लहानसे अर्धवट दालन आहे. नंदी मंडपाचा तळमजला अतिशय कोरीव असून येथे नृत्य करणाऱ्या शिवाचे अष्टभुज शिल्प दिसते तर त्या बाजूस असलेल्या बाह्य भिंतीवर नरसिंह अवतार आणि मिथुन शिल्पे कोरलेली आहेत. रंग महालाच्या बाह्य भिंतींवर दोन अत्यंत महत्त्वपूर्ण शिल्पपट कोरण्यात आली आहेत डाव्या भिंतीवर महाभारताची कथा सांगणारा विस्तृत शिल्पपट आहे तर उजव्या बाजूस रामायणातील महत्वपूर्ण प्रसंगाचे अंकन केले आहे.
पहिल्या मजल्यावर अर्थातच मुख्य मंदिराकडे जाण्यासाठी दोन्ही बाजूने प्रस्तरात पायऱ्या कोरलेल्या आहेत. वरच्या मजल्यावर जाताना प्रवेशद्वाराच्या बाजूच्या भिंतींवर अतिशय सुंदर कोरीवकाम दिसते ,येथे कमलासनामध्ये बसलेल्या ब्रह्मदेवाची चतुर्भुज मूर्ती आहे ,तर नंदीमंडप आणि रत्ना मंदिराचा सभामंडप यांना जोडणाऱ्या छोट्या सभामंडपाच्या खाली अतिशय सुंदर शिल्पपट आहेत, त्यामध्ये भगवान शिवाची दोन रूपे आहेत- महायोगी शिव आणि भैरव.
पायर्या चढून वर जाताच आपण रंग महालाच्या समोरील चौकोनी मंडपामध्ये पोहोचतो या मंडपाच्या वितानावर सुंदर कमलपुष्प कोरलेले आहे ,रंग महालाच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूस पुरुष द्वारपाल कोरलेले असून पाच द्वार शाखा आहेत. आत प्रवेश केल्यानंतर कितीतरी अलंकृत स्तंभांनी वितानाचा भार तोललेला असल्याचे दिसते.या ठिकाणी फारसा प्रकाश येत नाही परंतु तरीही सभामंडपातील प्रत्येक स्तंभावरील नक्षींमध्ये वेगळेपणा दिसून येतो. येथे अतिशय बारीक नाजूक कलाकुसर केलेली आहे ,त्यामध्ये कमलपुष्प ,पदक, मयुराचे अंकन दिसते. प्रदक्षिणा पथावर 5 लहान उप मंदिरे असून त्यामध्ये कोणतीही देवता दिसून येत नाही. गर्भगृहा च्या भिंती सपाट असून त्यात भव्य असे शिवलिंग आहे.
सभामंडपाच्या पुढील भागात प्रशस्त नंदीमंडप आहे यास दोन गवाक्ष असून त्यातून किर्तीस्तंभाचा देखावा दिसतो. त्यापुढे सलग तीन दालन असून ,त्या दालनातून पुढे गेले असता डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूस प्रशस्त प्रांगण दिसते. येथे थांबून कैलासाचे भव्य रूप डोळ्यात साठवता येते, असे जरी कैलासाचे ओझरते रूप असले तरी ,
केवळ एकाच सलग प्रस्तरातुन निर्माण झालेला कैलास पाहण्यासाठी दोन डोळे ही अपुरे पडल्यागत वाटतात.
एवढे प्रचंड कातळ सौंदर्य न्याहाळताना, आपण किती सामान्य आणि क्षुल्लक आहोत याची प्रकर्षाने जाणिव होऊ लागते.
~Shrimala K.G.
No comments:
Post a Comment