Friday 28 January 2022

केदारेश्वर मंदिर ,धर्मापुरी

 

             आंबेजोगाई शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर धर्मापुरी हे एक लहानसे गाव आहे. या गावाच्या लगतच असलेल्या एका शेतामध्ये चालुक्यकालीन "केदारेश्वर मंदिर" आहे ,तसेच या गावाच्या शिवारात एका भुईकोट किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष सुद्धा दिसून येतात. मंदिराच्या मुखमंडपाचा भाग अत्यंत भग्न अवस्थेत होता, मात्र सध्या मंदिराचे संवर्धन चांगल्यारितीने झाले आहे. या मंदिराचे विधान हे होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिरा सारखेच आहे ,म्हणजे मुख्य गर्भगृह आणि तीन प्रवेशद्वार अर्थातच खुले सभामंडप आहे मात्र या दोन्ही मंदिरांच्या बाह्य भागात विसंगती आढळतें.


 
प्रस्तुत केदारेश्वर मंदिर पूर्वाभिमुख असून, मूळच्या विधाना प्रमाणे अधिष्ठानावर आहे .त्यावर वेदीबंद, जंघाभाग आणि कपोत अशी एकंदरीत रचना दिसून येते. उत्तर-दक्षिण बाजूला असलेल्या अर्ध मंडपाची मोजमापे 9 फूट × 9 फूट अशी आहेत. रंग शिळेभोवती असलेले चार स्तंभ आणि अन्य आठ स्तंभांनी मिळून मंदिराचे वितान तोलले आहे. सभामंडपातील जमिनी सपाट आणि गुळगुळीत असून विताना चा केवळ मध्य भाग कोरीव आहे ,बाकीच्या भागावर कोरीव काम दिसत नाही. सभामंडपामध्ये दोन देवकोष्ठे आहेत मात्र सध्या ते रिक्त आहेत.


अंतराळ लहान आकाराचे असून, 10 फूट × 10 फूट अशा मोजमापाचे आहे.येथूनच गर्भग्रहाची सुंदर द्वार शाखा नजरेत भरते परंतु द्वार शाखेस भडक तैलरंग लावलेला असल्याने मूळ सौंदर्यास बाधा निर्माण झाली आहे. येथील प्रवेशद्वाराला पाच शाखा असून ललाट लिंबावर गणेशाचे अंकन आहे तर प्रवेशद्वाराच्या तळाशी किर्तीमुख कोरलेले आहे.

गर्भगृह चौरसाकृती असून  10 फूट × 10 फूट अशा मोजमापाची असून ,मध्यभागी शिवलिंग आहे .

मंदिराच्या बाह्यांगाचा विचार केला असता समोरील बाजूस भिंतीवर लघु शिल्पे असुन, बाह्यांगावर एकूण 68 मूर्ती कोरलेल्या आहेत. त्यात शैव, वैष्णव ,आणि शाक्त पंथाचे शिल्पं दिसून येतात.विष्णुचा नरसिंह अवतार, वामन अवतार ,वराह अवतार,ब्रह्मा, काली, शालभंजिका, पत्रलेखा,दर्पणा,रती मदन इ.चा समावेश आहे. बाह्य भिंतींवर एकूण तीन देवकोष्टक असून त्यात केशव, नरसिंह व वासुदेवाची मूर्ती आहे.

या मंदिरावरील पत्रलेखिका विशेष आहे, आवर्जुन पहावी अशी...कलेचे, रसिकतेचे, साधनेचे ते एक ज्वलंत उदाहरण च आहे. पत्र लेखिकेची वेशभूषा, केशभूषा, अलंकार, चेहऱ्यावरील भाव, हातात पकडलेली लेखणी,तो पत्र लिहिणारा हात, तसेच लिहिताना लेखणी वर पडलेल्या दाबामुळे बोटांवरील त्वचेची जी स्थिती होते अगदी त्याचेही अंकन कलाकारांने केले आहे, हे सारं काही नजरेतून मनात भरावं असं विलक्षण आहे. खरेच कलेची  साधना याहून अन्य नाही.



No comments:

Post a Comment

स्थपती

 स्थपती व्यंकटेश्वरा अप्पा..  " कर्तृत्व नेहमीच शब्दांपेक्षा चेहरा अधिक सांगते "..  याची जाणीव होणारे काही क्षण... मी वाचलेलं होत,...