Tuesday 5 April 2022

हाल सातवाहनाची "गाथासप्तशती"

 कवी वत्सल श्री हाल सातवाहन संपादित 

गाथासप्तशती... 




गाथासप्तशती म्हणजे केवळ शृंगार प्रधान ग्रंथ ही प्रचलित समजूत आहे...!मात्र तत्कालीन समाजव्यवस्था, नारीची अनेक रूपे उलगडणारा ,बहुजन समाजाची भूमिका स्पष्ट करणारा हा ग्रंथ आहे.

समाजातील नायक जातीयतेची कोणत्याही सीमा मानित नसून,विषमता रहित समाजरचना ,सामाजिक भाव-भावनांचे सुंदर गुंफण ,आणि सहज ,तरल प्रेम भावना व्यक्त करणारा महाराष्ट्रातील सातवाहन कालीन आदर्श ग्रामीण समाज अनुभवायचा असेल, साहित्यातील सौंदर्याचा भरभरून आस्वाद घ्यायचा असेल, तर गाथा सप्तशती केवळ इतिहासाचे साधन न राहता तत्कालीन मानवी मनाचा वेध घेणारी अजरामर कलाकृती भासते! 

एक कोटी गाथा मधून अलंकारांनी सजलेल्या शृंगारिक अशा सातशे गाथा निवडून हालाने हा संग्रह केलेला आहे.


त्यापैकी काही गाथा पुढीलप्रमाणे:-


अमृतासारखे प्राकृत काव्य वाचणे किंवा ऐकणे ज्यांना माहिती नाही ते काम शास्त्रातील तत्त्वांची चर्चा मात्र करीत असतात त्यांना लाज कशी वाटत नाही? 


तू स्वयंपाक करण्यात निपुण आहेस चूल पेटत नाही म्हणून रागवू नकोस तुझ्या श्वासाला लाल पाटल पुष्पांचा सुगंध आहे त्याचा स्वाद घेण्यासाठी अग्नी धुराच्या रूपाने तुझ्या मुखा भोवती घोटाळत आहे व मुद्दामच प्रज्वलित होत नाही


बुद्धीला प्रथमच डोहाळे लागले होते सख्यांनी तिला विचारले तुला काय काय आवडते तिची दृष्टी फक्त प्रिय पतीकडे गेली


एक काळवीट उजवीकडून वळून आडवा गेला तर प्रवास थांबवावा लागतो मग हरिणाक्षी प्रियेचे व्याकूळ व ओले असे दोन डोळे तिरपे आडवे आल्यावर प्रवास रहित झाला तर काय नवल? 


अगोदर त्यांचा वियोग आणि त्यांत ही पहिली मेघगर्जना.. या गर्जनेने मुळे भोगलेल्या सुखाची आठवण होऊन मी व्याकुळ झाले आहे. गुन्हेगाराला वध स्तंभाकडे नेताना नगारा वाजवतात त्याच्या आवाज सारखी गर्जना मला भासते


डोंगरातील नदीच्या पुरात वाहत असलेली कदंबाची फांदी सापडल्यामुळे तिच्यावरील फुलांचे पराग तुटून गेले आहेत त्या फुलांना बिलगलेल्या भ्रमर जरा बुडतो जरा वर येतो पुन्हा बोलतो तरी तो त्यावरील आपले स्नेह सोडीत नाही


देवा अन्य महिलांशी माझ्या पतीचा संबंध होऊ दे एकनिष्ठ पुरुषांना गुण समजत नाहीत व दोषही उमगत नाहीत


मला ताप येत आहे असे समजल्यामुळे माझ्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी दुर्लभ प्रियकर दूर अंतरावरून आला ज्वरा तू माझ्यावर उपकारच केलास आता तू माझा जीव घेतलास तरी मी तुला अपराधी मारणार नाही


प्रेम हे जिवंत झऱ्याच्या पाण्यासारखी असते साठवून ठेवलेले पाणी सुद्धा बेचव लागते तापवून गार केलेले पाणी फक्त अनुपानासाठी विकृतीजन्या शोष शमविण्यासाठी घ्यावयाचे असते नैसर्गिक व तीव्र तृष्णा त्याने कशी शमणार? 


पडझड झालेल्या देवळावर पारवे घुमत आहेत कळस कोसळल्यामुळे मेख वर दिसत आहे जनु शुला ने भेद केल्यामुळे पारव्यांच्या रूपाने देऊळच स्फुंदत आहे


पार्वतीच्या सौभाग्याची कल्पना तिच्या पाणी ग्रहणाचे वेळी तिच्या सख्यांना आली कारण त्यावेळी पशुपती ने आपल्या हातावरील वासुकी चे कंकण दूर सारले


माझ्या ज्या ज्या अवयवावर त्याची दृष्टी स्थिर होते तो तो झाकून घेण्याचा मी प्रयत्न करते तरीही तो त्याला दिसावा अशीच माझी इच्छा असते


अदर्शनामुळे किंवा अति दर्शनामुळे प्रेम नाहीसे होते त्याच प्रमाणे नीचांचे शब्द ऐकून किंवा अकारणही प्रेम नष्ट होते


मानिनी तुझा प्रियकर अनुनयासाठी आला आहे व तू रुसवा धरून त्याला विन्मुख होऊन बसली आहेस पण तुझ्या पाठीवर उमललेल्या रोमांचा वरून दिसते की तुझे हृदय मात्र त्याकडे सन्मुख आहे


खरोखर पतीने मनधरणी केल्यानंतर मन द्रवले तरीही शिल्लक राहिलेला मान एकांतात केवळ विनयाने कसा व्यक्त करायचा हे केवळ तीच जाणते


स्वप्नात पाणी प्यायल्याने तहान मिटत नाही


तू बालेच्या गालावर दंतव्रणांचे मंडल उमटविलेस, आपल्याकडे जणू ही ठेव ठेवलेली आहे या भावनेने बिचारी त्याभोवती रोमांचाचे कुंपण उभे करून त्याचे अजून रक्षण करीत आहे


ज्याच्या कडे कितीही वेळ पाहत राहिले तरी तृप्त होत नाही जो आपल्या सुख दुःखात सहभागी असतो सद्भावना प्रकट करतो हृदयाशी एकरूप होतो असा पुरुष पूर्वपुण्याई मुळेच प्राप्त होतो


तिने ओठाला लावलेला रंग रात्री प्रियकराने आपल्या ओठांनी पुसून घेतला, सकाळी जणू तोच रंग तिच्या सवतीं च्या नेत्रांचे ठिकाणी प्रकट झाला


बिछान्यावर पडल्या पडल्या तिने मनोमय प्रियकर निर्माण केला आणि ज्यांवरील बांगड्या सैल झाल्या आहेत अशा बाहुंनी त्याला अलिंगले.. तेव्हा तिचे डोळे अर्धे मिटले

*अर्धोन्मिलीत नेत्र हे प्रेमतृष्णेचे लक्षण. 




आज ह्या ,उद्या त्या ,वेगवेगळ्या फुलांचा आस्वाद घेण्याची भ्रमर इच्छा करतो. हा दोष फुलांच्या निरसतेचा ,भ्रमराचा नाही *तु रसपूर्ण आहेस व तो रसज्ञ आहे


सर्वच पापे प्रारंभी सरळ किंवा सबळ सबबीवर आधारलेली असतात आणि प्रथम पवित्र भासतात.बोभाटा झाला म्हणजे त्यातील रहस्य किंवा रम्यता नष्ट होते आणि पापाचा सांगाडा भेडसावू लागतो.सत्य सृष्टीच्या निकषावर स्वप्नशृष्टी चा कस कसा चमकणार? 


वसंतातल्या विरह पेक्षा पावसाळ्यातला विरह अधिक तापदायक


ती तरुण व स्वतंत्र आहे तिचा पती वृद्ध व तिच्या आधीन आहे गावात पुष्कळ उनाड तरुण आहेत वसंत ऋतु आला आहे तिच्या संग्रही जुने मद्य आहे, अशा स्थितीत तिने स्वैरिनी होऊ नये तर काय मरावे? 


पौर्णिमेचा पूर्ण चंद्रालाही तुझ्या मुखाचे सादृश्य व सौंदर्य लाधत नाही हे पाहून जणू दुसर्‍या कोणत्या तरी द्रव्यापासून चंद्र पुन्हा घडवावा म्हणून ब्रम्हा जणू चंद्राचे कलाकलाने तुकडे करीत आहे.


सलज्ज झालेले तिचे मुख कमल दुसरे दिवशी पाहताना होतो तेवढा आनंद काही प्रत्यक्ष समागमात होत नाही


ती भिक्षेकर्याला वाढीत आहे. तो तिचे नाभीमंडल पाहत आहे व ती त्याचा मुखचंद्र. आणि दोघांच्याही हातांतील पात्रे कावळे उडवीत आहेत. 


तुझ्या जघनांवर आरोहन करण्याचे किंवा त्यांना मिठी घालून डोलण्याचे सुख इतरेजनांना मिळत नाही व ते तुझ्या सोन्याच्या कडदोर्याला मिळते. हे अग्नी व वरुण यांच्या कृपेचे माहात्म्य

(कनकडोर म्हणजे कडदोरा) 


तो मध्यम गुणी आहे ,हेच ठीक आहे. दुर्जन व सज्जन या दोघांचेही कार्य नाही. यांचे दर्शन तापदायक असते आणि सज्जनांचे दर्शनही होत नाही म्हणून ज्यांची गुणदोष सामान्य आहे तसाच पुरुष स्त्रियांना अधिक इष्ट वाटतो


एखाद्या निर्जन जंगलात वेड्यावाकड्या व खुरटलेल्या फांद्या नसलेल्या व पाने झडलेल्या वृक्षाच्या जन्माला आलो तरी चालेल पण मनुष्य लोकांत मात्र दानशील व रसिक पण दरिद्री अशाच्या जन्माला येऊ नये. 


वय उलटून गेलेल्या स्त्रियांच्या स्तनजघननितंबावरील नखक्षते मदनाच्या उद्ध्वस्त निवास स्थानाच्या अवशेषांसारखे दिसतात. 


तिचा विरह विषासारखा असह्य व समागम अमृतासम सुखद आहे. विधीने विष व अमृत यांचे मिश्रण करून प्रिया निर्माण केली की काय❓


सशक्ताची क्रिडा, प्रियेचा रुसवा , समर्थाची क्षमा, जाणत्याचे बोलणे व अजाणत्याचे मौन शोभनीय असतात. 


 प्रत्यक्ष हातात असते ते धन, संकटात अंतर देत नाही तो मित्र, आणि गुणाचे सानिध्य असते तेच खरे रुप असते. 


मनुष्य पर्वता एवढा मोठा असला तरी दोन गोष्टी त्याला ताबडतोब लघुता आणतात कार्य केलेले नसता ते केले आहे अशी फुशारकी मारणे आणि जे काही केलेले असेल त्याबद्दल प्रौढी सांगणे. 


प्रेमाची स्वारस्य रहस्यांत असते. 


सुंदरी तुझ्या मुखाला सूर्यकिरण स्पर्श करीत आहेत, पदराने त्याचे निवारण करू नकोस, कमलाचा स्पर्श अधिक सुखदायक कि तुझा हे सूर्याला कळू दे


सज्जनांची मैत्री, पाषावरील रेघ, एकदा कोरली की कायमची. 


मोठ्या झाडांच्या फांद्या प्रमाणे मोठी माणसे संपन्न झाले की नम्र होतात आणि विपत काळी उन्नत होतात


असह्य अशा ग्रीष्मातही प्रेमी जोडप्याचा ताप चंदनाच्या लेपाने नष्ट होत नाही अलिंगणाच्या विलासा मुळे प्राप्त होणाऱ्या सुखाने तो शांत होतो


सज्जनांनी ऐकलेली रहस्य कलहांतही त्यांचे तोंडून बाहेर पडत नाहीत, ती त्यांच्या बरोबर वृद्ध होतात व अंती त्यांच्या बरोबर दग्ध होतात. 


प्रियकर मनात ईर्ष्या उत्पन्न करतो, प्रेम जागृत करतो, जे अप्रिय ते सहन करावयास लावतो आणि विरहांत मरु ही देत नाही; असे विविध बहुगुण त्याचे अंगी आहेत. 


सुर्यस्पर्श होताच कमल विकसते, तसे प्रियकराचे नुसते नाव घेताच मुख प्रफुल्ल होते


परत दुःखाने दुखित होणे हा धर्म.. ज्यांचे अंतकरणात आपल्याविषयी स्नेह नसेल त्यांची जवळ आपली सुख-दुःखे प्रकट करू नयेत ही नीती.. आणि ज्याचे अंतकरणात करूणा असते तेच मुक्तीचे अधिकारी होतात ही युक्ती


हे भ्रमर कमळाच्या केसरा वरील परागांच्या समुहात प्राप्त होतो तेवढा मकरंद दुसरीकडे मिळणार असेल तरच तुझ्या इतरत्रही हिंडण्यात शोभा. 

भ्रमर रसिक असतो म्हणूनच भ्रमण शील असतो


चंद्र दिसला की दृष्टीला सुख होते इतकेच नव्हे तो शरीराला स्पर्श करून आनंद देतो मात्र कितीही प्रार्थिला तरी हाती येत नाही. कलावान चंद्राप्रमाणे कला निपुण प्रियकर ही लाभत नाही. 


बाण स्वभावतः सरळ असतो व धनुष्य वक्र असते, धनुष्याच्या दोरीवर बाण चढविला की ते तात्काळ त्याला फेकून देते ,सरळ व वक्र यांचा संबंध चिरकाल कसा टिकेल ? 


सुरत संपल्यानंतर ही तो माझ्या विकल अंगाकडे आसक्तीने पाहतो अशा रसिका चा विसर पडणे शक्य तरी आहे का?  


प्रेमाचे नैसर्गिक अंतर्ज्ञान हाच स्त्रियांचा उपाध्याय! 


जे प्राप्त झालेले नसते ते मिळेपर्यंत त्याबद्दल उत्सुकता वाटते आणि ते प्राप्त झाले न झाले तोच नव्या उत्सुकता निर्माण होतात. 

मन मनाई जुमानीत नाही ते कायम होकारासाठी विव्हळत असतं. 


लांब पापण्या असलेले स्वच्छ विशाल व काळेभोर डोळे अनेक स्त्रियांना असतात पण अशा नेत्रांनी पहावयाचे कसे हे सर्वांना समजते असे नाही


रहाटाच्या गाडग्यांत पाणी भरलेले असते तोवर त्यांची तोंडे वर असतात आणि रिकामी झाली की ती माना खाली घालतात दुर्जनांचे वर्तन असेच असते. 


उन्हाळ्यातल्या दुपारच्या कडक उन्हानें तापलेले अरण्यातील वृक्ष जणू त्यांवरील कीटकांच्या अति कर्कश स्वराच्या रुपाने आक्रोश करीत आहेत


मधुर अशा मधु वर लुब्ध झालेल्या भ्रमणांनी अगोदरपासूनच ज्यांत आश्रय घेतलेला आहे अशा कमलांचा समुदाय सूर्यकिरणांच्या चुंबना मुळे उमलत आहे। 


सणाच्या दिवशी तिच्याशी बोलताना त्याने चुकून दुसरी चे नाव घेतले ते ऐकताच अंगावरले अलंकार जणू बळी देण्यासाठी सज्ज केलेल्या रेड्याच्या गळ्यात घातलेल्या माळेसारखे तिला वाटले। 


उन्मत होण्याला किंवा मरण्याला अंगणातल्या अंकोला चा कोमल परिमल ही पुरेसा आहे


मुग्धे तुझ्या भिवयांच्या धनुष्यातून वेगाने सुटणाऱ्या तिरप्या दृष्टीच्या बाणाच्या अर्धचंद्राकृती पानाची टोके लाल भडक आहेत आणि त्याची धार अति तीक्ष्ण आहे त्यामुळे कोण घायाळ होणार नाही? 


मुला, ज्यांना संसारातील सुख दुःखांचा अनुभव आहे त्यांनाच महिला म्हणावे इतर स्त्रिया पुरुषांना केवळ म्हातारपण आणतात


दारिद्र्य असलेतरी पती स्वाधीन असण्यातच पत्नी धन्यता मानते. प्रियकर स्वाधीन नाही आणि पृथ्वी ची संपत्ती हाती आहे तरी ते दारिद्र्य च


प्रेम हे विषासारखे असते त्याला रोखून धरण्याची सामर्थ्य कोणातच नसते


केव्हातरी प्रेम शपथ घेण्याच्या अवस्थेला येण्याइतके क्षीण होते , अर्थातच मनुष्य शपथेवर काही सांगु लागला म्हणजे ते खोटे आहे असे खुशाल समजावे


जे निषिद्ध त्यातच विशेष सुख वाटते औत्सुक्यामुळे विकृती ही प्रकृती वाटते, आणि ते विसरले कि सारेच सुमार वाटू लागतं


हसावयाचे पण दात दिसू द्यावयाचे नाहीत, फिरावयाचे पण ते घरातल्या घरातच उंबरठा ओलांडायचा नाही ,पहावयाचे पण मुख वर न उचलता ,ही वागणूक वधूंची. 


सज्जन लोक ऊसासारखे असतात जिभेला गोड असतात हदयाला सुख देतात व प्रिय वाटतात त्यांना पिळून काढले तरी ते सरस ठरतात


प्रियकराने कुरवाळल्यामुळे विस्कटलेले केस आणि मद्यामुळे सुगंधित झालेले मुख मदनोत्सवांत एवढाही शुंगार तरुणींना शोभतो


तृषार्ताना विवेक राहत नाही, धोका उमजत नाही, मग तहान कशाचीही असो


ओल्या केसांतून ठिबकणारे बिंदू हेच त्या केसांचे अश्रू


पहा झाडाच्या ढोलीतून पोपटांची रांग बाहेर पडत आहे जणू शरद ऋतूत झाडाला ज्वर झाला असून त्याच्या मुखातून रक्तमिश्रित पित्त बाहेर पडत आहे


असा एकही प्रेम विलास नाही की जो भ्रमर कलिकेशी करत नाही, प्रथम तो वेली भोवती घिरट्या घालतो व कलिका हेरतो नंतर तिच्याभोवती घोटाळतो मग तिच्याबरोबर घुमतो व तिच्याशी कुजबुजतो ,नंतर तिच्या पाकळी पाकळी चे चुंबन घेतो ,तृप्ती साठी तो काय करणार नाही याचा नेम नाही ;कळी कुरतडून ही टाकील


काही रसाचा आस्वाद नेत्रांनी घ्यावयाचा असतो तर काहींचा ओठांनी , डोळे काय कोठेही रोखता येतात पण ओठांना मात्र अनुमती घ्यावी लागते


सदैव तरुण असणार्या देवांनी अमृतासाठी समुद्रमंथन केले, त्या अर्थी वाटते की त्यांना प्रियतमांच्या अधररसाचा आस्वाद मिळालेला नसावा. 


धनुष्याची दोरी कानापर्यंत ओढूनन सोडलेल्या तिक्ष्ण बाणाने मर्मस्थानी जखमी झालेली हरिणी मान वळवून आपल्या प्रियकराकडे पाहते ,पुन्हा त्याचे दर्शन होणार नाही म्हणून त्याला अखेरची डोळे भरून पाहून घेते,,जीव जाणार म्हणून नव्हे तर यापुढे प्रियकराचे दर्शन होणार नाही म्हणून हरिणी व्याकुळ झालेली आहे



रेखाचित्रांत रंग भरलेले नसले तरी चित्राचे वैशिष्ट्य त्यांतही असतेच, ते हे की त्यातील एकमेकांना गाढ अलिंगन दिलेले प्रियजन परस्परांना क्षणभरही सोडत नाहीत, मुळात रंगीत असलेल्या चित्रांतील रंग उडुन गेले तरी चित्रीत केलेल्या जोडप्यांपैकी कोणाचेही प्रेम केव्हाही उडुन जात नाही. हाच चित्राचा विचित्र पण विशिष्ट गुण.. 


मदनाला चित्तजन्मन् अशी संज्ञा आहे . 

प्रेमाचा उद्भव चित्तांत होतो, ते वर्णावर अवलंबून नसते.


अडाणी दुर्जनांच्या संगतीमुळे आपल्यातले गुण मातीमोल होतात


उधानावर आलेल्या अधीराला उत्तम व अधम यांमधला फरक अनुभवानंतर च्या पश्चातापापर्यंत च समजेल


संकेतस्थानांना स्मरण शक्ती व वाचा फुटली तर ती आपल्या कितीतरी आठवणी सांगू शकेल.. केवढा अनर्थ होईल?  


सुख हवे असेल तर मनाजोगी माणूस आदरपुर्वक शोधून काढले पाहिजे ,आवडत्या माणसा पासून मिळणार नाही असे सुखच नाही, सुख हे बाह्योपचारांवर नव्हे तर अंतःकरणाच्या प्रतिक्रियेवर अवलंबून असते. 


दृष्टीला अंतराची व लज्जेची मर्यादा असते, ह्रदय मात्र अदृष्टाचे ही बंधन जुमानीत नाही. 


जे अकृत्रिम व उत्कट असते ते पूर्णता आनंदप्रद आणि सशास्त्र ही असतेच. प्रीतीचा निष्कपट, नि:संकोच व नैसर्गिक अविष्कार हात सशास्त्र शृंगारविलास ,तो अंतःप्रेरणेने व्यक्त होतो .हे शिकवावे लागत नाही आणि शिकूनही येत नाही. 


रवंथ ही क्रिया मानवांना अन्नाचे बाबतीत करता येत नाही हे खरे , पण उपभोगलेल्या सुखांची आठवण ही मानसिक क्रिया रवंथा सारखीच आहे त्यावरून आपले मनुष्यत्व सूचित होते, पशुत्व नव्हे. आणि स्मृती सुखा इतके विदग्ध सुख दुसरे कोणते आहे? 


रे दारिद्र्य, जे जे गुणी, त्यागी व शास्त्र निपुण त्या त्यांवर तुझे प्रेम असते ,इतका तू गुणज्ञ व विचक्षण आहेस. 


जे बहिरे आहेत व आंधळे आहेत ते धन्य आहेत , खरोखर या मनुष्य लोकात तेच जगतात, कारण त्यांना चहाडखोरांचे घातकी बोलणे ऐकू येत नाही किंवा नीचांची दुष्ट समृद्धी दिसत नाही. 


हिवाला कमळांना जाळतो, म्हणून तो उष्ण. स्वभाव लपवला तरी तो कृतीवरून ओळखता येतो


चंद्राच्या अंगी सोळा कला तर कलावंताच्या अंगी चौसष्ट. कलावंताचे माहात्म्य त्याच्या अंगच्या कलेच्या तेजावर आणि आश्रयदातांच्या औदार्यावर व रसिकांच्या प्रोत्साहनावर अवलंबून असते. 


तेथे तो उभा आहे असे वाटले, म्हणून मी त्याला दृढ आलिंगन दिले ,पण मी फसले.स्पर्शानंतर मला समजले की तो गावाच्या शिवेवर उभा केलेला तृणपुरुष(बुजगावणे) आहे. 


प्रत्यक्ष आस्वादापेक्षा अपेक्षित आस्वाद अधिक आकर्षक असतो ,सौंदर्य व सौकुमार्य यांचे तृप्तीशी सहकार्य असतेच असे नाही.


कितीही स्नेहाने लालन-पालन केले तरी दुर्जन नेहमी असंतुष्टच असतात ,नेहमी तेल घालित राहिले तरी दीपज्योती चे मुख काळेच असते.. 


आता हिच्या चमकदार नखामभोवती तर नंतर फुलांभोवती, क्षणांत या वेलीभोवती तर क्षणात फुले खुडणाऱ्या स्त्रीच्या हातांभोवती असे भ्रमर करतात, (त्याकाळीही स्त्रिया नखांवर चमकदार रंग चढवित असत हे नक्की) 


विस्तवावर पाणी ओतले की तो विझतो परंतु शृंगार रसाच्या सिंचनाने प्रेमाग्नि अधिकच प्रज्वलित होतो. 


ग्रीष्मातील दुपारच्या उन्हाच्या तापामुळे लोकांनी आपापल्या घरांची दारे लावून घेतली आहेत, वाटते की जणू साऱ्या घरांनी आपापली डोळे मिटून घेतलेले आहे. कोठे कोठे घिरिटांची घरघर चाललेली आहे ती ऐकून वाटते की जणू सारी घरे घोरत आहेत. 


रुसलेल्या पत्नीच्या गालांवरून ओघळणारे अश्रूं वर पतीची दृष्टी खिळून राहिली , कारण त्यामध्ये तिच्या डोळ्यांचा गडद निळा ,गालांचा फिका पांढुरका व ओठांचा लालसर रंग प्रतिबिंबित झालेला दिसला आणि जणू चंद्रधनुष्य प्रकटले आहे असे भासले


ज्याला कवितेची गोडी नाही व संगीताची आवड नाही आणि प्रौढ महिलांच्या फळांतील माधुरी रुचत नाही त्याला त्याचे अरसिकत्व हीच शिक्षा.. 


विपरीत रत करीत असताना विष्णुच्या नाभिकमलांत बसलेला ब्रह्मदेव लक्ष्मीला दिसला, तेव्हा तिने त्वरा करून हरीचा उजवा डोळा झाकला. विष्णूचा उजवा डोळा मिटला म्हणजे सूर्यास्त होतो आणि सूर्यास्त झाला म्हणजे कमळाच्या पाकळ्या मिळतात , आपला विलास ब्रह्मदेवाला दिसू नये म्हणून लक्ष्मीने एवढी घाई केली. नाभिकमळ व त्यांत बसलेला चतुर्मुखी ब्रह्मदेव यांची अडचण लक्ष्मीने कशी सोसली असेल, हरी जाणे! 


असे हसावे की आपले हसे होणार नाही, असे बोलावे कि आपण लोकांना प्रिय व्हावे ,असे जगावे की ज्यामुळे यश प्राप्त होईल, असे मरावे की पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. 


श्रेष्ठांचा स्नेह करावा तो त्यांच्या श्रेष्ठत्वासाठी ..उपयुक्ततेसाठी नव्हे. 


शिरीष कुसुमांनी सुगंधित झालेल्या संध्याकाळच्या वाऱ्यामुळे विरहिणीला होतो तेवढा ताप भर दुपारच्या कडक उन्हाने सुद्धा होत नाही


कुलीन स्त्री पहा पती प्रवासाला जातो तेव्हा तिचे यौवन व लावण्य आणि विभ्रम व विलास त्याच्याबरोबर जातात आणि तो घरी परतला की त्याच्याबरोबर परत येतात. 


ज्याच्या अंगी सद्भाव आणि रसिकता केवळ अशा पुरुषा समोरच रुसायला हवे. 


सरस काव्य सर्व इंद्रियांना संपूर्ण सुख व स्वास्थ्य देते, त्याच्या अंशामात्राएवढेही सुख देण्याची शक्ती दुसऱ्या कशातही नाही


सज्जन कदली स्तंभासारखे असतात दुसऱ्यांना फळे देण्यामुळे होणाऱ्या आत्म नाशाची ते चिंता करीत नाहीत, त्यांना नमन असो


हे विटपा फळे नसतात तेव्हा तू पानांनी आच्छादलेला असतोस, आणि मुढा तू फुले धारण करतो तेव्हा मात्र पाने ढाळतोस, म्हणूनच तुला विटप हे नाव मिळालेले दिसते

वीट म्हणजे कामुकानुचर ,वेश्याचा आश्रित. . 

जिथे जागरणे नाहीत व भांडणे नाहीत, असूया नाही व रुसवा नाही किंवा सद्भावपूर्ण मधुर शब्द नाहीत तेथे स्नेह ही नाही.... 

















No comments:

Post a Comment

स्थपती

 स्थपती व्यंकटेश्वरा अप्पा..  " कर्तृत्व नेहमीच शब्दांपेक्षा चेहरा अधिक सांगते "..  याची जाणीव होणारे काही क्षण... मी वाचलेलं होत,...