Wednesday, 11 May 2022

Bankanath temple, Ratkal

          Bankanath temple, Ratkal, Kalburgi district, Karnataka. 




            प्रस्तुत बंकानाथ मंदिर गावाच्या मध्यवर्ती भागात आहे. पूर्वाभिमुख, त्रिदल रचनेचे हे मंदिर शिखरासहित सुस्थितीत आहे, मात्र दुर्दैवाने त्यावर लाल-पांढऱ्या रंगांची रंगरंगोटी केलेली आहे. मधोमध मंदिर व सभोवती भिंत बांधलेली असून त्यातच एक प्रवेशद्वार मंदिरात प्रवेश करण्यासाठी तयार केलेले आहे, या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच उजवीकडे एक लघु गर्भगृह आणि ढासळलेल्या विताना खाली एक शिवलिंग दिसते. त्यालगतच काही वीरगळी आणि नागशिळा ज्यांना भडक तैलरंग लावून मंडोवराच्या आडोशाला ठेवले आहे. बाहेरील भिंतीच्या आत म्हणजेच मूळ मंदिरासमोर लहानसे अंगण आहे( कदाचित बाह्य भिंतीमुळे तयार झाले असावे)

 कल्याणी चालुक्य शैलीतील हे एक प्रशस्त आणि समृद्ध मंदिर असून सभामंडपातील रंग शिळेच्या अगदी समोरील बाजूस नंदीचे स्थान आहे. तर मुखमंडपाच्या बाह्य भिंतीवर लोझेन्स, बक आणि नर थराचे अंकन केलेले आहे. मूळ मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताना दोन्ही बाजूस दोन पूर्णाकृती गज अंकित केले आहेत ,सभामंडपातील स्तंभांना लाल नारंगी रंगांची रंगरंगोटी केलेली आहे ,यामुळे सहाजिकच सौंदर्यास बाधा निर्माण होते. मुख मंडपाच्या बाह्य भिंतींवर काही ठिकाणी असलेले जालवातायन अत्यंत सुंदर ,अनोखे वैशिष्ट्यपूर्ण तसेच अष्टकोनी आहेत. 

सभामंडपातील वितानावर कमल पुष्पाचे अंकन आहे तसेच जमिनीवर काही ठिकाणी सारीपाठ वगैरे इत्यादी लघु खेळांचे आराखडे दिसतात . सभामंडपात जवळपास 22 स्तंभ आहेत. 




 सभामंडपातून अंतराळात प्रवेश करताना अंतराळाचे प्रवेशद्वार नजरेत भरते. या ठिकाणी सुप्रभा द्वार शाखा असून दोन्ही बाजूस पुत्तलीका कोरलेल्या आहेत परंतु सद्य स्थितीत त्या भग्न आहेत, त्या बाजूस सुंदर नक्षीचे जालवातायन आहे तर प्रवेशव्दाराच्या वरील बाजूस उत्तरांगावर मकर तोरणा मध्ये नटराजाचे अंकन आहे. अंतराळात प्रवेश केल्यानंतर समोरील गर्भग्रहाचे अलंकृत प्रवेशद्वार दिसते. नंदिनी द्वार शाखा असून प्रवेशद्वाराच्या खालील दोन्ही बाजूस चामरधारिणी,द्वारपाल व निधी यांचे अंकन दिसते .येथे चामरधारिणीच्या एका हातात चामर आणि दुसऱ्या हातामध्ये बीज पूरक कोरलेले आहे. त्याखाली दोन्ही बाजूस गज थर ,मध्यभागी कीर्तिमुख व लोझेन्स ची नक्षी दिसते, त्या समोर सुंदर चंद्रशिळा..




येथे ललाटलिंबावर लक्ष्मी दिसते ,पुढे गर्भगृहात प्रवेश करतात शिवलिंगाचे दर्शन घडते त्यामागे मानुषलिंग दिसतो ,त्याच्या उजव्या बाजूस एक भलेमोठे गोलाकार पाषाणाचे भांडे किंवा रांजण ठेवलेले आहे. गर्भगृहाची साधारणपणे लांबी 14m आणि रुंदी 17m आहे. 

मंदिराच्या बाह्य भागाचा विचार केला असता अधिष्ठानाचे अस्तित्व येथे दिसून येत नाही, त्यावर वेदीबंद, जंघाभाग,कपोत व शिखर अशी सर्वसामान्यत: रचना आहे. जंघा भागावर मूर्ती शिल्पांचे अंकन दिसून येत नाही. शिखराचा भाग विटांचा बनलेला आहे. 


एक विशेष आणि सुंदर बाब अशी की, या मंदिराच्या सभामंडपात मधोमध असलेल्या विताना लगत ,आणि त्याभोवती असलेल्या चार पूर्णाकृती स्तंभाच्या शीर्ष भागालगत चिमण्यांची घरटी पाहायला मिळतात. त्यांच्यासाठी त्याच ठिकाणी पाण्याची आणि धान्याची सोय सुद्धा गावकऱ्यांनी करून ठेवली आहे .त्यामुळे मंदिर पाहताना येथील चिमण्यांशी आपला मुक संवाद हा होतोच.... 


Shrimala K. G. 




   

No comments:

Post a Comment

स्थपती

 स्थपती व्यंकटेश्वरा अप्पा..  " कर्तृत्व नेहमीच शब्दांपेक्षा चेहरा अधिक सांगते "..  याची जाणीव होणारे काही क्षण... मी वाचलेलं होत,...