Tuesday, 30 November 2021

कल्याण-सुंदर शिव पार्वती विवाह एक संपन्न कलाकृती

 

जेव्हा मानवी भावभावनांची निर्झरा पाषाणातून उस्फूर्तपणे खळाळते, तेव्हा पूर्णार्थाने शिल्पाकृती श्वास घेऊ लागते.

 ज्यांच्या श्रम, कौशल्य अन् कल्पनाविष्काराने पाषाणास वाचा फुटली अन् नवनवीन कलाकृतींचा जन्म झाला, अशा कलाकारांचे कसब खरोखरच उल्लेखनीय आहे.


  वेरूळ मधील लेणी क्रमांक 16 अर्थात कैलास लेणे, येथे बाहेरील स्तंभ मालिकेच्या ओवरीत असलेल्या शिल्पपटात एक शिल्पपट 'शिवपार्वती विवाह सोहळ्याचा' आहे, यात शिव-पार्वती एकमेकां समक्ष उभे असून शिव चतुर्भुज आहे, त्याचा समोरील उजवा हात पार्वतीच्या हाती असून मागील उजव्या हातात काही तरी वस्तू आहे, शिवाचा पुढील डावा हात पार्वतीच्या स्कंधावर असून, मागील डाव्या हातात कमलपुष्प आहे.काही ठिकाणी पाणिग्रहण समयी, अलिंगन वा हनुस्पर्श केल्याचे ही दाखवले आहे. विवाह प्रसंग असल्याने सहाजिकच शिव अलंकारांनी अलंकृत झालेला दिसतो. मस्तकावर किरीट मुकुट, कानात कुंडले, गळ्यात ग्रीवा, दंडात केयूर ,पायाच्या दोन्ही अंगठ्यात अंगुलियक परिधान केलेले आहेत, शिवाय उत्तरीय व मेखला सुद्धा या ठिकाणी दिसून येतो. तर पार्वती ही शिवाच्या डाव्या बाजूस किंचित मान झुकवून उभी आहे.

        पाषाणात दडलेली सलज्ज ,सालंकृत, सौंदर्य शील नववधू दर्शवण्यास कलाकाराला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले आहे. पार्वतीने घातलेला केसांचा अंबाडा मानेवर रुळतो आहे. तर पार्वतीने गळ्यात ग्रीवा,हार सूत्र, कानी कुंडले, दंडात वलयांकित केयूर, हाती कंकण, कमरेस मेखला,पायी पैंजण ,अंगठ्यात अंगुलियक,इ.अलंकार परिधान केले आहेत. तर खालील बाजूस ब्रम्हदेव प्रस्तुत विवाहाचे पौरोहित्य करताना दिसतात. काही वेळा यझातील अग्नी मनुष्य रुपात सुद्धा दाखवला जातो. 



विशेष बाब अशी की येथील शिल्पपटात पार्वतीने केवळ एकाच पायात पैंजण परिधान केल्याचे अंकित केले आहे.अर्थातच विवाह या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि महत्त्वाच्या क्षणी सहाजिकच सामान्य माणसाची ही धांदल उडते, तो एक खूप महत्त्वाचा बदल असतो.हर्ष, भय, लज्जा अशा कित्येक भावनांचं ते एकत्रीकरण असतं. मनाच्या अशा संमिश्र अवस्थेत गोंधळ उडणे सहाजिक आहे..देवदेवतांना मुर्तरूप देणे म्हणजे केवळ मूर्ती घडवणे एवढेच नव्हे, तर त्या मूर्तीवर मानवी भावभावनांचा शिडकावा करणेही तेवढेच आवश्यक होय, हे येथे या शिल्पकाराने उत्तम रित्या दाखवून दिले आहे.विवाह घटिका समीप आल्याने बावरून गेलेली पार्वती एका पायात पैंजण घालण्याचे विसरलेली आहे हे दाखवून कलाकाराने कलेचे अत्युच्च शिखरच गाठले आहे. खरोखरच कलाकाराच्या कल्पनाविलासाला शतशः नमन..!

✍Shrimala K.G.

Tuesday, 9 November 2021

"दीपोत्सव" वसा आणि वारसा.. 🚩

     "दीपोत्सव" वसा आणि वारसा.. 🚩


दिवाळी म्हणजे, काळोखात तेवणार्‍या "पणत्या".....!
त्यातल्या शुभ्र वातीला मिटवणारी लुकलुकती "ज्योत",,,,!
अन आसमंत प्रकाशमान करण्याचा एक सुरेख "स्त्रोत"...!

दिवाळीत तशी सर्वच जण आपापली घरं व्यवस्थित, सुशोभित करत असतात ते काही वावगं नाही. आपापली घरे तर पशूही व्यवस्थित च ठेवतात मात्र ज्या विधात्याकडे आपले कायम मागणे असते ,अपेक्षा असतात, अशा विधात्याची निवास स्थान म्हणजेच मंदिरं व्यवस्थित, सुशोभित करणं आपल आद्यकर्तव्य ठरत.

मंदिर ही केवळ धार्मिक व अध्यात्मिक ज्ञान प्रदान करणारी केंद्रे नसून, कला,साधना,आचार-विचार ,परंपरा यांचे सूक्ष्म भावविभोर असं 'अव्यक्त' व्यासपीठ आहे जे 'व्यक्ततेत' आणण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच खरी रसिकता..!खरी कलासाधना..!

प्रचंड पाषाणातील कोरीव मंदिर ढासळलेली असली तरी बोलकीच असतात, फक्त आपल्याला बोलायला येत नाही.त्यांचे गतवैभव नष्ट झाले असले तरी त्यांच्या स्मृती कणांत ती कायम पुनरुज्जीवित होऊ पाहतात. मला वाटतं एवढी एकच गोष्ट आहे, ज्याला आपण पुनरुज्जीवित करू शकतो, पुन्हा एकदा ते सोनेरी क्षण, तो आसमंत, ती साधना,नक्कीच त्या पाषाणाच्या वाट्याला आपण देऊ शकतो ,आणि ते देण्यासाठीच ही दिवाळी, ही रोषणाई, जीर्ण मंदिरांमध्ये केली, जेणेकरून त्या दगडी चिर्यांना त्यांचे सोनेरी क्षण पुन्हा मिळतील आणि आपल्याला ही पून्हा गतवैभवाची अनुभूती मिळेल. शेवटी आपला वारसा आपणच जपायला हवा.. !

प्रकाशाची अधिक गरज ही अंधाराला असते, म्हणून पहिली पणती सोमेश्वर मंदिरात...! या मंदिराचा अधिष्ठानाचा संपूर्ण भाग आजही जमिनीखाली आहे तर दोन गर्भगृह स्थानिक लोकांच्या मनोरंजनाची, दारूची अड्डे बनलेली आहेत,पैकी मुख्य मंदिरात शिवलिंग आहे मात्र सहसा या मंदिराकडे कोणी फिरकत नाही.पावसाळ्याच्या दिवसांत पिकांच्या लागवडीमुळे तर या मंदिरापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. त्यामुळे प्रथम निवड ही सोमेश्वर मंदिराची च..!
         येथील द्वारशाखेच्या प्रत्येक मूर्ती शिल्पांवर कोळ्याने जाळे विणलेले होते, सर्वत्र धूळ, माती ,कचरा लहान-सहान तृण,यांचच साम्राज्य होतं.घरातल्या प्रमाणे मंदिरातल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं, अंगणातल्या प्रमाणेच सभामंडपात पाणी शिंपणं, प्रवेशद्वारास तोरण बांधणं, रंगशिळेवर रांगोळी रेखणं,त्यात मनातल्या प्रत्येक भावनेची रंग भरणं,पणत्यांची आरास करणं, गर्भगृहातील मुख्य देवतेची पूजा अर्चा करून संध्यासमयीची आरती करणं,हे असं सुख आहे जे मांडण्यास माझ्या शब्दांत खचितच सामर्थ्य नाही. त्याची प्रचिती ही अनुभूतीतूनच होते. काही वेळापूर्वी धुळीने माखलेल मंदिर आपल्या थोड्याशा कष्टाने पुन्हा नव्याने् श्वास घेऊ लागतं, हे पाहून प्रचंड आनंद होतो.तो क्षण कायमचा आपला होऊन जातो,आयुष्यभरासाठी...या क्षणांच आणि आपलं एक घट्ट नातं जुळतं, जे मिटलेल्या पापण्यांत कायम विसावतं...सोमेश्वर मंदिरास आज खऱ्या अर्थाने गतकाळाचे ते सोनेरी क्षण दिले आणि मन कृतार्थ जाहले.

त्यानंतर सिद्दुकी याने बांधलेले सिद्धेश्वर आणि रिब्बेनायकाने बांधलेले रिब्बेश्वर मंदिर यांची अनुक्रमे सजावट केली. सभामंडपातील कीर्तन-भजन, हरिनाम,टाळ ,वीणा यांच्या मधुर निनादात माझ्या पणत्यांतील ज्योती ही हेलकावत होत्या. या मंदिरात स्थानिक लोकांचा वावर असतो, त्यामुळे सहाजिकच सर्वत्र स्वच्छता होती. त्यात रांगोळी, तोरणं, पणत्यांनी शोभा वाढविली.. त्या आसमंताची... त्या मंदिराची आणि त्या क्षणांची...
   सकलेश्वराचं बारा खांबी मंदिर म्हणजे मंदिर स्थापत्याचा उत्तम दाखलाच...जिथे जाण्यासाठी स्मशानभूमी ओलांडून कच्च्या रस्त्याने जावे लागते त्यात अमावस्येची रात्र..!जेव्हा मनात लख्ख प्रकाश असतो ,तेव्हा आजूबाजूचा गर्द काळोख, स्मशानाची वाट, रातकिड्यांची किरकिर, दूरवरून येणाऱ्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज, या सर्व हॉरर माहोल चा काहीही परिणाम होत नसतो. काही वेळाच्या पायपिटीनंतर अन् थोड्याशा कष्टानंतर सकलेश्वर बारा खांबी मंदिर ही पणत्यांच्या सहवासात गतवैभव पुन्हा एकदा अनुभवू लागलं. प्रत्येक स्तंभाभोवती रांगोळी रेखत सौंदर्याची जणू आराधनाच केली गेली. या ठिकाणचे गर्भगृह अधिक खोल असून, येथील शिवलिंग सुद्धा खूप जुने आहे असे म्हणतात.

अखेरच मंदिर म्हणजे केदारेश्वराचे..!  या मंदिराच्या समोरील भागाची पुनर्रचना केली आहे, एकंदरीत मंदिर सुस्थितीत आहे. मात्र दिवाळीच्या ऐन लक्ष्मीपूजन असलेल्या दिवशी गावापासून थोडे दूर अंतरावर असलेल्या या मंदिरात कोणीही फिरकणे शक्य नव्हते..मंदिर परिसर अगदी सुनसान होता,तर गर्भगृहातील शिवलिंगावर फक्त वाळलेल्या पांढऱ्या शेवंतीची काही फुलं होती, सारं काही उजाड वाटणारं दृश्य काही क्षणातच दिव्यांच्या सोनेरी लक्ख प्रकाशामध्ये न्हाऊन निघाल.. या मंदिराच्या बाह्यांगावरील पत्रलेखिका उल्लेखनीय आहे,आवर्जुन पहावी अशी...दुर्दैवाने ती खूप उंचावर आहे ,पण जुगाड नावाचा प्रकार आपल्याकडे आहे.
प्रत्येक मंदीराचा निरोप रात्री नऊच्या दरम्यान घेण्याचे निश्चित असतानाही मध्यरात्र उलटून जायची याचेही भान नसायचे एवढ ते प्रभावी सौंदर्य होत.. काळोखाला भेदणारा पणत्यांचा तो मंद प्रकाश , ती नीरव शांतता, हलकासा गारवा,निर्जन जागा अन् बोलके खांब यांच्या सहवासातील ही दिवाळी खरोखरच अविस्मरणीय होती.

✍️Shrimala K.G.


Sunday, 31 October 2021

माधवी..

माधवी...


      भक्ती भावनेचा उत्कट संगम..! प्रितीची अबोल सरिता..!कैलासनाथाची एकनिष्ठ सेविका..! मृदंग वाद्यांच्या निनादात थिरकताना, डोळ्यांतील अचूक भाव उमजणाऱ्या त्या दोन डोळ्यांची ती परमसखी....! 
कुसुम- कोमल देहात, केवढी ही कल्पकता..! पराकोटीच्या क्षणात ही केवढा हा विश्वास, भक्तीभाव....! 
खरोखरच धन्य होती, ती माधवी.. ! अन् तिचा तो कलावंत.. ! 
        पाषाणं साऱ्यांनाच दिसतात मात्र त्यात दडलेली भावगंगेची कल्पना केवळ माधवीला होते, त्या कल्पनेला प्रयत्नांची जोड लावून, वास्तविकता बनवलं ते वेड्या कलावंताने..वेड्या विश्वकर्मा ने.... ! 
होय, वेडाच तो.....! कारण सामान्यांसाठी कलावंताची तपस्या ही वेडीच असते. त्यांच वेगळेपण, कला, कल्पकता याला "निव्वळ वेडेपणा" ही एकच उपाधी जगाने दिली आहे. त्यामुळे साहजिकच कलावंत समजावा  असा अट्टाहास करु च नये,कारण ती अशक्य कोटीतली गोष्ट आहे.  
     माधवीच्या कल्पनेतून, विश्वकर्मा ने साकारलेला कैलास..! दोघांच्या प्रितीचा अमर संगम म्हणजे कैलास.. ! पाषाणास जिवंतपण देत, मृत्यू लोकात उभारलेला कैलास आजही त्या माधवीस कृतज्ञता देत असल्यागत भासत..! 
  माधवी च्या कल्पनेची भरारी, विश्वकर्मा ची कला, सहस्र हातांचे साहाय्य त्या प्रत्येक पाषाणातून आजही डोकावू पाहत.. ! प्रत्येकच पाषाण बोलतात, हसतात, अगदी रडतात ही,किंतु ती केवळ अंतस्थचक्षू ने  पहाणाऱ्यास दिसतात ..! सहस्र काळापूर्वी ची व्यथा मांडतात, किंतु ती ही ऐकणाऱ्या साठी च.. ! 
  माधवी च्या कल्पनेतला कैलास साकारल्या नंतर, अल्पावधीतच वेडा बनलेला विश्वकर्मा, आयुष्याभर दगडांशी खेळत, डागडुजी करत, अखेरीस ही दगडी शिळेवरच आपटून, तो गेला.. ! देवलोकातील कैलास मृत्यूलोकात पाषाणाद्वारे आणणारा, स्वत:मात्र काळाच्या क्रुर जबड्यात अडकला..! एवढे अप्रतिम शिल्पवैभव आपण बनवलेले च नव्हे, अशा खुळ्या समजुतीत तो हरवला..! कायमचाच..! उरली होती फक्त माधवी.. ! 
    कलावंताच्या मृत देहावर डोक आपटत, आक्रोश करणारी ती माधवी.. ! तळमळणारी, दु:खाने विव्हळणारी ती माधवी..! कलावंताला आसवांनी भिजवणारी ती माधवी.. 
होय, ती माधवी.. !आता एकटीच होती.. ! 
नित्यनेमाने नृत्य सेवे पश्चात कलावंताच्या स्मृती समाधीवर फुल वाहणारी माधवी आजही जणू प्रत्येक पाषाणात शोधतेय, तिच्या त्या वेड्या कलावंताला..! तिच्या परम सख्याला.. तिच्या विश्वकर्माला.... !!! 


          -- Shrimala K. G. 🙃

स्थपती

 स्थपती व्यंकटेश्वरा अप्पा..  " कर्तृत्व नेहमीच शब्दांपेक्षा चेहरा अधिक सांगते "..  याची जाणीव होणारे काही क्षण... मी वाचलेलं होत,...