Thursday, 31 March 2022

एक खास नातं

            एक खास नात असावं, की ज्यात सारच सामावलं जावं अशी आपली बालिश अपेक्षा आयुष्याकडुन असते.

     गरजेचं नव्हे की साऱ्या अगदी साऱ्या च जाणिवांसाठी, भावनांसाठी, आवडींसाठी एकच परफेक्ट नात असाव.. वेगवेगळ्या जाणिवांसाठी वेगवेगळी नाती असु शकतात, असायलाच हवी.. एखाद्या सोबत बौद्धिक नात, केवळ पुस्तकी गप्पा मारण्यापुरत.. एखाद्या सोबत निव्वळ टिंगल टवाळक्या करण्यापुरत नातं.. एखाद्या सोबत चहा ☕काॅफी मधून उफाळून येणाऱ्या वाफे इतकेच औपचारिक संवाद करण्यापुरत नातं. 



अन् या सगळ्या पलीकडे एक रोमॅण्टिक नातं.. पण आपण या नात्यावर इतर सर्व नात्यांच, अपेक्षांच, जाणिवांच ओझं टाकतो... "सर्व अपेक्षांची पुर्तता एकाच नात्याकडून व्हावी, असा अट्टाहास करण म्हणजे लपलेलं अज्ञानीपण स्वत:हून दाखवणं"..अशी अपेक्षा करणं म्हणजे त्या रोमॅण्टिक नात्यावर एकप्रकारे अन्याय केल्यसारखे च आहे. जोडीदार निवडताना ही सर्व भावनांसाठी एकच व्यक्ती हवी असा अनेकांचा अट्टाहास असतो, मग पुढे चालून अपेक्षा पुर्ती होत नसेल तर वादावादी, हेवेदावे, त्यातून होणारी मानसिक हेळसांड या सर्व बाबींना कंटाळून विवाह नंतर बाह्य नाती शोधली जातात, ज्याला लोक आपापल्या बुद्धीमत्तेनुसार मैत्री, प्रेम, लफडं, अनैतिक अशी कितीतरी नाव देतात.. शारीरिक, मानसिक, बौद्धिक अशा कितीतरी गरजा असतात, त्या सर्व च गरजा, अपेक्षा एका व्यक्तीकडून पुर्ण होउ शकतात का? किंबहुना आपण तरी कोणाच्या सर्व अपेक्षा पूर्ण करु शकतो का❓ नक्कीच नाही.. 

आपल्या वेगवेगळ्या भावना, वेगवेगळ्या आवडींसाठी वेगवेगळी विशेष नाती असु शकतात, आणि त्या वेगवेगळ्या नात्यांना अर्थ ही असतात, ते मनापासून जपायचे असतात, जगायचे असतात... 


✍️shrimala k. G


Friday, 25 March 2022

सुर्यनारायण मंदिर, कालगी

              

         स्थापत्य शिल्पवैभवाने समृद्ध असलेले कालगी गाव रौद्रावती नदीच्या खळखळाटाने अधिक च शोभिवंत वाटते. येथील शिलालेखानुसार या एका गावात त्या काळी तब्बल तीस मंदिरे होती. या गावास एक समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या ठिकाणी सर्वत्रच मुर्ती शिल्प, मंदिर, बारवं, पुष्करणी,पाहायला मिळतात. संपुर्ण गावात तसेच गावानजिक च्या परिसरात मुर्ती शिल्प इतरत्र विखुरलेले दिसतात. विशेष बाब अशी की या गावास तटबंदी आहे. समृद्धता काय असते, हे येथे आल्यावर समजते, एवढे प्रचंड वैभव या गावास लाभले आहे. कर्नाटकात अशी कित्येक लहान सहान गाव आहेत,जी स्थापत्य शिल्प वैभवाने समृद्ध असून ही ती जगाच्या दृष्टीआड अजूनही आहेत, ती प्रकाशझोतात यायलाच हवी.




प्रस्तुत सूर्यनारायण मंदिर हे कर्नाटकातील कलबुर्गी (गुलबर्गा) जिल्ह्यातील कालगी या ठिकाणी आहे. रौद्रावती नदी तीरावरील प्रस्तुत मंदिर कल्याणी चालुक्य काळातील असून पुर्वाभिमुख ,त्रिदल रचनेचे आहे. म्हणजे च तीन गर्भगृह, आणि एक सभामंडप, पैकी दोन गर्भगृहात शिवलिंग आहे तर तिसरे गर्भगृह रिक्त असुन,.त्यामध्ये वितानाचे भग्नावशेष पडलेले दिसतात.

            स्थापत्य शास्त्राच्या नियमानुसार विचार केला तर सद्य काळात दिसणारे शिवलिंग हे या मंदिरातील मुख्य देवता नसावी,हे मंदिर भगवान विष्णू चे असावे.या तिनही गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील ललाटबिंबावर अनुक्रमे गणेश, गजलक्ष्मी आणि लक्ष्मी.चे अंकन आहे. सभामंडपाचे वितान ढासळलेले असल्याने सध्या ते खुले आहे, म्हणजे च केवळ गर्भगृह आणि अंतराळाचेच वितान सद्यस्थितीत आहे.नंतरच्या काळात स्थानिक लोकांनी सभामंडपामध्ये नंदी ची स्थापना केलेली आहे.




    येथे असणाऱ्या द्वारशाखा म्हणजे कलेचे साधनेचे अत्युच्च द्योतक आहे,येथे हस्तिणी द्वारशाखा असुन खालील बाजूस द्वारपाल, चामरधारिणी,निधी त्याखालील बाजुस चंद्रशिळा यांचे अत्यंत सुबक अंकन केले आहे.या ठिकाणी वितानावर सुंदर कमल पुष्प, व त्याबाजुस किर्तीमुखाचे अंकन दिसते,एवढेच नव्हे तर गर्भगृहातील विताने ही अलंकृत दिसतात. येथील वितान होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिराच्या वितानाशी साधर्म्य दर्शवितात. डाव्या बाजूस असलेल्या गर्भगृहात प्रवेश करताना बाजूस एका स्तंभावर शिलालेख कोरलेला दिसतो.



    मंदिराचा जंघाभाग काही अंशी ढासळला असला तरी तो अत्यंत अलंकृत आहे. वेदीबंदाच्या प्रत्येक भागावर सुंदर बारीक नक्षीकाम केलेले आहे तसेच त्यावर लघु देवकोष्टके ही आहेत. बारकाईने पाहिल्यास प्रत्येक लघु देवकोष्टकात विविधता दिसून येते.काही लघु देवकोष्टकात विष्णू तर काही स्त्रिशिल्पे कोरल्याची दिसतात.या लघु देवकोष्टकांचे तोरण अत्यंत वैशिष्ट्यपुर्ण आणि वैविध्यपूर्ण आहेत.अधिष्ठानावर कोरीव लोझेन्स चा थर आहे. अधिष्ठानाचा बराचसा भाग आजही जमिनीखाली आहे, त्यानंतर वेदीबंद, जंघा आणि कपोत अशी सर्वसाधारण रचना आहे. मंदिराच्या जंघाभागावर कर्पूरमंजरी, विषकन्या, शत्रूमर्दिनी, पद्मगंधा,आलसा,स्थानक उमा माहेश्वर,रती-मदन,भैरव इ. तसेच काही पुरुष प्रतिमांचे सुद्धा शिल्पांकन केलेले आहे.त्यासहीतच बाहेरील उजव्या बाजूस गजथर, बकथर दिसून येतात. दुर्दैवाने या भव्य मंदिराचा काही भाग ढासळलेला असल्याने, मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भग्नावशेष विखुरलेली दिसतात. 



✍️shrimala K. G . 

     

Thursday, 17 March 2022

फग्गुच्छण:फाल्गुनोत्सव: होलिकोत्सव...

       छण,खण आणि क्षण याचा अपभ्रंश म्हणजे आजचा हा सण.

                   मनुष्य हा उत्सवप्रिय आहे. काही सणांचे महत्त्व हे सांस्कृतिक असते तर काही ऐतिहासिक असते, तसेच काही सण नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असतात,अर्थातच सुर्याची स्थिती,कृषी संपत्ती, समृद्धी इत्यादी गोष्टींवर अवलंबून असतात. मकर, मेष, कर्क,तुळ या राशीमध्ये जेव्हा सूर्य प्रवेश करतो, तेव्हा मकरसंक्रांती सारखे महत्त्वाचे सण साजरे करतात. मेष संक्रांतीच्या सुमारास रब्बी तर तुळ संक्रांतीच्या सुमारास खरीप पिके हाती आल्याने कृषी वर्ग आनंदी असतो, म्हणून याच सुमारास होळी व दिवाळी यांसारखे सण साजरे केले जातात. 

       फाल्गुनोत्सव म्हणजे होळीचा सण. फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी होते. वद्य प्रतिपदेला धुळवड आणि वद्य पंचमीला रंगोत्सव साजरा होऊन शिमग्याचा सण संपतो



           धुळवडीच्या दिवशी अंतज्याला स्पर्श करून स्नान करावे असे सांगितलेले आहे. कामसूत्रामध्ये सुद्धा वात्स्यायनाने होलिकोत्सवाचा उल्लेख केलेला आहे. तसेच कामसूत्रावरील टीकेत यशोधर सांगतो की पिचकारीत पळसाच्या फुलांच्या रंगाचे पाणी भरून ते आणि बुक्का एकमेकांच्या अंगावर फेकणें ही क्रिडा फाल्गुणी पौर्णिमेला करायला हवी. आता ही क्रिडा वद्य पंचमीला करतात. 

         होळी बद्दल अनेक दंतकथा प्रचलित आहेत. होलिका नावाची एक राक्षसी होती, तिला लहान मुले खाण्याची सवय होती. गावात सतत घडणाऱ्या अशा हिंस्र प्रकारामुळे गावकर्यांनी तिला वेढले, मारले आणि त्या पश्चात तिला जाळले,याचे होळी हे प्रतिक.तिच्या प्रती द्वेष ,तिरस्कार प्रकट करण्यासाठी गावकरी बिभत्स अपशब्दांच्या घोषणा त्या दिवशी करतात. तिच्या निर्भत्सनासाठी उलट्या हाताने बोंबा मारणे, शिवीगाळ करणे, अपशब्द वापरणे हे लहानापासून मोठ्या वयोवृद्धापर्यंत सर्व च करतात, जे आजही सामान्यतः पाहायला मिळते. 




होलिका ही हिरण्यकश्यपू ची कन्या, तर काही ठिकाणी ती हिरण्यकश्यपू ची बहीण होती असे ही उल्लेख म्हणतात. कपटाने जाळावे अशी तिच्या पित्याची आज्ञा असल्याने तिने प्रल्हादास मांडीवर घेतले. मात्र भगवान विष्णू ने आपल्या भक्ताचे रक्षण केले आणि तिलाच भस्म केले. 


तर होलिका ही संवताची बहिण, फाल्गुनी पौर्णिमेला संवताचा अंत होतो व त्याच्या च चितेवर ती स्वत:ला जाळून घेते.अशा अनेक लौकिक कथा प्रचलित आहेत. तसेच फाल्गुन पौर्णिमेला मदनाचे भस्म झाले असे ही उल्लेख आढळतात, आणि त्यामुळे याच काळात मदनोत्सव सुद्धा साजरा केला जात होता. 


उत्सवार्थ अग्नी प्रज्वलित करण्याची परंपरा संस्कृतीपुर्वकालीन आहे. या प्रथेंचेही प्रत्यंतर या उत्सवांत येते. 

Monday, 7 March 2022

कंदुकधारिणी किंवा कंदुकावती

 


Revanasiddeshwar temple  kalgi, kalburgi district, Karnataka.


          मंदीराच्या बाह्यांगावर आढळणाऱ्या स्त्रीशिल्पांना सुरसुंदरी, देवांगना किंवा अप्सरा  असे म्हणतात. क्षिरार्णवात 32,शिल्पप्रकाशात 16 तर काही शिल्पशास्त्रीय ग्रंथात 24 देवांगणाचे प्रकार आढळतात. मात्र या व्यतिरिक्त ही अन्य सुरसुंदरी दिसून येतात, त्यापैकीच एक म्हणजे हातात कंदुक(चेंडू) घेऊन खेळत नृत्य करणारी स्त्री म्हणजेच "कंदुकधारिणी  किंवा कंदुकावती"

कंदुक हा मूळात संस्कृत शब्द असून,त्याचा अर्थ चेंडू असा आहे, ज्यास हिंदीमध्ये गेंद किंवा गेंदू म्हणतात. बोलीभाषेमूळे कंदूचा गेंदू, चेंडू असा अपभ्रंश झाला असावा.

प्राचीन काळातील अनेक उत्सवांपैकीच एक कंदुकोत्सव. कंदुक खेळण्याचे साधन तर होतेच, शिवाय ते नृत्य करताना ही वापरले जात, तत्संबंधी चे नियम तंत्र, गतीचे नियमन, चूणीक्रिया, क्षयपद, चंक्रमण,मध्यम गती इ. बाबत वर्णन दंडीने केले आहे. प्रत्येक महिन्याच्या कृतिका नक्षत्रात विंध्यवासिनी देवीच्या पूजनार्थ राजकुमारी कंदुकावती कंदुकनृत्य करत असल्याची माहिती दंडीने दिली आहे. तसेच हरिवंशात श्रीकृष्णाच्या कंदुकक्रिडेचे संदर्भ आहेत.



काही ठिकाणी कंदुकधारिणीच्या पायाशी सेविका असून ती चेंडू पुरवत आहे. याशिवाय खजुराहो येथील जावरी मंदिर, लक्ष्मण मंदिर, कंदारिया मंदिर येथे ही कंदुकधारिणी शिल्प आढळते. येथील एका स्त्रीच्या हातात फळीसदृश्य वस्तू असून त्यावर तिने कंदुक तोलला आहे. मात्र हे शिल्प भग्न असून तिच्या चेहर्याचा पाषाण फुटलेला आहे. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील अंभई येथील वडेश्वर मंदिरावर दोन कंदुकधारिणी असून मार्कंडी, नागदा इ. ठिकाणी ही कंदुकधारिणी आढळतात.

मंदिर हे जरी अध्यात्माचे प्रतिक असले तरी, मंदिरावरील प्रत्येक शिल्पाचा अर्थ अध्यात्माशीच संबंधित नसतो. त्यापैकी अनेक शिल्पे सामाजिक, सांस्कृतिक परंपरेची साक्ष देत असतात.

✍️


Tuesday, 22 February 2022

कैलास... एक अभिजात शिल्पवैभव

 

एलापुर चे कैलास.....!!

कैलास म्हणजे भारतीय कलावैभवाची अस्मिता..!
शिल्पसंहितेतील अक्षर, अनंत व अद्वितीय असा अंतिम हुंकार....!
मानवी कल्पनाशक्ती चा अनुपम अविष्कार..!
अहोरात्र राबणाऱ्या सहस्रावधी हातांचा आढावा..!
कल्पनाशक्तीचा मुर्तरुप प्रचंड देखावा..!

एक अद्भुत, अवर्णनीय ,पाषाणाला बोलके करणारी कला, म्हणजे च शिल्पकला..!

धन्य आहे तो कलाकार आणि त्याची कल्पनाशक्ती ज्याने दगडातून परमेश्वराला बाहेर काढले..मनुष्याप्रमाणे चालते बोलते केले शिवाय भावनेचा शृंगार ही केला,आणि वेदनेचा टिळा ही लाविला..
विधात्याचा हा कैलास अक्षरश: मर्त्यलोकांत, अगदी तुमच्या आमच्यांत ज्यांनी आणुन ठेविला,अशा कित्येक कलाकारांस शतशः नमन...

  लेणी म्हणजे च लयनस्थापत्य. लेण म्हणजे दागिना, म्हणजे च निसर्गात कोरलेला अनमोल दागिना.

शिल्पवैभवाने समृद्ध असलेली वेरुळ लेणी ही सह्याद्री पर्वत रांगांच्या, सातमाळा रांगेमधील इंध्याद्री किंवा चरणाद्री टेकड्यांमधील पाषाणात कोरलेली आहे. अजिंठा लेणी प्रमाणे वेरुळ लेण्या कधीही स्मृती च्या पडद्याआड गेल्या नाहीत. या ठिकाणी हिंदू, बौद्ध व जैन अशा तिन्ही धर्मीय लेण्यांचा मिलाफ दिसुन येतो. त्यापैकी 16 क्रमांकाचे हिंदू लेणे म्हणजे च कैलास मंदिर, जे एकाच सलग प्रस्तरातुन साकारले अाहे, पर्वताच्या वरील बाजुने पाहीले असता, कैलास म्हणजे एका तबकात मध्यभागी रत्नजडित अलंकार ठेवल्या गत आहे, असे च वाटते. मुळ मंदिराचा प्रचंड कातळ हा डोंगराच्या चारही बाजूस काटकोनात वरपासून खालपर्यंत खोदून वेगळा केला आहे.
सपाट भिंतीचे गर्भगृह,अंतराळ, अलंकृत भव्य सभामंडप, प्रदक्षिणापथ, त्यावर पाच उप मंदिरे, समोर नंदिमंडप, त्यापुढे तीन प्रशस्त दालने,आणि प्रशस्त प्रांगण अशी एकुण एक रचना सांगता येईल.




          मंदिराच्या प्रवेशद्वारावलगत असलेल्या बाह्य भिंतींवर नरसिंह,वराहअवतार, वरुण,कार्तिकेय, इत्यादी प्रतिमा पाहायला मिळतात. मंदिरात प्रवेश करताना प्रवेशद्वारावर द्रविड पद्धतीचे गोपुरम दिसते, त्यांत आठ दिशांचे स्वामी अष्टदिक्पाल आणि इतर वादकही कोरलेले आहेत. द्वाराच्या दोन्ही बाजूस दोन पुरुष प्रतिमा ,शंखनिधी व पद्मनिधी जे कुबेराचे प्रतिनिधित्व करतात. प्रवेशद्वारातून थोडे आत गेल्यानंतर उजव्या बाजूस महिषासूरमर्दिनी चा शिल्पपट आहे तर डाव्या बाजूस चतुर्भुज गणेश मूर्ती आहे, तर समोरचा प्रचंड देखावा म्हणजे गजलक्ष्मीचा शिल्प पट. त्या चारही बाजूस अर्ध स्तंभावर गदाधारी द्वारपालांचे अंकन केले आहे. तसेच डाव्या बाजूस गरुडारुढ विष्णू ,रती मदन, श्रीकृष्णाचे मूर्ती शिल्प आहेत. मुख्य मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूच्या कोपऱ्यात त्रिवेणी मंदिर आहे, गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम येथे  मूर्त रुपात पाहायला मिळतो. उत्तर आणि दक्षिण बाजूला असणाऱ्या प्रांगणामध्ये पूर्णाकृती गज असून त्या बाजूस कैलास चे किर्तिस्तंभ किंवा ध्वजस्तंभ पहावयास मिळतात. तळा पासून ते स्तंभशीर्ष पर्यंत विविध कलाकुसर केलेली आहे. तर स्तंभाच्या मध्य भागावर मध्यम आकाराचे देवकोष्टक व त्याभोवती सुंदर कलाकुसर केलेली आहे. या ठिकाणी पट्टीकेवर यक्षांच्या लहान-लहान प्रतिमा आहेत. दक्षिण प्रांगणात असलेल्या कीर्ती स्तंभावर, असलेल्या देवकोष्टकामध्ये  सूर्यदेवतेची समभंग, द्विभुज मूर्ती आहे. उत्तर बाजूस असलेल्या प्रांगणातील कीर्ती स्तंभावर सुद्धा यक्ष मूर्ती आहेत. त्यापैकी काही वादन करीत आहेत तर काही आनंदमग्न होऊन नृत्य करत आहेत. मुख्य मंदिराच्या बाहेरील स्तंभ मालिकेच्या ओवरीत अनेक शैव, वैष्णव मूर्ती शिल्प आहेत. त्यामध्ये रावण आपले दहावे शीर शिवलिंगावर अर्पण करीत असल्याचे शिल्प, शिवपार्वती चौसर खेळताना चे शिल्प, शिव पार्वती अलिंगण मूर्ती ,केवल शिव मुर्ती, मार्कंडेयानुग्रह, कल्याण सुंदर मूर्ती, अंधकासुर वध मूर्ती ,त्रिपुरांतक शिव मूर्ती , लिंगोद्भव मूर्ती, गंगावतरण ,नटराज, भिक्षाटन शिवमुर्ती, अर्धनारीश्वर इत्यादी मूर्ती शिल्पांचा समावेश होतो. यासह इतर हरिहर, नमस्कार मुद्रेतील विष्णू ,शेषशायी विष्णू, नरसिंह अवतार ,त्रिविक्रम अवतार ,गोवर्धन गिरीधारी श्रीकृष्ण ,कालिया मर्दन ,इत्यादी मूर्ती शिल्प सुद्धा दिसून येतात. मंदिराच्या बाह्य भागावर रावणानुग्रह शिल्पाचा प्रचंड देखावा पहावयास मिळतो. तसेच सीता हरणासमयी जटायू पक्षासोबत केलेल्या संघर्षाचे शिल्प सुद्धा येथे दिसून येते. सद्यस्थितीत बरीच मुर्ती शिल्प भग्नावस्थेत असली तरी त्यातल सौंदर्य नजरेआड करण्यासारखे नक्कीच नाही, प्रत्येक पाषाणाची आपली एक वेगळी कथा आहे. कलाकाराने त्यांवर शेवटचा निर्वाणीचा भावनांचा हात फिरवलेला असतो त्यामुळे च तर पाषाणातून उस्फुर्तपणे भावगंगा खळाळताना दिसते.




      मुख्य मंदिराच्या दक्षिण बाजूस असलेल्या प्रांगणात एका उंच ठिकाणी प्रचंड प्रस्तरात यज्ञशाळा कोरलेली आहे, प्रवेशद्वारावर अतिशय प्रमाणबद्ध असे स्त्री शिल्प मन वेधून घेते. येथे वीरभद्र , गणेश आणि सप्तमातृकांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत त्यांच्या धडापासून वरील भाग भग्न असल्याने केवळ त्यांच्या वाहनांवरुनच मातृकांची ओळख पटते. या यज्ञ शाळेच्या खालील बाजूस एक लहानसे अर्धवट दालन आहे. नंदी मंडपाचा तळमजला अतिशय कोरीव असून येथे नृत्य करणाऱ्या शिवाचे अष्टभुज शिल्प दिसते  तर त्या बाजूस असलेल्या बाह्य भिंतीवर नरसिंह अवतार आणि मिथुन शिल्पे कोरलेली आहेत. रंग महालाच्या बाह्य भिंतींवर दोन अत्यंत महत्त्वपूर्ण शिल्पपट कोरण्यात आली आहेत डाव्या भिंतीवर महाभारताची कथा सांगणारा विस्तृत शिल्पपट आहे तर उजव्या बाजूस रामायणातील महत्वपूर्ण प्रसंगाचे अंकन केले आहे.

पहिल्या मजल्यावर अर्थातच मुख्य मंदिराकडे जाण्यासाठी दोन्ही बाजूने प्रस्तरात पायऱ्या कोरलेल्या आहेत. वरच्या मजल्यावर जाताना प्रवेशद्वाराच्या बाजूच्या भिंतींवर अतिशय सुंदर कोरीवकाम दिसते ,येथे कमलासनामध्ये बसलेल्या ब्रह्मदेवाची चतुर्भुज मूर्ती आहे ,तर नंदीमंडप आणि रत्ना मंदिराचा सभामंडप यांना जोडणाऱ्या छोट्या सभामंडपाच्या खाली अतिशय सुंदर शिल्पपट आहेत, त्यामध्ये भगवान शिवाची दोन रूपे आहेत- महायोगी शिव आणि भैरव.



पायर्‍या चढून वर जाताच आपण रंग महालाच्या समोरील चौकोनी मंडपामध्ये पोहोचतो या मंडपाच्या वितानावर सुंदर कमलपुष्प कोरलेले आहे ,रंग महालाच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूस पुरुष द्वारपाल कोरलेले असून पाच द्वार शाखा आहेत. आत प्रवेश केल्यानंतर कितीतरी अलंकृत स्तंभांनी वितानाचा भार तोललेला असल्याचे दिसते.या ठिकाणी फारसा प्रकाश येत नाही परंतु तरीही सभामंडपातील प्रत्येक स्तंभावरील नक्षींमध्ये वेगळेपणा दिसून येतो. येथे अतिशय बारीक नाजूक कलाकुसर केलेली आहे ,त्यामध्ये कमलपुष्प ,पदक, मयुराचे अंकन दिसते. प्रदक्षिणा पथावर 5 लहान उप मंदिरे असून त्यामध्ये कोणतीही देवता दिसून येत नाही. गर्भगृहा च्या भिंती सपाट असून त्यात भव्य असे शिवलिंग आहे.

 सभामंडपाच्या पुढील भागात प्रशस्त नंदीमंडप आहे यास दोन गवाक्ष असून त्यातून किर्तीस्तंभाचा देखावा दिसतो. त्यापुढे सलग तीन दालन असून ,त्या दालनातून पुढे गेले असता डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूस प्रशस्त प्रांगण दिसते. येथे थांबून कैलासाचे भव्य रूप डोळ्यात साठवता येते, असे जरी कैलासाचे ओझरते रूप असले तरी ,
केवळ एकाच सलग प्रस्तरातुन निर्माण झालेला कैलास पाहण्यासाठी दोन डोळे ही अपुरे पडल्यागत वाटतात.
एवढे प्रचंड कातळ सौंदर्य न्याहाळताना, आपण किती सामान्य आणि क्षुल्लक आहोत याची प्रकर्षाने जाणिव होऊ लागते.

~Shrimala K.G.

Friday, 28 January 2022

केदारेश्वर मंदिर ,धर्मापुरी

 

             आंबेजोगाई शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर धर्मापुरी हे एक लहानसे गाव आहे. या गावाच्या लगतच असलेल्या एका शेतामध्ये चालुक्यकालीन "केदारेश्वर मंदिर" आहे ,तसेच या गावाच्या शिवारात एका भुईकोट किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष सुद्धा दिसून येतात. मंदिराच्या मुखमंडपाचा भाग अत्यंत भग्न अवस्थेत होता, मात्र सध्या मंदिराचे संवर्धन चांगल्यारितीने झाले आहे. या मंदिराचे विधान हे होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिरा सारखेच आहे ,म्हणजे मुख्य गर्भगृह आणि तीन प्रवेशद्वार अर्थातच खुले सभामंडप आहे मात्र या दोन्ही मंदिरांच्या बाह्य भागात विसंगती आढळतें.


 
प्रस्तुत केदारेश्वर मंदिर पूर्वाभिमुख असून, मूळच्या विधाना प्रमाणे अधिष्ठानावर आहे .त्यावर वेदीबंद, जंघाभाग आणि कपोत अशी एकंदरीत रचना दिसून येते. उत्तर-दक्षिण बाजूला असलेल्या अर्ध मंडपाची मोजमापे 9 फूट × 9 फूट अशी आहेत. रंग शिळेभोवती असलेले चार स्तंभ आणि अन्य आठ स्तंभांनी मिळून मंदिराचे वितान तोलले आहे. सभामंडपातील जमिनी सपाट आणि गुळगुळीत असून विताना चा केवळ मध्य भाग कोरीव आहे ,बाकीच्या भागावर कोरीव काम दिसत नाही. सभामंडपामध्ये दोन देवकोष्ठे आहेत मात्र सध्या ते रिक्त आहेत.


अंतराळ लहान आकाराचे असून, 10 फूट × 10 फूट अशा मोजमापाचे आहे.येथूनच गर्भग्रहाची सुंदर द्वार शाखा नजरेत भरते परंतु द्वार शाखेस भडक तैलरंग लावलेला असल्याने मूळ सौंदर्यास बाधा निर्माण झाली आहे. येथील प्रवेशद्वाराला पाच शाखा असून ललाट लिंबावर गणेशाचे अंकन आहे तर प्रवेशद्वाराच्या तळाशी किर्तीमुख कोरलेले आहे.

गर्भगृह चौरसाकृती असून  10 फूट × 10 फूट अशा मोजमापाची असून ,मध्यभागी शिवलिंग आहे .

मंदिराच्या बाह्यांगाचा विचार केला असता समोरील बाजूस भिंतीवर लघु शिल्पे असुन, बाह्यांगावर एकूण 68 मूर्ती कोरलेल्या आहेत. त्यात शैव, वैष्णव ,आणि शाक्त पंथाचे शिल्पं दिसून येतात.विष्णुचा नरसिंह अवतार, वामन अवतार ,वराह अवतार,ब्रह्मा, काली, शालभंजिका, पत्रलेखा,दर्पणा,रती मदन इ.चा समावेश आहे. बाह्य भिंतींवर एकूण तीन देवकोष्टक असून त्यात केशव, नरसिंह व वासुदेवाची मूर्ती आहे.

या मंदिरावरील पत्रलेखिका विशेष आहे, आवर्जुन पहावी अशी...कलेचे, रसिकतेचे, साधनेचे ते एक ज्वलंत उदाहरण च आहे. पत्र लेखिकेची वेशभूषा, केशभूषा, अलंकार, चेहऱ्यावरील भाव, हातात पकडलेली लेखणी,तो पत्र लिहिणारा हात, तसेच लिहिताना लेखणी वर पडलेल्या दाबामुळे बोटांवरील त्वचेची जी स्थिती होते अगदी त्याचेही अंकन कलाकारांने केले आहे, हे सारं काही नजरेतून मनात भरावं असं विलक्षण आहे. खरेच कलेची  साधना याहून अन्य नाही.



Wednesday, 12 January 2022

धनुष्यबाण..

"धनुष्यबाण" हे एक महत्त्वपूर्ण आयुध आहे ,जे पुर्वी शिकारीसाठी तसेच युद्धात किंवा स्पर्धेत संधान साधावयास वापरले जायचे.   धनुष्य हे वेदकालीन आर्यांचे मुख्य शस्त्र होते.पित्याचे धनुष्यबाण हे वारसाहक्काने  पुत्राकडे येत असतं. ऋग्वेदातील धनुष्य लाकडाचे असून त्याची दोरी स्नायूची होती,तर महाभारतात "कार्मुक" या लाकडाचे धनुष्य बनवीत असतं. महाभारतातील धनुष्य रंगवलेली असुन त्यावर सुवर्णा कृती पुष्पे, व रत्ने जडवलेली असत. धनुष्य ही वापरणाऱ्यांच्या उंचीच्या व शक्तीच्या मानाने लहान मोठी असतात सामान्य: त्याची लांबी तालमात्र असावी असे महाभारतात सांगितले आहे, याहून मोठी धनुष्य शक्तीच्या किंवा निशाणा च्या स्पर्धेसाठी वापरण्यात येत असतं.


कौटिल्याने धनुष्याचे कोदण्ड, द्रुण,धनु व कार्मुक हे प्रकार दिलेले असून ते अनुक्रमे ताल, बांबू, दारू व शृंग यांपासून बनविलेले असतात असे नमूद केलेले आहे.  

धनुष्यासाठी 'शिंग व लोखंड' यांचा संयुक्त उपयोग करावा असे अग्नीपुराणात सांगितलेले आहे, तरी हिरोडोटस च्या काळापर्यंत मुख्यता बांबूची धनुष्य वापरात होती.कालांतराने धातूंची निर्मिती वाढली व त्याचा उपयोग अस्त्रांसाठी होऊ लागला.

"शिज्जिनी" म्हणजे धनुष्याची दोरी. वेदकाळामध्ये ही दोरी बैलाची कातडे किंवा स्नायू यांच्यापासुन बनवली जात असे. मूर्व, तृण, शण, बांबू ची साल व स्नायू यांपासून धनुष्याची शिज्जिनी करावी असे कौटिल्याने सांगितले आहे.

शिज्जिनी च्या प्रत्येक टोकाला फांस असे, त्यापैकी एक फांस धनुष्याच्या वरच्या टोकाशी असलेल्या खाचेत नेहमी गुंतवलेला असे. धनुष्य वापरण्याच्या वेळीच दूसरा फांस खालच्या खांचेत बसविण्यात येत असे नाही तर धनुष्याच्या कमानीची शक्ती नष्ट होत असते.

धनुष्य वापरण्याच्या वेगवेगळ्या संज्ञा असतात,त्यापैकी काही पुढीलप्रमाणे:-
आतन्= धनुष्यावर दोरी चढविणे
प्रतिज्ञा= बाण लावणे
आयम्= धनुष्य वाकवणे
अस्= बाण सोडणे.



बाण जोडून शिज्जिनी ताणून नेम धरण्याला "संधान" असे म्हणतात. धनुष्याचा मध्यभाग व बाणाचे अग्र आणि लक्ष्य ही उघड्या डोळ्यांच्या पातळीत येतील एवढेच धनुष्य उचलून संधान साधावयाचे असते.


ऋग्वेदात व अथर्ववेदांत "आलाक्ता" व "दिग्ध" या विषारी बाणांचा उल्लेख आलेला आहे अशा विषारी बाणांचा वापर धर्मयुद्धा मध्ये करायचा नाही असा एक सक्त नियम होता.

महाभारतातले योद्धे हे धनुष्य उभे धरतात,आणि धनुष्याची दोरी ही कानापर्यंत  ओढतात.
गुडघ्यावर बसून किंवा अंतराळातील संधान साधावयाचे असेल तेव्हा धनुष्य हे आडवे च धरावे लागते.

स्थपती

 स्थपती व्यंकटेश्वरा अप्पा..  " कर्तृत्व नेहमीच शब्दांपेक्षा चेहरा अधिक सांगते "..  याची जाणीव होणारे काही क्षण... मी वाचलेलं होत,...